माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज 2025 सत्रांमध्ये क्रीडा आणि तंत्रज्ञानातील नवोन्मेषांचा वेध
वेव्हज 2025 मध्ये सौदी अरेबियाच्या ई-स्पोर्ट्स महत्त्वाकांक्षा प्रकाशझोतात
दृष्टी, गुंतवणूक आणि नवोपक्रम सौदी गेमिंग वाढीला देतात चालना
“आज माध्यम आणि तंत्रज्ञान तुमच्या किटमधील हेल्मेटसारखे अत्यावश्यक:” वेव्हज 2025 मध्ये रवी शास्त्री यांचे प्रतिपादन
Posted On:
02 MAY 2025 9:56PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 2 मे 2025
मुंबईत सुरू असलेल्या वेव्हज 2025 च्या दुसऱ्या दिवशी क्रीडा आणि ई-स्पोर्ट्सच्या भवितव्यावर दोन लक्षवेधी चर्चा झाल्या. ज्यामध्ये माध्यम, तंत्रज्ञान आणि कथाकथन जागतिक सहभागाला कसे आकार देत आहेत यावर विशेष लक्ष केंद्रित केले गेले.
गेमिंग क्रांती: भविष्यासाठी एक धाडसी दृष्टीकोन
"बिल्डिंग ए ग्लोबल पॉवरहाऊस: गेमिंग आणि ई-स्पोर्ट्ससाठी सौदी अरेबियाचे व्हिजन" या शीर्षकाच्या उच्च-प्रभावी औपचारिक संभाषणात, सौदी ई-स्पोर्ट्स फेडरेशनचे अध्यक्ष फैजल बिन बंदर बिन सुलतान अल सौद यांनी जागतिक ई-स्पोर्ट्स क्षेत्राची पुनर्परिभाषा करण्यासाठी राज्याच्या व्यापक योजना सादर केल्या. जेटसिंथेसिसचे मुख्य धोरण अधिकारी गिरीश मेनन यांनी घेतलेल्या या सत्रात, राज्याची युवा-चालित धोरणे, धोरणात्मक गुंतवणूक आणि जागतिक भागीदारी सौदी अरेबियाला गेमिंग आणि ई-स्पोर्ट्स नवोपक्रमासाठी उदयोन्मुख केंद्रात कसे रूपांतरित करत आहेत याचा धांडोळा घेण्यात आला.
त्यांच्या लोकसंख्येच्या 67% पेक्षा जास्त लोक गेमर म्हणून ओळखले जात असल्याने, सौदी अरेबिया दीर्घकालीन शाश्वततेसाठी संरचित केलेली परिसंस्था विकसित करत आहे. गेमर्स विदाऊट बॉर्डर्स सारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमांपासून ते ईस्पोर्ट्स विश्वचषकाच्या आयोजनापर्यंत, देश आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आघाडीवर आहे.

या दृष्टिकोनाचा आधारस्तंभ सौदी ईस्पोर्ट्स अकादमी आहे जी तरुण व्यावसायिकांसाठी अर्थपूर्ण करिअर मार्ग तयार करण्यासाठी - कोचिंग, इव्हेंट प्रोडक्शन, गेम डेव्हलपमेंट - अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण प्रदान करते. समुदाय सहभाग आणि सीमापार सहकार्यावर आधारित समावेशक आणि व्यापक उद्योजकतेला चालना देत फेडरेशनचे प्रयत्न सर्जकांच्या उदयाला देखील समर्थन देत आहेत.
सौदी अरेबियाचे ध्येय केवळ स्पर्धांपुरते मर्यादित नसल्याचे महामहिम फैजल यांनी ठळकपणे अधोरेखित केले. ही बाब संधी निर्माण करणे, परिसंस्था घडवणे तसेच ज्यावेळी एखादा देश संसाधने, दृष्टीकोन आणि प्रतिभेचा संगम घडवून आणतो तेव्हा काय काय शक्य होऊ शकते हे दाखवून देण्याशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले. या निमित्ताने महामहिम फैजल यांनी या चर्चेमध्ये मांडलेल्या दृष्टिकोनातून सौदी अरेबिया आगामी दशकात जागतिक गेमिंगच्या क्षेत्राला नवीन आयाम देऊ पाहात असल्याची बाब अधोरेखित झाली.
खेळांचे बदलते स्वरूप : माध्यम जगत, तंत्रज्ञान आणि मानवी संबंध
दिवसाच्या सुरुवातीलाच ‘Sports, Technology, Entrepreneurship & Media – The REAL Stem’ अर्थात , क्रीडा, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि माध्यमे – ख़ऱ्या अर्थाचे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (क्रीडा, तंत्रज्ञान) या विषयावरील निमंत्रितांचा परिसंवाद झाला. या परिसंवादाच्या निमित्ताने क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू रवी शास्त्री यांच्यासह प्रशांत खन्ना (जिओस्टार), नुल्लाह सरकार (कॉस्मॉस), विक्रांत मुदलियार (ड्रीम स्पोर्ट्स) आणि धवल पोंडा (टाटा कम्युनिकेशन्स) ही क्रीडा परिसंस्थेशी संबंधित मान्यवर दिग्गज एकाच मंचावर आली, तर निर्माते आणि उद्योजक धीर मोमाया यांनी या सत्राच्या सूत्रधाराची भूमिका पार पाडली.
रवी शास्त्री यांनी माध्यमे आणि तंत्रज्ञानामुळे क्रिकेटमध्ये झालेल्या बदलांवर आपले विचार व्यक्त केले. आज माध्यमे आणि तंत्रज्ञान म्हणजे खेळाडूच्या संचामधील हेल्मेटसारखे अत्यावश्यक घटक झाले असल्याची बाब त्यांनी नमूद केली. चाहत्यांचा सहभाग आणि खेळाडूंची ब्रँडिंगही कशारितीने वाढली आहे याबद्दलही त्यांनी आपले विचार मांडले. आपली स्वतःची वाटचालही एखाद्या लाटेप्रमाणेच (WAVES) असून ती वैयक्तिक यशाचे शिखर आणि क्रीडा क्षेत्राच्या व्यापक उत्क्रांतीचे प्रतीक आहे असे ते म्हणाले.

या परिसंवादातील चर्चेमधून सहभागी झालेल्या वक्त्यांनी जीवंतपणाचा अनुभव देणारी भासमान दृश्ये, फँटसी गेमिंग आणि कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाधारीत आशय वैयक्तिकरणासारख्या तंत्रज्ञानात्मक प्रगतीकडे उपस्थितांचे लक्ष वेधले, आणि ही घडामोड चाहते खेळांशी जोडले जाण्याच्या प्रक्रियेला कशारितीने नवा आयाम देत आहेत, ही बाब उलगडून सांगितली. क्रीडा परिसंस्थेतील फँटसी व्यासपीठांमुळे एका अर्थाने निष्क्रिय असलेल्या प्रेक्षकांना कशा रितीने थेट सहभागींमध्ये रुपांतरीत केले आहे याविषयी सांगितले. प्रशांत खन्ना यांनी सांकेतिक भाषेतील समालोचन आणि सानुकूल दृश्य मालिकेसारख्या सर्वसमावेशक साधनांची परिणामकारता अधोरेखित केली.
नुल्लाह सरकार यांनी कथात्मक मांडणीच्या महत्त्वाविषयी सांगितले. चाहते केवळ आकडेवारीचा माग घेत नाहीत तर ते व्यक्तिंशी जोडले जातात असे त्यांनी सांगितले. धवल पोंडा यांनीही असेच विचार व्यक्त केले. क्रीडा घडामोडींचे थेट प्रक्षेपण हा जागतिक पातळीवर आशय सामग्री निर्मितीच्या उपभोग्यतेचा गाभा झाला असल्याचे ते म्हणाले. तसेच आता तंत्रज्ञानामुळे या सुविधेचा अगदी व्यक्तिगत स्तरावर अनुभव घेणे शक्य झाले असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.
क्रीडा क्षेत्र, तंत्रज्ञान आणि माध्यमांच्या भविष्याला कोणत्याही सीमा नाहीत, आत्ता कुठे केवळ सुरुवातच झाली आहे, असा आशावाद व्यक्त करत रवी शास्त्री यांनी या परिसंवादाचा समारोप केला.
* * *
PIB Mumbai |S.Bedekar/Vasanti/Tushar/D.Rane
Release ID:
(Release ID: 2126365)
| Visitor Counter:
19