रेल्वे मंत्रालय
रक्सौल येथे मानवी तस्करीचा प्रयत्न आरपीएफने उधळून लावला; ऑपरेशन आहटअंतर्गत 4 अल्पवयीन मुलींची केली सुटका
Posted On:
16 MAY 2025 2:44PM by PIB Mumbai
रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) रक्सौल रेल्वे स्थानकावर 13 मे 2025 रोजी सकाळी केलेल्या जलद आणि समन्वित कारवाईत, मानवी तस्करीचा प्रयत्न उधळून लावत चार अल्पवयीन मुलींची सुटका केली. यातून बाल सुरक्षा आणि तस्करीविरोधी प्रयत्नांसाठी रेल्वे सुरक्षा दलाची अढळ वचनबद्धता पुन्हा एकदा दिसून आली आहे.

वेळेवर मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रक्सौल चौकीतील आरपीएफ पथकाने जीआरपी रक्सौल, एसएसबी मानवी तस्करीविरोधी युनिट, रेल्वे चाइल्डलाइन-रक्सौल आणि स्वयंसेवी संस्था 'प्रयास जुवेनाईल एड सेंटर' यांच्याशी समन्वय साधत गाडी क्रमांक 15273 रक्सौल-आनंद विहार सत्याग्रह एक्सप्रेसमधून 13 ते 17 वयोगटातल्या चार मुलींची सुटका केली.
या अल्पवयीन मुलींची नोकरीच्या संधी आणि गोरखपूरमधील बेपत्ता नातेवाईकाला शोधण्यात मदत करण्याच्या खोट्या आश्वासनांच्या नावाखाली नेपाळमधून तस्करी करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. मुलींच्या कुटुंबियांना त्यांच्या प्रवासाची काहीच माहिती नव्हती. तस्करांकडून विशेषतः सीमावर्ती भागातील गरीब व्यक्तींसाठी, त्यांचे शोषण करण्यासाठी ही युक्ती सामान्यपणे वापरली जाते.
विविध संस्थांच्या सतर्कतेमुळे आणि शीघ्र प्रतिसादामुळे मुलींसोबत असलेल्या एका तस्कराला घटनास्थळीच अटक करण्यात आली आणि अल्पवयीन मुलींना तात्काळ काळजीसाठी बाल संरक्षण अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आले.
कायम सतर्क राहणे, विविध संस्थांसोबत सहयोग आणि सामुदायिक जागरूकता याद्वारे, आरपीएफ रेल्वे परिसराला तस्करीच्या संकटापासून सुरक्षित राखणे, आपल्या असुरक्षित मुलांचे संरक्षण करणे आणि प्रत्येक मुलामुलीची प्रतिष्ठा आणि सुरक्षितता जपणे, यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
***
S.Kane/S.Kakade/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2129102)