WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वेव्हज 2025: 'लोकसंगीत म्हणजे एक जिवंत परंपरा' असल्याचे स्पॉटीफाय हाऊस सत्राने केले अधोरेखित


आधुनिकतेसोबत जुळवून घेत असताना लोकसंगीताचा आत्मा कायम राखण्याचा सहभागी तज्ज्ञांनी केला पुरस्कार

 Posted On: 03 MAY 2025 5:08PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 3 मे 2025

 

मुंबईमध्ये आयोजित वेव्हज शिखर परिषदेच्या (WAVES 2025) तिसऱ्या दिवशी ‘स्पॉटिफाय हाऊस: भारतातील लोकसंगीताची उत्क्रांती’ या विषयावर सत्र आयोजित करण्यात आले. ‘वेव्हज कल्चरल्स अँड कॉन्सर्ट्स’ या विभागांतर्गत आयोजित या सत्रामध्ये भारतातील लोकसंगीत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील धुरीण एकत्र आले आणि त्यांनी लोकसंगीताच्या जिवंत परंपरेवर चर्चा केली.

प्रसिद्ध कथाकथनकार आणि निवेदक रोशन अब्बास यांनी या चर्चेचे संचालन केले. या चर्चेमध्ये गीतकार व सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी, लोकगायिका मालिनी अवस्थी, संगीतकार नंदेश उमप, गायक आणि संगीतकार पॅपॉन आणि प्रख्यात कलाकार इला अरुण यांचा समावेश होता.

सहभागी कलाकारांनी भारतीय लोकसंगीताच्या जिवंत आणि सामूहिक परंपरेवर चर्चा केली. लोकसंगीत हे भूतकाळातील अवशेष नाहीत, तर दैनंदिन जीवनात खोलवर रुजलेली आणि पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होणारी शक्ती आहे, याविषयी सहमत व्यक्त केले. प्रसून जोशी यांनी लोकसंगीत म्हणजे “जीवनाचा स्पर्श” आणि सामायिक मानवी अनुभवांचीगती असललेली अभिव्यक्ती, असे वर्णन केले.

लोकसंगीताला मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नांभोवती देखील या चर्चेतील संवाद फिरत राहिला. या कलाकारांनी स्पॉटिफाय सारख्या व्यासपीठांचे आणि वेव्हज सारख्या उपक्रमाचे कौतुक केले, ज्यांनी लोकसंगीताला मोठ्या सांस्कृतिक मंचावर समाविष्ट केले आहे. नंदेश उमप यांनी लोकसंगीताच्या समावेशक आणि लोकशाही स्वरुपावर भर देत, ही कला म्हणजे एका प्रकारचे “मुक्त विद्यापीठ” असल्याचे सांगितले.

पॅपॉनने लोकसंगीतामधील त्यांच्या प्रवासाची गोष्ट सांगितली. त्यात आसामी लोकगीतांना उभे राहून टाळ्या मिळाल्याच्या सर्बियातील एका संस्मरणीय क्षणाचाही आठवण त्यांनी सांगितली. भारतीय लोककला जेव्हा प्रामाणिकपणे सादर केली जाते तेव्हा ती जागतिक स्तरावर कशी प्रतिध्वनीत होते, यावर त्यांनी प्रकाश टाकला. इला अरुण आणि मालिनी अवस्थी यांनीही याच भावनेला दुजोरा दिला आणि लोकसंगीताची मुळेसमूह तसेच लोकभावनेत आहेत, यावर भर दिला.

प्रसून जोशी म्हणाले, “जेव्हा तुम्ही स्वतःचा शोध घेता, तेव्हा तुम्ही कविता लिहिता. जेव्हा तुम्ही स्वतःला सापडता तेव्हा तुम्ही लोककथा लिहिता.. ” सामूहिकपणे रुजलेली आणि ती जगणाऱ्यांकडून सतत बदलणारी लोकसंस्कृतीची शैली या विधानाने नेमकी ओळखली गेली. प्रत्येक राज्य एक अद्वितीय संगीत प्रकार सादर करते असे सांगून, या पॅनेलने भारतीय लोकपरंपरेतील विशाल विविधतेवर भर दिला.

त्यांनी या विविधतेचे संगोपन करण्यासाठी पद्धतशीर पाठबळाचे आवाहन केले आणि पारंपारिक कलाप्रकारांना आघाडीवर आणणाऱ्या WAVES सारख्या व्यासपीठांना सक्षम बनवण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला दिले.

या चर्चेत नवोपक्रमाची गरज देखील मांडण्यात आली. लोकगीतांचे सार जपले पाहिजे यावर पॅनेल सदस्यांनी भर दिला, परंतु त्याचे स्वरूप नवीन पिढ्यांशी संवाद साधण्यासाठी विकसित झाले पाहिजे, असेही ते म्हणाले. त्यांनी सांस्कृतिक मुळांशी सच्चेपणा टिकवत समकालीन प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन दिले.

या सत्रात उत्स्फूर्त संगीतमय क्षण देखील आले. अनेक पॅनेल सदस्यांनी उत्स्फूर्त गायनात भाग घेतला आणि लोकगीताचा उत्साह जागा केला, त्यामुळे प्रेक्षकांना एक खरा आणि तल्लीन करणारा अनुभव मिळाला.

श्रोते, संस्था आणि निर्मात्यांना भारताच्या लोकसंगीताच्या वारशाचे समर्थन करण्याचे एकजुटीने आवाहन करून या सत्राचा शेवट झाला. लोकसंगीताचे केवळ जतन केले पाहिजे असे नाही तर, ते वेळोवेळी साजरे केले गेले पाहिजे आणि मोठ्या प्रमाणात त्याची देवघेव केली पाहिजे, असे आवाहन पॅनेल सदस्यांनी केले.

 

* * *

PIB Mumbai |S.Nilkanth/Shailesh/Hemangi/D.Rane


Release ID: (Release ID: 2126491)   |   Visitor Counter: 23