रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गोव्यात प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचे करणार भूमीपूजन
Posted On:
21 MAY 2025 4:48PM by PIB Mumbai
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवार, 23 मे 2025 रोजी गोव्यात नवीन झुआरी पुलावरील प्रतिष्ठित वेधशाळा मनोऱ्याचा भूमीपूजन समारंभ होणार आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदर्शी नेतृत्व, नितीन गडकरी यांचे अग्रणी पाऊल आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या वचनबद्ध प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे.
या प्रकल्पाचा खर्च ₹ 270.07 कोटी इतका आहे आणि तो पाच वर्षांच्या कालावधीत उभारला जाणार आहे. या प्रकल्पात पॅरिसमधील आयफेल टॉवरपासून प्रेरणा घेऊन वेधशाळा मनोरे उभारले जातील. फिरते उपाहारगृह आणि कलादालन यांचा अंतर्भाव करून हे एक जागतिक पर्यटन आकर्षण ठरावे , यादृष्टीने याचे आरेखन करण्यात आले असून गोव्याच्या समृद्ध पर्यटन परिचित्रामध्ये एक महत्त्वाचा टप्पा बनण्यास ते सज्ज आहे.
डीबीएफओटी (डिझाइन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर) म्हणजेच आरेखन, बांधणी, वित्तपुरवठा, चालवा आणि हस्तांतरित करा या प्रारूपावर अंमलात आणल्या जाणाऱ्या या उपक्रमात सरकारवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. संपूर्ण बांधकामासाठी हितधारक जबाबदार असेल आणि 50 वर्षांच्या सवलतीच्या कालावधीसाठी या सुविधेची कार्यवाही करेल. दोन पाइल कॅप फाउंडेशनवरील पायलनमध्ये धोरणात्मकरित्या ठेवलेला प्रत्येक मनोरा 125 मीटर उंचीपर्यंत असेल, ज्यामध्ये 8.50 मीटर गुणिले 5.50 मीटर या परिमाणांचे शाफ्ट असतील.
वरच्या स्तरावर किमान 22.50 मीटर गुणिले 17.80 मीटर आकाराचे दोन विस्तीर्ण मजले असतील, ज्यामध्ये विहंगम चढाईसाठी कॅप्सूल लिफ्ट असतील. व्ह्यूइंग गॅलरी, कॅफेटेरिया आणि अत्याधुनिक पर्यटक सुविधांनी परिपूर्ण असलेले हे मनोरे एक समग्र अनुभव देतील. सागरी भागात दोन्ही बाजूला 7.50 मीटर वाहक रुंदीचा समर्पित वॉकवे पूल बांधला जाईल, ज्यामुळे पर्यटकांना सहज प्रवेश मिळेल. पुलाच्या दोन्ही टोकांवर पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, ज्यामुळे पर्यटकांना सोयीस्कर सुविधा मिळेल.
या प्रकल्पामुळे गोव्यातील पर्यटन आणि आर्थिक क्रियाकलापांमध्ये लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे, तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच भारताची पायाभूत सुविधांवर आधारित जागतिक प्रतिमा उंचावेल. यामुळे आतिथ्य, वाहतूक आणि किरकोळ विक्री यासारख्या संबंधित क्षेत्रांना चालना मिळून स्थानिक उद्योजकतेला प्रोत्साहन मिळेल. शिवाय, आंतरराष्ट्रीय नकाशावर वास्तुशिल्पीय पर्यटन आणि अनुभवात्मक प्रवासासाठी एक प्रमुख ठिकाण म्हणून गोव्याला स्थान मिळेल.


***
S.Patil/N.Mathure/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2130363)