नौवहन मंत्रालय
देशातील प्रमुख बंदरांनी आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ऐतिहासिक टप्पे गाठले, वाढ आणि जागतिक स्पर्धात्मकतेला चालना
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कार्गो थ्रूपुट आणि परिचालन कामगिरीमध्येही नवा उच्चांक
बंदर-प्रणित औद्योगिकीकरणासाठी 68,780 कोटी रुपये गुंतवणूक क्षमतेच्या 7565 कोटी रुपये किमतीच्या 962 एकर बंदर जमिनीची तरतूद
मालवाहतूक हाताळणीमध्ये वार्षिक 4.3% वाढ, आर्थिक वर्ष 2023-24 मधील 819 दशलक्ष टनांवरून 2024-25 मध्ये मालवाहतूक हाताळणी जवळपास 855 दशलक्ष टन
Posted On:
13 MAY 2025 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 मे 2025
गेल्या दशकात भारतातील प्रमुख बंदरांनी सातत्याने उल्लेखनीय प्रगती दर्शविली आहे. आर्थिक वर्ष 2024-25, मालवाहतूक हाताळणी, परिचालन कार्यक्षमता आणि पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाच्या बाबतीत एक मैलाचा दगड ठरले आहे.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये, प्रमुख बंदरांनी मालवाहतूक हाताळणीमध्ये 4.3% प्रभावी वार्षिक वाढ नोंदवली. मालवाहतूक हाताळणी आर्थिक वर्ष 2023-24 मधील 819 दशलक्ष टनांवरून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये सुमारे 855 दशलक्ष टनांवर पोहोचली. ही वाढ वाढत्या व्यापाराच्या प्रमाणात सामावून घेण्याची प्रमुख बंदरांची लवचिकता आणि क्षमता अधोरेखित करते. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कंटेनर थ्रूपुट (10%), खत मालवाहतूक (13%), पीओएल माल हाताळणी (3%) आणि इतर विविध वस्तूंची हाताळणी (31%) यामुळे वाहतुकीत वाढ झाली.
प्रमुख बंदरांवर हाताळल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये पेट्रोलियम, तेल आणि वंगण (पीओएल) अग्रस्थानी असून यामध्ये कच्चे तेल, पेट्रोलियम उत्पादने आणि एलपीजी /एलएनजी यांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये त्यांचे प्रमाण 254.5 दशलक्ष टन (29.8%) असून त्या पाठोपाठ कंटेनर वाहतूक 193.5 दशलक्ष टन (22.6%), कोळसा 186.6 दशलक्ष टन (21.8%) आणि लोहखनिज, छर्रे, खते आणि इतर वस्तूंचा समावेश आहे.
प्रमुख बंदरांच्या इतिहासात प्रथमच, पारादीप बंदर प्राधिकरण (पीपीए) आणि दीनदयाळ बंदर प्राधिकरण (डीपीए) यांनी 150 दशलक्ष टन माल हाताळणीचा टप्पा ओलांडला. यामुळे सागरी व्यापार आणि परिचालन उत्कृष्टतेचे प्रमुख केंद्र म्हणून त्यांचे स्थान आणखी मजबूत झाले. दरम्यान, जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाने (जेएनपीए) 7.3 दशलक्ष टीईयू हाताळणी करून विक्रम प्रस्थापित केला, जो वार्षिक 13.5% वाढ दर्शवितो.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये, भारतीय बंदरांनी एकत्रितपणे बंदर-प्रणित औद्योगिकीकरणासाठी 962 एकर जमिनीची तरतूद केली, ज्यातून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 7,565 कोटी रुपये उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे. याखेरीज, वाटप केलेल्या जमिनीवर 68,780 कोटी रुपयांची गुंतवणूक, भाडेपट्टेधारक भविष्यात करतील अशी अपेक्षा आहे. यातून बंदर-प्रणित विकासावर गुंतवणूकदारांचा विश्वास पुन्हा दृढ झाला आहे. या परिवर्तनात खाजगी क्षेत्राचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे, प्रमुख बंदरांमधील पीपीपी प्रकल्पांमधील गुंतवणूक तिप्पट वाढली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ती 1,329 कोटी होती, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये ती 3,986 कोटी झाली आहे. यातून गुंतवणूकदारांचा दृढ विश्वास अधोरेखित होतो.
परिचालन कामगिरीतील सुधारणा आर्थिक वर्ष 2024-25 मध्येही सुरू राहिली. प्री-बर्थिंग डिटेन्शन (पीबीडी) वेळेत (पोर्ट अकाउंटवर) आर्थिक वर्ष 2023-24 च्या तुलनेत सुमारे 36% वाढ झाली. आर्थिकदृष्ट्या, प्रमुख बंदरांच्या एकूण उत्पन्नात आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 8% वाढ झाली. ते आर्थिक वर्ष 2023-24 मधील 22,468 कोटी रुपयांवरून 24,203 कोटी रुपयांवर पोहोचले. त्याचप्रमाणे, परिचालन अधिशेष 7% वाढून आर्थिक वर्ष 2023-24 मधील 11,512 कोटी रुपयांवरून 12,314 कोटींवर पोहोचला.
या कामगिरीबद्दल बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आनंद व्यक्त केला :
"आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारतातील प्रमुख बंदरांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मला खूप अभिमान आहे, हे वर्ष आपल्या माननीय पंतप्रधानांच्या परिवर्तनकारी दृष्टीकोन आणि नेतृत्वाचे प्रतीक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, मंत्रालयाने बंदर पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, परिचालन कार्यक्षमता वाढवणे आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागाला चालना देण्यासाठी अथक परिश्रम केले आहेत. यामुळे भारताच्या सागरी क्षेत्रात अभूतपूर्व वाढ झाली आहे.
ही ऐतिहासिक कामगिरी मंत्रालय, बंदर अधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहयोगी प्रयत्नांमुळे साध्य झाली आहे. त्यांचे समर्पण आणि वचनबद्धता या दशकाच्या प्रगतीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. विक्रमी मालवाहतूक हाताळणीपासून ते परिचालन मापदंड आणि आर्थिक कामगिरीमध्ये लक्षणीय सुधारणांपर्यंत, आर्थिक वर्ष 2024-25 मधील यश भारताच्या वाढत्या व्यापार महत्त्वाकांक्षांना पाठिंबा देण्यासाठी आपल्या बंदरांची लवचिकता आणि सज्जता दर्शवते.
नवनवी क्षितिजे गाठणे सुरू ठेवताना, मी सर्व भागधारकांचे त्यांच्या मजबूत पाठिंब्याबद्दल आणि योगदानाबद्दल मनापासून आभार मानतो. आपण एकत्रितपणे जागतिक स्तरावर स्पर्धात्मक, शाश्वत आणि भविष्यासाठी सज्ज बंदरे तयार करत आहोत, जी येत्या काळात भारताच्या आर्थिक वाढीला बळ देतील आणि जागतिक व्यापारात ठसा उमटवतील."
आर्थिक वर्ष 2014-15 ते आर्थिक वर्ष 2024-25 दरम्यान, मालवाहतुकीचे प्रमाण 581 दशलक्ष टनांवरून अंदाजे 855 दशलक्ष टनांपर्यंत वाढले, जे सुमारे 4% मजबूत चक्रवाढ वार्षिक वाढ दर (सीएजीआर) दर्शवते. कंटेनरयुक्त मालवाहतुकीत दशकात 70% लक्षणीय वाढ दिसून आली. आर्थिक वर्ष 2014-15 मधील 7.9 दशलक्ष टीईयू वरून ती आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 13.5 दशलक्ष टीईयूवर पोहोचली. गेल्या 10 वर्षांत कोळसा, खते, लोहखनिज आणि पीओएलसारख्या पारंपरिक वस्तूंमध्येही लक्षणीय वाढ दिसून आली.
उत्पादकता निर्देशकांमध्ये देखील लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे:
दशकभरात, आउटपुट पर शिप बर्थ डे (ओएसबीडी) 12,458 टनांवरून 18,304 टनांपर्यंत वाढले.
सरासरी टर्नअराउंड वेळ (टीआरटी ) 48% ने सुधारला, जो आर्थिक वर्ष 2014-15 मधील 96 तासांवरून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 49.5 तासांवर आला.
प्री-बर्थिंग डिटेन्शन (पीबीडी) कालावधी (पोर्ट अकाउंटवर) सुमारे 24% ने सुधारला, जो आर्थिक वर्ष 2014-15 मधील 5.02 तासांवरून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 3.8 तासांवर आला.
निष्क्रिय वेळ (%) सुमारे 29% ने कमी झाला, आर्थिक वर्ष 2014-15 मधील 23.1% वरून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 16.3%वर आला.
ही प्रगती मालवाहतूक हाताळणी प्रक्रिया वाढवण्यासाठी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि यांत्रिकीकरण उपक्रम सुरू करण्यासाठी मंत्रालयाची वचनबद्धता प्रतिबिंबित करतात.
प्रमुख बंदरांची आर्थिक कामगिरीही तितकीच प्रभावी राहिली आहे. गेल्या दशकभरात एकूण उत्पन्न दुप्पट झाले आहे, जे आर्थिक वर्ष 2014-15 मधील 11,760 कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 24,203 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. 10 वर्षांत सीएजीआर 7.5% झाला आहे. त्याच कालावधीत 13% सीएजीआरमुळे परिचालन अधिशेष जवळजवळ तिप्पट होऊन 12,314 कोटी झाला आहे. परिचालन कार्यक्षमतेतही लक्षणीय सुधारणा झाली आहे. कार्यवाहक गुणोत्तर आर्थिक वर्ष 2014-15 मधील 64.7% वरून आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये 42.3% पर्यंत घटले आहे, ज्यामुळे बंदरांच्या आर्थिक शाश्वततेला बळकटी मिळाली आहे.
भारतातील प्रमुख बंदरे आता त्यांची स्पर्धात्मकता पुढील स्तरावर नेण्यासाठी सज्ज असून त्यांना यांत्रिकीकरण, प्रक्रिया पुनर्अभियांत्रिकी, बंदर समुदाय प्रणाली आणि मल्टीमोडल लॉजिस्टिक्स एकात्मीकरणात सातत्यपूर्ण गुंतवणुकीचे पाठबळ आवश्यक आहे. या उपक्रमांमुळे मालवाहतुकीचे प्रमाण वाढले आहे, जहाजांच्या प्रतीक्षा वेळेत घट झाली आहे, क्षमतेचा वापर वाढला आहे आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.
भारत जागतिक व्यापारात आपला विस्तार करत असताना आणि लॉजिस्टिक्स पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करत असताना, आर्थिक वर्ष 2024-25 हे मंत्रालयाच्या धोरणात्मक दृष्टिकोनाचे आणि सार्वजनिक आणि खाजगी भागधारकांच्या सहयोगी प्रयत्नांचे प्रतीक आहे. बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालय ही गती टिकवून ठेवण्यासाठी आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक, डिजिटलदृष्ट्या सक्षम आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत बंदरे विकसित करण्यासाठी समर्पित असून यातून भविष्यात भारताच्या व्यापार आणि आर्थिक महत्त्वाकांक्षांना चालना मिळेल.
Jaydevi PS/S.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2128545)