नागरी उड्डाण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सतना आणि दातिया विमानतळांचे केले उद्घाटन, मध्य प्रदेशात प्रादेशिक कनेक्टिव्हिटीला मिळणार चालना
प्रविष्टि तिथि:
31 MAY 2025 7:30PM by PIB Mumbai
प्रादेशिक संपर्क आणि पायाभूत सुविधांच्या विकासातला एक महत्त्वाचा टप्पा गाठत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातील नव्याने विकसित झालेल्या सतना विमानतळ आणि उन्नत दातिया विमानतळाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन केले. बुंदेलखंड आणि बघेलखंड प्रदेशांसाठी एक परिवर्तनकारी भरारी घेणारा हा ऐतिहासिक प्रसंग दोन्ही विमानतळांवर आयोजित विशेष कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात आला. उडान (उडे देश का आम नागरिक) योजनेअंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यात विमान प्रवासाचे लाभ पोहोचवण्याच्या केंद्र सरकारच्या संकल्पाचे हे प्रतीक आहे.
दतिया विमानतळावरील समारंभाला केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू उपस्थित होते, तर सतना विमानतळावरील कार्यक्रमाला नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. दोन्ही मंत्र्यांनी प्रादेशिक संपर्क वाढवणे, सुगम्यता सुधारणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थांना उत्प्रेरक बनवण्यावर नागरी विमान वाहतूक मंत्रालय विशेष भर देत असल्याचे अधोरेखित केले.
उद्घाटन कार्यक्रमांना मध्य प्रदेशचे राज्यपाल मंगूभाई सी. पटेल, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव, उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवदा, नागरी विमान वाहतूक सचिव समीर कुमार सिन्हा आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अध्यक्ष विपिन कुमार यांच्यासह इतर वरिष्ठ मान्यवर आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
सतना विमानतळ: प्रादेशिक केंद्राचे सक्षमीकरण
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने 36.96 कोटी रुपये खर्चून विकसित केलेला सतना विमानतळ ईशान्य मध्य प्रदेशातील एक प्रमुख प्रादेशिक केंद्र म्हणून काम करण्यासाठी सज्ज आहे. सांस्कृतिक आणि औद्योगिक महत्त्वासाठी ओळखला जाणारा सतनाचा नवीन विमानतळ आता चित्रकूट आणि मैहर सारख्या धार्मिक आणि औद्योगिक केंद्रांना वेगवान कनेक्टिव्हिटी प्रदान करेल.
768 चौरस मीटर परिसरात स्थित ही टर्मिनल इमारत 50 पीक-अवर प्रवासी आणि वार्षिक 2.5 लाख प्रवाशांना हाताळण्यासाठी सुसज्ज आहे. आधुनिक प्रवासी सुविधा, नवीन धावपट्टी, डॉर्नियर-228 विमानांसाठी एप्रन सुविधा तसेच एटीसी टॉवर आणि अग्निशमन केंद्र सारख्या समर्पित पायाभूत सुविधांसह, हा विमानतळ प्रादेशिक गतिशीलतेत परिवर्तन करण्यास सज्ज आहे. 100% एलईडी लाइटिंग, सौर पथदिवे आणि बागायतीसाठी प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर यासारख्या शाश्वत वैशिष्ट्यांमुळे याच्या उभारणीत अवलंबलेला पर्यावरण-पूरक दृष्टिकोन अधोरेखित होतो.
दातिया विमानतळ: सांस्कृतिक वैभवाचे प्रवेशद्वार
60.63 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला नवीन दातिया विमानतळ, आध्यात्मिक महत्त्व आणि स्थापत्य वारशासाठी ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक दातिया शहराला राष्ट्रीय हवाई वाहतूक नकाशाशी जोडेल. विमानतळावर 768 चौरस मीटरची टर्मिनल इमारत आहे ज्यामध्ये गर्दीच्या वेळी 150 प्रवासी आणि वार्षिक 2.5 लाख प्रवासी हाताळण्याची क्षमता आहे. ATR-72 विमानांसाठी परिचालन सज्जता आणि A-320 विमानांना सामावून घेण्याच्या भविष्यातील योजनांसह, दातिया विमानतळ हे प्रसिद्ध पीतांबरा पीठ आणि दातिया पॅलेसला भेट देणाऱ्या यात्रेकरू आणि पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे प्रवेशद्वार आहे. विमानतळाच्या पायाभूत सुविधांमध्ये नवीन बांधलेली धावपट्टी, एप्रन बे, एटीसी टॉवर आणि अग्निशमन केंद्र, तसेच पावसाच्या पाण्याचे संचयन आणि ऊर्जा-कार्यक्षम प्रकाश व्यवस्था यासारख्या शाश्वत उपायांचा समावेश आहे.
सतना आणि दातिया विमानतळ कार्यान्वित झाल्यावर लक्षणीय आर्थिक आणि सामाजिक लाभ मिळतील, सुधारित कनेक्टिव्हिटी प्रदान होईल, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल आणि आतिथ्य, किरकोळ विक्री, शिक्षण आणि आरोग्यसेवा यासारख्या संबंधित क्षेत्रांच्या वाढीला चालना मिळेल अशी अपेक्षा आहे. हे प्रकल्प भारतातील विमान वाहतूक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि विकास शेवटच्या गावापर्यंत पोहोचवण्याप्रति सरकारच्या अतूट समर्पणाचा दाखला आहेत.
***
M.Pange/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2133078)
आगंतुक पटल : 13