WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

“जागतिक मंचावर भारतातील देशी खेळांचा उदय” – वेव्हज 2025 मध्ये भारताच्या क्रीडा वारशाचा उत्सव साजरा करण्यासाठी आणि त्याच्या जागतिकीकरणासाठीचे आवाहन


देशी खेळ म्हणजे केवळ शारीरिक स्पर्धा नव्हे तर तो आपले समुदाय, परंपरा तसेच व्यक्तित्वाचा अविभाज्य भाग आहेत: ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी

खेलो इंडिया हा उपक्रम मुलभूत पातळीवरील क्रीडा प्रतिभा जोपासण्यात तसेच भारतीय क्रीडा विश्वाचे भविष्य घडवण्यात परिवर्तनकारी शक्ती ठरला आहे: केंद्रीय मंत्री रक्षा निखील खडसे

 Posted On: 04 MAY 2025 3:54PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 4 मे 2025

 

मुंबईतील वेव्हज कार्यक्रमात आयोजित उत्साहपूर्ण आणि विचारी गटचर्चेत स्वदेशी खेळांच्या समृद्ध वारशावर तसेच या खेळांनी भारताच्या भूमीवरून जागतिक मंचाच्या दिशेने केलेल्या विकासात्मक प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला. “देशी खेळ: भारताकडून जागतिक मंचाकडे वाटचाल” या शीर्षकाच्या सत्रात ‘भारतातील देशी खेळांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आणि यश मिळवून देण्याचे प्रयत्न’ या सामायिक संकल्पनेवर चर्चा करण्यासाठी प्रभावी धोरणकर्ते, सुप्रसिद्ध क्रीडापटू, क्रीडा उद्योजक आणि प्रमुख विचारवंत या कार्यक्रमात एकत्र आले.  

याप्रसंगी केलेल्या बीजभाषणात ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी भारतातील देशी खेळांची खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक मुळांचे उत्कटतेने दर्शन घडवले. “हे खेळ म्हणजे केवळ शारीरिक स्पर्धा नव्हे तर तो आपले समुदाय, परंपरा तसेच आपल्या व्यक्तित्वाचा अविभाज्य भाग आहेत,” ते म्हणाले. भारताला जागतिक क्रीडाविश्वाचे शक्तीकेंद्र बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असलेल्या दूरदर्शी नेतृत्वाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ओदिशा राज्याचे निवासी असलेल्या उत्साही आदिवासींनी या प्राचीन खेळांचे जतन केले आहे आणि हे राज्य आता क्रीडा केंद्र म्हणून उदयाला येत आहे हे त्यांनी ठळकपणे नमूद केले. “ग्रामीण प्रतिभांची जोपासना करणे तसेच प्रत्येक प्रतिभावान क्रीडापटूला त्याची कामगिरी सादर करण्यासाठी मंच उपलब्ध करून देणे यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत,” ते म्हणाले.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखील खडसे यांनी या महत्त्वपूर्ण चळवळीसंदर्भात अर्थपूर्ण संवादाला चालना दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच वेव्हज मंच यांच्याप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त केली. “भारत याआधीच योगाचा जागतिक राजदूत म्हणून उदयाला आला आहे. आता आपण आंतरराष्ट्रीय मंचावर खो-खो आणि कबड्डीसारखे आपले पारंपरिक खेळ प्रकार अभिमानाने सादर करत आहोत.” खेलो इंडिया हा उपक्रम तळागाळातील प्रतिभेला चालना देण्यात आणि भारतीय क्रीडा क्षेत्राचे  भविष्य घडवण्यासाठी एक परिवर्तनकारी शक्ती ठरत  आहे," असे त्यांनी  नमूद केले. खेळ केवळ शारीरिक तंदुरुस्तीला  प्रोत्साहन देत नाहीत तर संबंध देखील मजबूत करतात आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे सार प्रतिबिंबित करणारी एकता वृद्धिंगत करतात. 

प्रो कबड्डी लीगचे लीग कमिशनर अनुपम गोस्वामी यांनी क्रीडा बाजारपेठ म्हणून भारताच्या विशाल क्षमतेवर भर दिला. "प्रचंड भावनिक आणि सांस्कृतिक मूल्य असलेल्या  स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देऊन आपण या संधीचा लाभ उठवायला हवा", असे ते पुढे म्हणाले.

इराणचे प्रतिष्ठित पीकेएल खेळाडू फजेल अत्रचली यांनी कबड्डीमुळे जीवन कसे बदलले आहे याबाबत  सांगितले. "पीकेएलमुळे, कबड्डी हा एक व्यावसायिक खेळ बनला आहे, जो खेळाडूंना प्रसिद्धी आणि आर्थिक सुरक्षितता देत आहे", असे फजेल यांनी  सांगितले.

इंग्लिश क्रिकेट बोर्डाचे नियामक अध्यक्ष निक कोवार्ड यांनी जागतिकीकरण आणि आधुनिक वितरण चॅनेलचे महत्त्व अधोरेखित केले. "जगभरात पारंपारिक खेळांना लोकप्रिय करण्यासाठी, आपण ई-स्पोर्ट्ससह डिजिटल प्लॅटफॉर्मचा अवलंब करायला हवा", असे त्यांनी सांगितले.

खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी स्पष्ट केले  की खो-खो आता  55 देशांमध्ये खेळला जातो आणि वर्षाच्या अखेरीस 90 हून अधिक देशांमध्ये तो पोहोचण्याचे लक्ष्य आहे. "आपले स्वदेशी खेळ वैशिष्ट्यपूर्ण आहेत - त्यासाठी अधिक रणनीती, ताकद आणि उत्साह आवश्यक आहे. या खेळांमध्ये  जगाला आकर्षित करण्याची  प्रचंड क्षमता आहे. परंतु त्यांना सरकारी सहाय्य, ब्रँडिंग आणि राजनैतिक पाठिंब्याची आवश्यकता आहे", असे त्यांनी ठामपणे सांगितले.

फॅनकोडचे संस्थापक यानिक कोलाको यांनी तंत्रज्ञानाचा उल्लेख गेम-चेंजर असा केला.  "प्रवेश आणि सहभाग महत्त्वाचा आहे. योग्य तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण चाहत्यांबरोबर संबंध प्रस्थापित करू शकतो आणि भारतीय खेळांना जागतिक स्तरावर नेऊ शकतो", असेही त्यांनी सांगितले.

या सत्राचे संचालन मंत्र मुग्ध यांनी केले, त्यांनी वैविध्यपूर्ण माहिती आणि भविष्यवेधी रणनीतीची सांगड घालत अतिशय कौशल्याने चर्चा पुढे नेली.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/Sanjana/Sushma/D.Rane


Release ID: (Release ID: 2126752)   |   Visitor Counter: 19