मंत्रिमंडळ
उत्तरप्रदेशात सेमीकंडक्टर युनिट स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
सेमीकंडक्टर मिशन: सातत्यपूर्ण गती
Posted On:
14 MAY 2025 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मे 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आज इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत आणखी एक सेमीकंडक्टर युनिट स्थापन करायला मंजुरी देण्यात आली.
देशात पाच सेमीकंडक्टर युनिट्स यापूर्वीच उभारणीच्या अंतिम टप्प्यात असून, या सहाव्या युनिटसह, भारत धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या असलेल्या सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासाच्या प्रवासात पुढले पाऊल टाकत आहे.
आज मंजूर झालेले युनिट एचसीएल आणि फॉक्सकॉनचा संयुक्त उपक्रम आहे. एचसीएलला हार्डवेअर विकसित करण्याचा आणि बनवण्याचा प्रदीर्घ इतिहास आहे. फॉक्सकॉन ही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनातील जागतिक स्तरावरील मोठी कंपनी आहे. या दोन कंपन्या एकत्र येऊन जेवर विमानतळाजवळ येईडा (YEIDA), अर्थात यमुना एक्स्प्रेस वे औद्योगिक विकास प्राधिकरण येथे हा प्रकल्प उभारतील.
या प्लांटमध्ये मोबाइल फोन, लॅपटॉप, ऑटोमोबाईल्स, पीसी आणि डिस्प्ले असलेल्या इतर अनेक उपकरणांसाठी डिस्प्ले ड्रायव्हर चिप्स तयार केल्या जातील.
हा प्लांट दरमहा 20,000 वेफर्स करता डिझाइन करण्यात आला असून, डिझाइन आउटपुट (उत्पादन) क्षमता दरमहा 36 दशलक्ष युनिट्स इतकी आहे.
देशभरात आता सेमीकंडक्टर उद्योग आकाराला येत आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये जागतिक दर्जाच्या डिझाइन सुविधा उभारण्यात आल्या आहेत. राज्य सरकारे डिझाइन कंपन्यांचा सातत्याने पाठपुरावा करत आहेत.
270 शैक्षणिक संस्था आणि 70 स्टार्टअप्समधील विद्यार्थी आणि उद्योजक नवीन उत्पादने विकसित करण्यासाठी जागतिक दर्जाच्या अद्ययावत डिझाईन तंत्रज्ञानावर काम करीत आहेत. या संस्थांमधील विद्यार्थ्यांनी विकसित केलेली 20 उत्पादने एससीएल (SCL) मोहालीने टेप आऊट केली आहेत.
आज मंजूर झालेले नवीन सेमीकंडक्टर युनिट 3,700 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करेल असा अंदाज आहे.
देश सेमीकंडक्टर च्या क्षेत्रात पुढे जात असताना, इको सिस्टीम भागीदारांनीही भारतात त्यांच्या सुविधा स्थापन केल्या आहेत. अप्लाइड मटेरियल्स आणि लॅम रिसर्च हे दोन सर्वात मोठे उपकरण उत्पादक आहेत. या दोघांचेही आता भारतात अस्तित्व आहे. मर्क, लिंडे, एअर लिक्विड, आयनॉक्स आणि इतर अनेक गॅस आणि रासायनिक पुरवठादार आपल्या सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी सज्ज झाले आहेत.
भारतात लॅपटॉप, मोबाइल फोन, सर्व्हर, वैद्यकीय उपकरणे, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण उपकरणे आणि ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे सेमीकंडक्टरची मागणी वाढत आहे. हे नवीन युनिट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला आणखी बळ देईल.
S.Patil/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2128665)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam