माहिती आणि प्रसारण मंत्रालय
भारताने एव्हीजीसी -एक्सआर मध्ये जागतिक दृष्टिकोन निर्धारित केला: आयआयसीटीने उद्योग धुरिणांसोबत धोरणात्मक सहकार्याला केली सुरुवात
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एव्हीजीसी -एक्सआर शिक्षण आणि नवोन्मेषात क्रांती घडवून आणण्यासाठी आयआयसीटीसाठी जागतिक कंपन्यांसोबतच्या सहकार्याला दाखवला हिरवा झेंडा
आयआयसीटीच्या स्थापनेतून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला जागतिक नेतृत्व बनवण्याचा पंतप्रधानांचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होतो : अश्विनी वैष्णव
Posted On:
03 MAY 2025 4:30PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 3 मे 2025
भारताच्या एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला सक्षम बनवण्याच्या दिशेने एक मोठी झेप घेत, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने, फिक्की आणि सीआयआयच्या सहकार्याने, केवळ एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रासाठी समर्पित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) - एक राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्राची स्थापना केली आहे.
या प्रसंगी उपस्थित केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या धोरणात्मक सहकार्याला औपचारिकरित्या हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक नेतृत्व बनण्याच्या भारताच्या क्षमतेवर भर दिला आणि सांगितले की, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शिक्षणात आयआयटी आणि आयआयएम ज्या प्रकारे मापदंड बनले आहेत त्याचप्रमाणे आयआयसीटी या क्षेत्रातील एक प्रमुख संस्था बनण्याच्या मार्गावर आहे.

वेव्हज 2025 च्या उद्घाटनप्रसंगी करण्यात आलेल्या घोषणेला आज मुंबईत सुरू असलेल्या वेव्हज शिखर परिषदेदरम्यान केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी औपचारिक रूप दिले. केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले की एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील व्यावसायिक बनू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठे जागतिक दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण केंद्र म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी आयआयसीटी भारतातील आयआयटी आणि आयआयएमच्या नमुन्याचे अनुसरण करेल.
"चित्रपट आणि मनोरंजन विश्वात पूर्णपणे नवीन असा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. हा (उपक्रम) माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला जागतिक नेतृत्व बनू शकतो या पंतप्रधानांच्या दृष्टिकोनाचे अनुसरण करतो " असे वैष्णव म्हणाले. सहकार्य करण्याची तयारी दर्शविणाऱ्या उद्योग भागीदारांचे त्यांनी मनापासून आभार मानले. आघाडीच्या जागतिक कंपन्यांनी अभ्यासक्रम विकास, इंटर्नशिप, शिष्यवृत्ती, स्टार्टअपना निधीपुरवठा आणि नोकरी मिळवून देण्यासाठी मदत करण्यासाठी आयआयसीटीसोबत भागीदारी करण्यास सहमती दर्शवल्याचे त्यांनी जाहीर केले.
"या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी करण्याची तयारी दर्शविल्याबद्दल मी सर्व उद्योग भागीदारांचे आणि त्यांच्या वरिष्ठ व्यवस्थापनाचे आभार मानतो. ते आम्हाला ही संस्था उभी करण्यात आणि दीर्घकालीन वाढ टिकवून ठेवण्यास मदत करतील. मला आशा आहे की आयआयसीटी (AVGC-XR) क्षेत्रासाठी एक मोठी शैक्षणिक पायाभूत सुविधा बनेल. आम्ही आमच्या देशातील आयआयटी आणि आयआयएमसाठी तयार केलेल्या निकषांचे पालन करू, जेणेकरून ती जागतिक दर्जाची संस्था बनेल ," असे वैष्णव म्हणाले.

दीर्घकालीन सहकार्यासाठी मदतीचा हात पुढे करणाऱ्या काही कंपन्यांमध्ये जिओ स्टार ,ऍडोब , गुगल आणि युट्युब , मेटा , वाकॉम, मायक्रोसॉफ्ट आणि एनव्हीआयडीआयए (NVIDIA) यांचा समावेश आहे.
या समारंभात उपस्थित असलेल्या उद्योजकांमध्ये रिचर्ड केरिस, (उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक मीडिया अँड एंटरटेनमेंट, एनव्हीडिया), संजोग गुप्ता (सीईओ, स्पोर्ट्स अँड लाईव्ह एक्सपिरीयन्सेस, जिओ स्टार), माला शर्मा (उपाध्यक्ष आणि महाव्यवस्थापक - एज्युकेशन, अॅडोब), प्रीती लोबाना (कंट्री हेड आणि उपाध्यक्ष, गुगल इंडिया), राजीव मलिक (वरिष्ठ संचालक, वॅकॉम), संदीप बांदीबेकर (सेल्स प्रमुख, राज्य सरकार आणि आरोग्यसेवा), संदीप बांदीवडेकर (संचालक, मेनस्ट्रीम सर्व्हिसेस पार्टनर्स, मायक्रोसॉफ्ट) आणि सुनील अब्राहम (संचालक, सार्वजनिक धोरण, मेटा) यांचा समावेश होता.
आयआयसीटीचे संचालक मंडळाचे सदस्य आणि नियामक परिषदेचे सदस्य आशिष कुलकर्णी, बिरेन घोष, मानवेंद्र शुकुल, मुंजाल श्रॉफ, चैतन्य चिंचलीकर आणि सुभाष सप्रू आज उपस्थित होते. आयआयसीटीच्या कार्यकारी चमूमध्ये आयआयसीटीचे सीईओ डॉ. विश्वास देवस्कर, आयआयसीटीचे सीईओ निनाद रायकर आणि आयआयसीटीच्या विपणन प्रमुख श्वेता वर्मा यांचा समावेश आहे.
या सत्रादरम्यान, आयआयसीटी आणि आघाडीच्या उद्योग भागीदारांचे प्रतिनिधी एकत्र आले आणि त्यांनी इरादा पत्रांचे आदानप्रदान करून भारतातील एव्हीजीसी-एक्सआर परिसंस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने दीर्घकालीन सहयोगी प्रयत्नांचा शुभारंभ केला. स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये जिओस्टार, अॅडोब, गुगल, यूट्यूब आणि मेटा यासारख्या आघाडीच्या जागतिक उद्योग कंपन्यांचा समावेश होता.
अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स, चित्रपट आणि विस्तारित वास्तवात शिक्षण, संशोधन आणि विकास आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी या सहकार्याची रचना केली आहे. भविष्यातील वाढीसाठी एक शाश्वत परिसंस्था विकसित करून सृजनशील आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात भारताच्या यशस्वी आयटी मॉडेलची प्रतिकृती तयार करणे हे याचे उद्दिष्ट आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन; माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू; आणि पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा हे करारांच्या आदानप्रदान प्रसंगी उपस्थित होते.
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Kane/D.Rane
Release ID:
(Release ID: 2126479)
| Visitor Counter:
29