माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज् – 2025 मध्ये स्मृतीरंजनापलीकडे संवर्धित अभिजात चित्रपटांचा व्यवसाय : विषयावर अभ्यासपूर्ण परिसंवादाचे आयोजन
अभिजात चित्रपट म्हणजे केवळ मनोरंजनाचा प्रकार नाही तर, ते आपली सामूहिक सांस्कृतिक ओळख आणि वारशाचे प्रतिबिंब : प्रकाश मगदूम
चित्रपटांच्या संवर्धनासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक, वेळ आणि कौशल्यपूर्ण साधन सामग्रीची आवश्यकता : शहजाद सिप्पी
आज नवीन आशय सामग्रीचा प्रचंड ओघ असला तरी, चित्रपट उद्योग क्षेत्राचे आधारस्तंभ असलेल्या मूळ चित्रपट कलाकृतींचे संवर्धन करण्याच्या दिशेन प्रयत्न आवश्यक : कमल गिआनचंदानी
Posted On:
03 MAY 2025 9:25PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 3 मे 2025
वेव्हज -2025 -जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदे मध्ये आज स्मृतीरंजनापलीकडे संवर्धित अभिजात चित्रपटांचा व्यवसाय (Beyond Nostalgia: The Business of Restored Classics) या विषयावरील निमंत्रित वक्त्यांचा अभ्यासपूर्ण परिसंवादात झाला. ख्यातनाम चित्रपट व्यवसाय विश्लेषक तरण आदर्श यांनी या परिसंवादाच्या सूत्रधाराची भूमिका पार पाडली. या परिसंवादाच्या निमित्ताने चित्रपट व्यवसाय उद्योग क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वे एकाच मंचावर आली होती. सर्वोत्कृष्ट चित्रपट कलाकृती समकालीन प्रेक्षकांसाठीही उपलब्ध असाव्यात या उद्देशाने अशा चित्रपटांचे संवर्धन करण्याचे महत्त्व, या प्रक्रियेतली आव्हाने आणि भविष्यातील शक्यता यावर विचारमंथन केले.

अभिजात चित्रपट डिजिटल व्यासपीठांवर सुलभतेने उपलब्ध करून देणे ही आजच्या काळाची गरज असल्याचे मत, चित्रपट प्रकाशन आणि वितरण क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व असलेल्या कमल गिआनचंदानी यांनी या चर्चेच्या सुरुवातीलाच मांडले. आपले अनेक चित्रपट सुलभतेने उपलब्ध नसल्यामुळे ते जनसामान्यांच्या स्मरणातून निघून जातात, असे त्यांनी सांगितले. आजही असंख्य प्रेक्षक त्यांना आपले अभिजात चित्रपट पुन्हा पाहायचे असल्याची इच्छा आपल्याकडे सातत्याने व्यक्त करत असल्याचा अनुभवही त्यांनी उपस्थितांना सांगितला. आज नव्या स्वरुपातल्या आशय सामग्रीचा प्रचंड ओघ असला तरी देखील, चित्रपट उद्योग क्षेत्राने आपला आधारस्तंभ ठरलेल्या मूळ चित्रपट कलाकृतींचे संवर्धन करण्याच्या दिशेन प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहनही त्यांनी केले.
शहजाद सिप्पी यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रातल्या उत्क्रांतीचा मागोवा घेत, मागील दशकातील कथात्मक मांडणीच्या शैलीतले वेगळेपण उपस्थितांसमोर मांडले आणि अभिजात सिनेमांच्या अद्वितीय वारशाची जाणिव उपस्थितांना करून दिली. त्या काळी चित्रपट निर्मिती ही एक वेगळीच कला होती आणि आजचे प्रेक्षकही त्या काळाचा अनुभव घेण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, चित्रपटांच्या संवर्धनासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक, वेळ आणि कौशल्यपूर्ण साधन सामग्रीची आवश्यकता असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.

प्रेक्षकांच्या पसंतीचा अंदाज बांधणे खूपच कठीण असल्याचे मत चित्रपट निर्माते आणि अभिनेता जॅकी भगनानी यांनी व्क्त केले. लोकांचा वेळ मौल्यवान आहे. त्यांना दर्जेदार आशय सामग्री हवी असते. प्रेक्षकांना नेमके काय भावेल हे अनेकदा व्यक्तिसापेक्ष, काळसापेक्ष असते, तसेच ते त्यांच्या मनःस्थितीवरही अवलंबून असल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले. मात्र कोणताही काळ असला तरी आम्ही कायमच स्वतःकडचे सर्वोत्कृष्ट देण्याचा प्रयत्न करत आलो आहोत ही बाबही त्यांनी ठळकपणे अधोरेखित केली.
धोरण आणि वारसा दृष्टिकोन मांडत, पत्र सूचना कार्यालय आणि केंद्रीय संचार ब्युरो, अहमदाबादचे अतिरिक्त महासंचालक प्रकाश मगदूम यांनी भारताच्या सिनेमॅटिक वारशाचे जतन करण्यासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा उल्लेख केला. "भारतीय लोकांना जुन्या आठवणीत रमायला आवडते. एकीकडे जुनी पिढी त्यांच्या तरुणपणातील जादू पुन्हा जगायचा प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे तरुण पिढी त्यांनी अभिजात चित्रपटांबाबत ऐकलेल्या गोष्टी अनुभवण्यास उत्सुक आहे. चित्रपट पुनर्संचयित करणे ही एक बारीकसारीक तपशिलांबाबत जागरुक राहण्याची प्रक्रिया आहे ज्यात अनेक हितधारकांचा समावेश असतो, परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानासह, आपण मूळ संकल्पनेशी प्रामाणिक राहू शकतो," असे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांनी भारत सरकारच्या नेतृत्वाखालील महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान या उपक्रमाबद्दल विस्तृत माहिती दिली, ज्याचा उद्देश चित्रपटविषयक खजिन्याचे जतन करणे, डिजिटायझेशन करणे आणि पुनर्संचयित करणे हा आहे. "जुने अभिजात चित्रपट निखळ मनोरंजनापेक्षाही आपल्या सामूहिक सांस्कृतिक अस्मिता आणि वारशाचे प्रतिबिंब आहेत. हे आव्हान खूप मोठे आहे, विशेषतः तापमान आणि आर्द्रता यासारख्या घटकांमुळे तसेच डिजिटल डेटा जतन करण्याच्या वाढत्या जटिलतेमुळे चित्रपट रील्सवर परिणाम होतो . मात्र तरीही, ही जबाबदारी तातडीने आणि समर्पित भावनेने पार पाडायला हवी ", असे मगदूम यांनी सांगितले.
या पॅनेलने आठवण करून दिली की, पुनर्संचयित जुने चित्रपट केवळ भूतकाळाचे अवशेष नाहीत तर संस्कृती, भावना आणि वारशाचे सजीव वाहक आहेत. पुनर्संचयनाच्या कामाला जसजशी गती मिळत आहे तसतसे हे स्पष्ट होत आहे की, तंत्रज्ञान, आवड आणि धोरण यांचे मिश्रण हे सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे ठरेल भारताचा चित्रपटविषयक वारसा भावी पिढ्यांना यापुढेही प्रेरणा देत राहील.
* * *
PIB Mumbai |S.Bedekar/Tushar/Sushma/D.Rane
Release ID:
(Release ID: 2126602)
| Visitor Counter:
21