पंतप्रधान कार्यालय
पॅराग्वेच्या अध्यक्षांसोबत प्रतिनिधीमंडळ स्तरावरील चर्चेदरम्यान पंतप्रधानांचे प्रारंभिक वक्तव्य
Posted On:
02 JUN 2025 5:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जून 2025
महामहिम,
आपले आणि आपल्या प्रतिनिधीमंडळाचे भारतात हार्दिक स्वागत करतो. पॅराग्वे हा दक्षिण अमेरिकेतील आमचा एक महत्त्वाचा भागीदार आहे. आपली भौगोलिक स्थिती वेगळी असली तरी आपली लोकशाही मूल्ये आणि लोक कल्याणाचा विचार समान आहे
महामहिम,
आपली भेट खूपच ऐतिहासिक आहे; पॅराग्वेच्या अध्यक्षांनी दुसऱ्यांदा भारताला भेट दिली आहे.
महामहिम,
आपणासमवेत वरिष्ठ मंत्री आणि एक मजबूत प्रतिनिधीमंडळ आले आहे याचा मला आनंद आहे. केवळ दिल्लीलाच नाही तर मुंबईलाही आपण भेट देणार आहात, यातून दोन्ही देशांमधील संबंध मजबूत करण्याप्रति तुमची वचनबद्धता दिसून येते. मला विश्वास आहे की एकत्र काम करून आपण सामायिक विकास आणि समृद्धीचा मार्ग प्रशस्त करू.
महामहिम,
डिजिटल तंत्रज्ञान, महत्त्वपूर्ण खनिजे, ऊर्जा, शेती, आरोग्यसेवा, संरक्षण, रेल्वे, अंतराळ आणि एकूणच आर्थिक भागीदारी यासारख्या क्षेत्रात सहकार्याच्या नवीन संधी आपल्यासमोर आहेत.
मर्कोसुरसोबत आमचा प्राधान्य व्यापार करार आहे. तो आणखी विस्तारण्यासाठी आपण एकत्र काम करू शकतो.
महामहिम,
दहशतवादाविरुद्ध लढाईत भारत आणि पॅराग्वे एकमेकांसोबत आहेत. सायबर गुन्हे, संघटित गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या सामायिक आव्हानांविरुद्ध लढण्यासाठी सहकार्याच्या अपार संधी आहेत.
महामहिम,
भारत आणि पॅराग्वे हे ग्लोबल साऊथचे अविभाज्य भाग आहेत. आपल्या आशा, आकांक्षा आणि आव्हाने समान आहेत. आणि म्हणूनच एकमेकांच्या अनुभवांमधून शिकून आपण या आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतो. कोविड महामारीच्या काळात भारतात निर्मित लसींचा पुरवठा पॅराग्वेला करू शकलो याचा आम्हाला आनंद आहे. अशा अधिकाधिक क्षमता सामायिक करून हे सहकार्याचे संबंध यापुढे चालू ठेवण्यास आम्ही उत्सुक आहोत.
महामहिम,
आपल्या या दौऱ्यामुळे परस्पर संबंधांमधील विश्वास, व्यापार आणि घनिष्ठ सहकार्याच्या स्तंभांना नवी ताकद मिळेल असा मला विश्वास आहे. तसेच भारत-लॅटिन अमेरिका संबंधांमध्येही नवीन आयाम जोडले जातील.
गेल्या वर्षी मी गयाना येथे कॅरिकॉम शिखर परिषदेत सहभागी झालो होतो. आम्ही अनेक विषयांवर सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा केली. मला वाटते की या सर्व क्षेत्रांमध्ये पॅराग्वे आणि सर्व लॅटिन अमेरिकन देशांसोबत आपण एकत्र काम करू शकतो.
पुन्हा एकदा,तुमचे भारतात हार्दिक स्वागत करतो.
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2133309)
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada