राष्ट्रपती कार्यालय
‘राष्ट्रपती निकेतन’ हे डेहराडूनमधील राष्ट्रपतींचे विश्रांतीचे स्थान 24 जूनपासून सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुले होणार
Posted On:
24 MAY 2025 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मे 2025
उत्तराखंडमधील डेहराडून इथले राष्ट्रपती निकेतन हे राष्ट्रपतींचे विश्रांतीचे स्थान, 24 जून, 2025 पासून सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुले केले जाणार आहे. राष्ट्रपतींच्या विश्रांतीचे हे स्थान 186 वर्षे जुने असून, ते 21 एकर क्षेत्रात विस्तारले आहे. राष्ट्रपती तसेच राष्ट्रपती भवनाच्या वारशाबाबत नागरिकांचा सहभाग वाढवण्याच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ते सर्वसामान्य लोकांना पाहण्यासाठी खुले केले जात आहे. या उपक्रमांतर्गत, 2023 पासून, नवी दिल्ली इथले राष्ट्रपती भवन, हैदराबाद मधील राष्ट्रपती निलयम आणि माशोब्रा इथले राष्ट्रपती निवास सर्वसामान्यांना पाहण्यासाठी आठवड्यातून सहा दिवस खुले केले जाते. या उपक्रमाअंतर्गत फेब्रुवारी 2025 पासून, राष्ट्रपती भवनाच्या दर्शनी भागात होणाऱ्या चेंज ऑफ गार्ड या समारंभाचे स्वरुपही बदलले असून, त्याकरता आसनक्षमताही वाढवली गेली आहे.
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 20 जून, 2025 रोजी राष्ट्रपती निकेतनला भेट देणार आहेत. या भेटीवेळी त्या, राष्ट्रपती निकेतन सर्वसामान्य लोकांसाठी खुले करण्याच्या तयारीचा आढावा घेतील. यानिमित्ताने त्या 132 एकर परिसरात नियोजित असलेल्या राष्ट्रपती उद्यान या पर्यावरणीय उद्यानाची पायाभरणीही करणार आहेत.
राष्ट्रपती निकेतन हे पूर्वी राष्ट्रपती आशियाना या नावाने ओळखले जात होते. ही वास्तू राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांच्या घोड्यांच्या प्रशिक्षणासाठी वापरली जात असे. आता या वारसा इमारतीत वास्तूच्या समृद्ध वारशाची झलक दाखवणाऱ्या निवडक कलाकृतींच्या संग्रहाचे प्रदर्शन मांडले आहे. ही वास्तू सर्वसामान्यांना पाहण्यासाठी खुली झाल्यावर अभ्यागतांना राष्ट्रपतींच्या अंगरक्षकांचे तबेले आणि घोडे पाहण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय या वास्तू परिसरातील लिली तलाव, रॉकरी तलाव, गुलाब उद्यान आणि पेर्गोला पाहण्याची संधीही अभ्यागतांना पाहता येणार आहे.
राष्ट्रपती निकेतन व्यतिरिक्त, लोक राजपूर मार्गावरील 19 एकरच्या घनदाट वनराईतील राष्ट्रपती तपोवन या परिसरालाही सर्वसामान्यांना भेट देता येणार आहे. इथे भेट देणाऱ्यांना इथले स्थानिक वीस्तीर्ण वृक्ष, नागमोडी पायवाटा, लाकडी पूल, पक्षी निरीक्षणासाठी उंच मचाण आणि चिंतन तसेच ध्यानधारणेसाठीच्या शांत ठिकाणांचा अनुभव घेता येणार आहे. या परिसराला भेट देणाऱ्यांना रम्य पायवाटा, हंगामी फुले आणि स्थानिक पर्यावरणीय घटकांच्या नैसर्गाशी जोडण्याच्या उद्देशाने हा परिसर विकसित केला गेला आहे.
राष्ट्रपती उद्यान हे पुढच्या वर्षापासून सर्वसामान्य लोकांसाठी खुले केले जाणार आहे. या उद्यानाचे नियोजन करताना ते पर्यावरणाच्या विविध पैलुंचा अंतर्भाव असलेले आणि मनोरंजकात्मक मूल्य जपणारे असेल, अशा रितीने केले गेले आहे. त्याअनुषंगाने या उद्यानाअंतर्गत विविध संकल्पनाधारीत उद्याने असतील, यात एका फुलपाखरांच्या उद्यानाचा समावेश असेल. याशिवाय या परिसरात एक नयनरम्य तलाव, पक्षीगृह आणि लहान मुलांसाठी खेळण्याची जागाही विकसित केली जाणार आहे. याचबरोबर क्रीडा क्षेत्र, पायी चालण्याच्या मार्गिका, जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅकचे नियोजनही या उद्यानाच्या आराखड्यात केले गेले आहे. या उद्यान परिसरात जलसंवर्धन व्यवस्थेचाही अंतर्भाव असेल, तसेच मोकळ्या जागेत शिकण्याचा अनुभव देणाऱ्या व्यवस्थाही उभारल्या जाणार आहेत. या सगळ्यातून पर्यावरणीय जागृती तसेच सक्रिय जीवनशैलीला चालना देण्यासोबतच कौटुंबिक संवादाला निसर्गाशी एकरुपतेची जोड देण्याचा उद्देश आहे.
* * *
M.Pange/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2130979)