WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘इंडिया सिने हब’ कडे भारतात चित्रीकरणासाठी रस दाखवणारे वर्षभरामध्‍ये शंभर अर्ज: एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रिथुल कुमार यांची माहिती


आगामी काळात अनेक परदेशी सिनेमांची निर्मिती भारतात होईल, याकडे अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी वेधले लक्ष

आवडत्या चित्रपटांमधील अनेक ठिकाणे भारतातील लोकप्रिय पर्यटन स्थळे बनली - प्रोड्यूसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे सीईओ नितीन तेज आहुजा यांनी केला उल्लेख

वेव्हज 2025 मध्ये ‘लाईट्स, कॅमेरा, डेस्टिनेशन! ब्रँडिंग इंडिया थ्रू फिल्म्स’ या विषयावर समूह चर्चा

 Posted On: 02 MAY 2025 11:00PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 2 मे 2025

 

“ही भारताची वेळ आहे; जगभरात सर्वजण हे जाणतात” असा गौरवपूर्ण उल्लेख अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी शुक्रवारी मुंबईत आयोजित वेव्हज 2025 मध्ये ‘लाईट्स, कॅमेरा, डेस्टिनेशन! ब्रँडिंग इंडिया थ्रू फिल्म्स’ या समूह  चर्चेदरम्यान केला.

चर्चेतील इतर समूह  सदस्यांमध्ये एनएफडीसीचे सहसचिव (आय अँड बी) आणि व्यवस्थापकीय संचालक प्रिथुल कुमार, प्रोड्यूसर्स गिल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन तेज आहुजा, गुजरात सरकारचे सचिव (पर्यटन) राजेंद्र कुमार, आयटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक मुग्धा सिन्हा यांचा समावेश होता.

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेले ‘इंडिया सिने हब’  (आयसीएच) जगभरातील चित्रपट निर्माते आणि निर्मात्यांसाठी भारतामध्‍ये  चित्रपटाच्या चित्रीकरणाला प्रोत्साहन आणि सुविधा देते अशी माहिती एनएफडीसीचे सहसचिव आणि व्यवस्थापकीय संचालक प्रिथुल कुमार यांनी दिली. ते म्हणाले की, भारतात चित्रीकरणासाठी हे ‘वन-स्टॉप डेस्टिनेशन’  आहे, जे चित्रपट चित्रीकरणाच्या सुलभीकरणासाठी विविध राज्य पोर्टलशी जोडले गेले आहे.  एकल-खिडकी सुविधा आणि मंजुरी यंत्रणेव्दारे काम केले जाते. त्यामुळे  भारतात चित्रीकरण करणे सुलभ होते, तसेच चित्रपट-अनुकूल परिसंस्था तयार करण्यासाठी आणि देशाला चित्रीकरणाचे ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करते. 2023 मध्ये प्रोत्साहने वाढवल्याने व्यवसायात दहापट वृद्धी झाली आहे आणि पोर्टलवर भारतात चित्रीकरण करण्यासाठी शंभराहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. या प्रोत्साहनांमुळे भारत परदेशी चित्रपट निर्मात्यांसाठी एक आकर्षक चित्रीकरण स्थळ बनला आहे.

येत्या काळात बरीच परदेशी निर्मिती भारतात येणार आहे याकडे अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनी लक्ष वेधले. "आपल्या चित्रपटांमुळे जगातील अनेक भागांतील लोकांना मुंबईबद्दल माहिती आहे", असेही त्यांनी सांगितले. भारतातील विविध ठिकाणी चित्रीकरण करण्याच्या पसंतीबद्दल बोलताना भूमी पेडणेकर म्हणाल्या, "माझे बहुतेक चित्रपट सांस्कृतिकदृष्ट्या गहन, हृदयस्पर्शी असतात. आमचा जज्बा आणि आमच्या चित्रपटावरील प्रेम, आमचे कलाकार आणि कर्मचारी सदस्य ज्या पद्धतीने समर्पणाने काम करतात ते अतुलनीय आहे".

भारतातील चित्रपट उद्योगावर प्रकाश टाकताना भूमी पेडणेकर म्हणाल्या की, आता चित्रपटाच्या सेटवर जवळजवळ समान संख्येने पुरुष आणि महिला काम करतात.  आता  भारतात चित्रपट निर्मितीमध्ये येणारी मान्यवर मंडळींची संख्या वाढत चालली असल्याची माहिती दिली.

नितीन तेज आहुजा म्हणाले की, लोकप्रिय चित्रपटांमधील अनेक ठिकाणे भारतातील लोकप्रिय पर्यटन स्थळे बनली आहेत. गुलमर्गमधील 'बॉबी' बंगला, डीडीएलजेने लोकप्रिय केलेले पंजाबमधील पिवळ्या मोहरीचे शेत, 'जब मी मेट' मध्ये प्रदर्शित झालेला रतलाम ते भटिंडा रेल्वे प्रवास, 'थ्री इडियट्स' मधील दृश्ये जिथे चित्रित करण्यात आली होती तो पँगोंग तलाव ही काही उदाहरणे आहेत. 'दिल चाहता है' प्रदर्शित झाल्यापासून भारतातील तरुण  आपल्या मित्रांसोबत गोव्यात प्रवास करू लागले, असेही त्यांनी सांगितले.

चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी देश आपल्या संस्था उघडण्याचा विचार करू शकतो असे मत आयटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक मुग्धा सिन्हा यांनी व्यक्त केले. देशातील चित्रपट निर्मिती आणि पर्यटनासाठी ही सर्वात योग्य वेळ असल्याचे त्यांनी सांगितले. गुजरात सरकारचे सचिव (पर्यटन) राजेंद्र कुमार यांनी गुजरातमध्ये चित्रित केलेल्या चित्रपटांद्वारे पर्यटनाला चालना देण्यासाठी गुजरात सरकारने घेतलेल्या पुढाकारांबद्दल माहिती दिली,  जसे की चित्रीकरण झालेल्या ठिकाणाचा गौरवपूर्ण उल्लेख करणे. सकारात्मक धोरणात्मक आदर्श, चांगली पायाभूत सुविधा आणि चित्रीकरणासाठी परवानगी मिळण्याची सोय यामुळे चित्रपट निर्माते राज्यात आकर्षित होत आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

या सत्राचे सूत्रसंचालन क्रिएटिव्ह इकॉनॉमी फोरमच्या संस्थापक सुप्रिया सुरी यांनी केले.

 

* * *

PIB Mumbai |S.Bedekar/V.Joshi/D.Rane


Release ID: (Release ID: 2126403)   |   Visitor Counter: 19