गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत 1008 संस्कृत संभाषण शिबिरांच्या भव्य समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून लावली हजेरी


संस्कृत ही जगातील सर्वात वैज्ञानिक भाषांपैकी एक - अमित शहा यांचे प्रतिपादन

Posted On: 04 MAY 2025 7:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 मे 2025

 

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज, 3 मे 2025 रोजी नवी दिल्लीत 1008 संस्कृत संभाषण शिबिरांच्या भव्य समारोप समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली.

यावेळी अमित शहा यांनी नमूद केले की, अनेक प्रख्यात जागतिक विद्वानांनी संस्कृतला सर्वात वैज्ञानिक भाषा म्हणून मान्यता दिली आहे. भविष्याभिमुख दृष्टिकोनावर जोर देताना त्यांनी सांगितले की, संस्कृतच्या अवनतीच्या इतिहासावर विचार करण्याऐवजी, आता तिच्या पुनरुज्जीवनावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने संस्कृतच्या प्रचारासाठी विविध उपक्रम सुरू केल्याचे  शहा यांनी सांगितले. त्यांनी उल्लेख केला की, अष्टादशी योजनेअंतर्गत सुमारे 18 प्रकल्प राबवण्यात आले असून, भारत सरकार दुर्मीळ संस्कृत ग्रंथांचे  प्रकाशन, मोठ्या प्रमाणात खरेदी आणि पुनर्मुद्रणासाठी आर्थिक सहाय्य देत आहे. शिवाय, प्रख्यात संस्कृत विद्वानांचे मानधनही वाढवण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

   

केंद्रीय गृहमंत्री यांनी अधोरेखित केले की, मोदी सरकारचे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) भारतीय ज्ञान प्रणालीवर जोर देत असून, त्यात संस्कृत हा मध्यवर्ती आधारस्तंभ असल्याचे त्यांनी  अधोरेखित केले.  1981 पासून संस्कृत भारतीने केलेले कार्य खरोखरच अतुलनीय आहे, असे अमित शहा यावेळी म्हणाले. संस्कृतमधील गहन ज्ञानाचे पुनरुज्जीवन, प्रसार आणि सरलीकरण याद्वारे जगातील अनेक आव्हानांचे निराकरण शक्य आहे, असे त्यांनी नमूद केले.

आज इथे 1008 संस्कृत संभाषण शिबिरांचा समारोप झाला असून, 23 एप्रिलपासून 10 दिवसांच्या कालावधीत या शिबिरांद्वारे 17,000 हून अधिक सहभागींना संस्कृतची ओळख करून देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. या काळात त्यांनी संभाषणात्मक संस्कृतचा सरावही केला, त्यामुळे जनतेमध्ये या भाषेबद्दल अधिक रुची आणि उत्साह निर्माण होण्यास मदत होईल, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

संस्कृत ही बहुतांश भारतीय भाषांची जननी आहे, आणि तिचा प्रचार केवळ तिच्या पुनरुज्जीवनासाठीच नव्हे, तर राष्ट्राच्या एकूण प्रगतीसाठीही आवश्यक आहे. गेल्या हजारो वर्षांपासून विविध शाखांमधील विचारमंथनातून निर्माण झालेले विपुल ज्ञान संस्कृतमध्ये संरक्षित आहे, असे त्यांनी नमूद केले.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी सांगितले की, संस्कृत ही केवळ जगातील सर्वात वैज्ञानिक भाषाच नाही, तर तिची व्याकरण रचना अतुलनीय आहे.

संस्कृत ही छंद आणि अक्षरांचा परिष्कृत वापर करणारी पहिली भाषा होती. त्यामुळे ती आजही जिवंत आणि प्रासंगिक आहे, असेही त्यांनी सांगितले.

  

 

* * *

S.Bedekar/N.Chitre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2126837) Visitor Counter : 15