पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशात अमरावती येथे, 58,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकासकामांची केली पायाभरणी आणि उद्घाटन


आज सुरू केलेली विकासकामे आंध्र प्रदेशच्या पायाभूत सुविधा बळकट करतील आणि विकासाला गती देतील: पंतप्रधान

अमरावती ही अशी भूमी आहे जिथे परंपरा आणि प्रगती परस्परांसोबत वाटचाल करतात: पंतप्रधान

एनटीआर गारु यांनी विकसित आंध्र प्रदेशाचे स्वप्न पाहिले होते. एकत्रितपणे, आपल्याला अमरावती, आंध्र प्रदेशला विकसित भारताचे विकासाचे इंजिन बनवायचे आहे: पंतप्रधान

ज्या देशांमध्ये पायाभूत सुविधांचे वेगाने आधुनिकीकरण होत आहे, अशा देशांमध्ये आता भारताचा समावेश आहे: पंतप्रधान

विकसित भारताची उभारणी - गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला शक्ती या चार स्तंभांवर होईल: पंतप्रधान

नागयालंका येथे उभारण्यात येणार असलेला नवदुर्गा चाचणी तळ देशाच्या संरक्षण शक्तीला माँ दुर्गेप्रमाणे बळकट करेल, त्यासाठी मी देशातील शास्त्रज्ञांचे आणि आंध्र प्रदेशातील जनतेचे अभिनंदन करतो: पंतप्रधान

Posted On: 02 MAY 2025 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 मे 2025

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशात अमरावती येथे 58,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले. अमरावतीच्या या पवित्र भूमीवर उभे राहून, आपल्याला केवळ एक शहर दिसत नाही, तर एक स्वप्न साकार होताना दिसत आहे—एक नवीन अमरावती, एक नवीन आंध्र, अशी भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली. "अमरावती ही एक अशी भूमी आहे जिथे परंपरा आणि प्रगती या परस्परांसोबत वाटचाल करतात, बौद्ध वारशाची शांतता आणि एका विकसित भारताची ऊर्जा या दोहोंचा अंगिकार केला जातो, असे पंतप्रधानांनी नमूद केले. आज ज्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आले आहे, ते प्रकल्प केवळ काँक्रीटच्या संरचना नाहीत, तर आंध्र प्रदेशच्या आकांक्षा आणि भारताच्या विकासाच्या दृष्टीकोनाचा मजबूत पाया आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. भगवान वीरभद्र, भगवान अमरलिंगेश्वर आणि तिरुपती बालाजी यांना वंदन करून पंतप्रधान मोदी यांनी आंध्र प्रदेशच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. त्यांनी मुख्यमंत्री  चंद्राबाबू नायडू आणि उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनाही शुभेच्छा दिल्या.

एकेकाळी इंद्रलोकाच्या राजधानीला अमरावती म्हटले जात होते आणि आता अमरावती आंध्र प्रदेशची राजधानी आहे, असे मोदी यांनी सांगितले. हा केवळ योगायोग नाही, तर 'स्वर्ण आंध्र' निर्माण करण्याचा एक सकारात्मक संकेत आहे, जो भारताच्या विकासाच्या मार्गाला अधिक मजबूत करेल, यावर त्यांनी भर दिला. अमरावती 'स्वर्ण आंध्र'च्या दृष्टीकोनाला ऊर्जा देईल, ज्यामुळे ते प्रगती आणि परिवर्तनाचे केंद्र बनेल, असे पंतप्रधानांनी सांगितले. "अमरावती हे केवळ एक शहर नाही, ती एक शक्ती आहे, ती एक अशी ताकद आहे जी आंध्र प्रदेशला आधुनिक राज्यात आणि प्रगत राज्यात रूपांतरित करेल," असे मोदी तेलुगू भाषेत म्हणाले.

आंध्र प्रदेशातील तरुणांची स्वप्नपूर्ती करणारे शहर म्हणून अमरावतीकडे बघताना येत्या काळात अमरावती माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा, स्वच्छ उद्योग, शिक्षण आणि आरोग्यसेवेत आघाडीचे शहर म्हणून उदयास येईल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या क्षेत्रांमध्ये विकासाला गती देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा जलदगतीने विकसित करण्यात केंद्र सरकार राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा देत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

मोठ्या प्रमाणावर भविष्यातील तंत्रज्ञानाचा दृष्टिकोन ठेवून तो जलदगतीने राबविण्यासाठी चंद्राबाबू नायडू यांच्या प्रगल्भतेचे मोदी यांनी कौतुक केले. 2015 मध्ये, त्यांना प्रजा राजधानीची पायाभरणी करण्याचे सौभाग्य मिळाले होते याची आठवण सांगत, गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने अमरावतीच्या विकासासाठी व्यापक पाठिंबा दिला आहे, मूलभूत पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलली आहेत यावर त्यांनी भर दिला. नायडू यांच्या नेतृत्वाखाली, नवीन राज्य सरकारने विकासाच्या प्रयत्नांना गती दिल्याचे त्यांनी नमूद केले. उच्च न्यायालय, विधानसभा, सचिवालय आणि राजभवन यासारख्या महत्त्वाच्या संस्थांना आता बांधकामासाठी प्राधान्य दिले जात आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला.

"एनटीआर गारू यांनी विकसित आंध्र प्रदेशची कल्पना केली होती", असे पंतप्रधानांनी सांगितले. अमरावती आणि आंध्र प्रदेशला विकसित भारताचे विकास इंजिन बनवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन करत, एनटीआर गारू  यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या बांधिलकीचे त्यांनी समर्थन केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना संबोधित करताना पंतप्रधानांनी तेलुगूमध्ये सांगितले की ही आपली जबाबदारी आहे आणि आपण एकत्रितपणे हे साध्य केले पाहिजे.

गेल्या 10 वर्षांत भारताने भौतिक, डिजिटल आणि सामाजिक पायाभूत सुविधांवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित केले आहे यावर भर देताना, मोदी यांनी अधोरेखित केले की भारत आता जगातील सर्वात वेगाने आधुनिकीकरण करणाऱ्या पायाभूत सुविधांपैकी एक आहे आणि आंध्र प्रदेश या प्रगतीचा लक्षणीय फायदा घेत आहे. हजारो कोटी रुपयांच्या रस्ते आणि रेल्वे प्रकल्पांची तरतूद आंध्र प्रदेशसाठी करण्यात आल्याने त्याचा जलद विकास होईल असे त्यांनी नमूद केले. "आंध्र प्रदेश कनेक्टिव्हिटीचे एक नवीन युग अनुभवत आहे, ज्यामुळे दोन जिल्ह्यांमधील दळणवळण  वाढेल आणि शेजारील राज्यांशी कनेक्टिव्हिटी सुधारेल", असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांना मोठ्या बाजारपेठांमध्ये प्रवेश करणे सोपे होईल आणि सुधारित लॉजिस्टिक कार्यक्षमतेचा फायदा उद्योगांना होईल यावर त्यांनी भर दिला. पर्यटन आणि तीर्थक्षेत्रे यांना देखील चालना मिळून प्रमुख धार्मिक स्थळे अधिक सुलभ होतील याकडेही मोदींनी लक्ष वेधले. त्यांनी रेनिगुंटा-नैदुपेटा महामार्गाचे उदाहरण देत म्हटले की, यामुळे तिरुपती बालाजी मंदिरापर्यंत पोहोचणे सोपे होईल आणि भाविकांना अल्पावधीत भगवान वेंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेता येईल.

वेगाने विकसित झालेल्या देशांनी त्यांच्या रेल्वे नेटवर्कला खूप महत्त्व दिले आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला. गेल्या दशकात भारतीय रेल्वेसाठी परिवर्तनाचा काळ होता, भारत सरकारने आंध्र प्रदेशात रेल्वे विकासासाठी विक्रमी निधी दिल्याचे  त्यांनी अधोरेखित केले. 

पंतप्रधानांनी निदर्शनास आणून दिले की,  2009 ते 2014 दरम्यान आंध्र प्रदेश आणि तेलंगणासाठी एकत्रित रेल्वे अर्थसंकल्प 900 कोटींपेक्षा कमी होता, तर आज एकट्या आंध्र प्रदेशचा रेल्वे अर्थसंकल्प 9,000 कोटींपेक्षा जास्त आहे म्हणजेच दहा पटीने जास्त आहे. “वाढवलेल्या रेल्वे अर्थसंकल्पासह आंध्र प्रदेशने 100% रेल्वे विद्युतीकरण साध्य केले आहे”, असे पंतप्रधानांनी नमूद केले. राज्यात आता आधुनिक वंदे भारत गाड्यांच्या आठ जोड्या धावतात. त्यासोबतच आंध्र प्रदेशातून जाणारी अमृत भारत गाडी देखील धावते . गेल्या 10 वर्षांत, राज्यात 750 हून अधिक रेल्वे उड्डाणपूल आणि भूमिगत मार्ग  बांधण्यात आले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. याव्यतिरिक्त, पंतप्रधानांनी सांगितले की अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत आंध्र प्रदेशातील 70 हून अधिक रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण केले जात आहे, ज्यायोगे प्रवाशांसाठी जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा सुनिश्चित केली जात आहे.

पायाभूत सुविधांच्या विकासाचा बहुआयामी परिणाम अधोरेखित करताना, त्याचा उत्पादन क्षेत्रावरील थेट परिणाम अधोरेखित करताना मोदी यांनी नमूद केले की, मोठ्या प्रमाणावरील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे सिमेंट, पोलाद आणि वाहतूक सेवा यासारख्या कच्च्या मालाचा मोठा फायदा होतो, ज्यामुळे अनेक उद्योगांना बळकटी मिळते. पायाभूत सुविधांच्या विकासाचा थेट फायदा भारतातील तरुणांना होतो, ज्यामुळे रोजगाराच्या अधिक संधी निर्माण होतात यावर त्यांनी भर दिला. त्यांनी नमूद केले की आंध्र प्रदेशातील हजारो तरुणांना या सुरू असलेल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांद्वारे नवीन रोजगाराच्या संधी मिळत आहेत.

"विकसित भारताचा पाया चार प्रमुख स्तंभांवर उभा आहे - गरीब, शेतकरी, तरुण आणि महिला सक्षमीकरण", या लाल किल्ल्यावरील आपल्या भाषणातील विधानाचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. त्यांनी भर दिला की,  हे स्तंभ त्यांच्या सरकारच्या धोरणांमध्ये केंद्रस्थानी आहेत. सरकारकडून  शेतकऱ्यांच्या कल्याणाला विशेष प्राधान्य दिले जाते. शेतकऱ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी भारत सरकारने गेल्या 10 वर्षांत, परवडणाऱ्या किमतीत खते पुरवण्यासाठी जवळजवळ 12 लाख कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यांनी नमूद केले की, हजारो नवीन आणि प्रगत वाणाची  बियाणे  शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले  आहे, ज्यामुळे कृषी उत्पादकता वाढली आहे. पंतप्रधान म्हणाले की, पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांना ₹5,500 कोटींचे दावे निकाली काढण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत आंध्र प्रदेशातील लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात 17,500 कोटींहून अधिक रक्कम थेट हस्तांतरित करण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांच्या उपजीविकेसाठी आर्थिक आधार मिळतो, असे ते म्हणाले.

भारत देशभरात सिंचन प्रकल्पांचा वेगाने विस्तार करत आहे, तसेच प्रत्येक शेतात पाणी पोहोचावे आणि शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी नदीजोडणी उपक्रम सुरू करत आहे यावर भर देत नवीन राज्य सरकारच्या स्थापनेसह पोलावरम प्रकल्पाला नवीन गती मिळाली आहे, असे मोदी यांनी अधोरेखित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, या प्रकल्पामुळे आंध्र प्रदेशातील लाखो लोकांचे जीवन बदलणार आहे. त्यांनी पोलावरम प्रकल्पाच्या त्वरित पूर्ततेसाठी राज्य सरकारला पूर्ण पाठिंबा देत असल्याचा  पुनरूच्चार  केला.

आंध्र प्रदेशाने गेल्या काही दशकांत भारताला अंतराळ शक्ती म्हणून स्थापित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे नमूद करत, पंतप्रधान म्हणाले की, श्रीहरीकोटावरून प्रक्षेपित होणारी प्रत्येक मोहीम लाखो भारतीयांना अभिमानास्पद असून तिच्यामुळे देशातील तरुणांना अंतराळ संशोधनासाठी प्रेरणा मिळते. त्यांनी भारताच्या संरक्षण क्षेत्रात मोठा विकास झाल्याचे जाहीर केले, ज्यामध्ये एक नवीन संरक्षण संस्था स्थापन झाली असून, डीआरडीओच्या नवीन क्षेपणास्त्र चाचणी केंद्राची पायाभरणी झाल्याचेही त्यांनी सांगितले. नागायलंका येथील नवदुर्गा चाचणी केंद्र माँ दुर्गाच्या दैवी शक्तीपासून प्रेरणा घेऊन भारताच्या संरक्षण क्षमतेसाठी शक्तिवर्धक ठरेल, असे पंतप्रधानांनी नमूद केले. या ऐतिहासिक यशासाठी त्यांनी देशातील शास्त्रज्ञ आणि आंध्र प्रदेशच्या जनतेचे अभिनंदन केले.

“भारताची ताकद केवळ त्याच्या शस्त्रांमध्ये नाही, तर एकतेत आहे,” असे पंतप्रधान म्हणाले, आणि ही एकतेची भावना एकता मॉल्सद्वारे आणखी बळकट होत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. देशभरातील शहरांमध्ये एकता मॉल्स उभारले जात असून, विशाखापट्टणममध्येही लवकरच एकता मॉल उभा राहील, तिथे भारतभरातील कारागीर आणि हस्तकलाकारांचे उत्पादन एकाच छताखाली प्रदर्शित केले जाईल. हे मॉल भारताच्या समृद्ध विविधतेशी लोकांना जोडतील, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देतील आणि “एक भारत, श्रेष्ठ भारत” या दृष्टिकोनाला बळकटी देतील, असे त्यांनी सांगितले.

यंदा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे दहावे वर्ष असून (21 जून), तो आंध्र प्रदेशात साजरा होईल आणि त्यात ते स्वतः सहभागी होतील असे पंतप्रधानांनी जाहीर केले. पुढील 50 दिवसांत योगासंबंधी अधिक उपक्रम राबवून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले. आंध्र प्रदेशात स्वप्न पाहणाऱ्यांची आणि साधकांची कमतरता नाही, असे नमूद करत पंतप्रधानांनी राज्य योग्य मार्गावर आणि योग्य गतीने प्रगती करत असल्याचा विश्वास व्यक्त केला. आंध्र प्रदेशच्या प्रगतीला गती देण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले आणि आपण त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहू, असे आश्वासन देत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

या कार्यक्रमाला आंध्र प्रदेशचे राज्यपाल  सय्यद अब्दुल नजीर, मुख्यमंत्री  एन. चंद्राबाबू नायडू, केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

देशभरात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आणि संपर्क व्यवस्था  सुनिश्चित करण्याच्या सरकारच्या  वचनबद्धतेनुसार, पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशात 7  राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन केले. या प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्गांच्या विविध भागांचे रुंदीकरण / उड्डाण पूल आणि भूमिगत मार्ग / भुयारी मार्ग बांधणे यासह इतर प्रकल्पांचा समावेश आहे.

या प्रकल्पांमुळे रस्ते सुरक्षा आणखी वाढेल; रोजगाराच्या संधी निर्माण होतील; तिरुपती, श्रीकालहस्ती, मलाकोंडा आणि उदयगिरी किल्ला यासारख्या धार्मिक स्थाने  आणि पर्यटन स्थळांना अखंड संपर्क सुविधा  मिळेल. पंतप्रधानांनी संपर्क सुविधा  वाढवणे आणि क्षमता वाढवणे या उद्देशाने बनवलेले रेल्वे प्रकल्प देखील राष्ट्राला समर्पित केले.

या प्रकल्पांमध्ये बुग्गनपल्ले सिमेंट नगर आणि पन्याम स्थानकांदरम्यान रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, रायलसीमा आणि अमरावती दरम्यान संपर्क व्यवस्था वाढवणे आणि न्यू वेस्ट ब्लॉक हट केबिन आणि विजयवाडा स्थानकांदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे बांधकाम यांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी 6 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प आणि एका रेल्वे प्रकल्पाची पायाभरणीही केली.

या प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्गांच्या विविध भागांचे रुंदीकरण; उन्नत मार्ग, हाफ क्लोव्हर लीफ आणि रस्त्यावरील उड्डाण पूल  यांच्या  बांधकामाचा  समावेश आहे. या प्रकल्पांमुळे संपर्क सुविधा, आंतरराज्य प्रवास, गर्दीचे नियोजन आणि एकूणच दळणवळण कार्यक्षमता सुधारेल. गुंटकल पश्चिम आणि मल्लप्पा गेट स्थानकांदरम्यान मालगाड्यांना बायपास करण्‍यासाइी ‘रेल्वे ओव्हर रेल’  बांधण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच यामुळे गुंटकल जंक्शनवरील गर्दी कमी होवू शकणार  आहे. पंतप्रधानांनी 11,240 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विधानसभा, उच्च न्यायालय, सचिवालय, इतर प्रशासकीय इमारती आणि 5,200 हून अधिक कुटुंबांसाठी गृहनिर्माण इमारतीं यासह अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी केली. यामध्ये 17,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे भूमिगत आणि प्रगत पूर व्यवस्थापन प्रणालींसह 320  किमीचे जागतिक दर्जाचे वाहतूक नेटवर्क असलेल्या  पायाभूत सुविधा आणि पूर निवारण प्रकल्प देखील समाविष्ट असतील. ‘लँड पूलिंग स्कीम’ पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये राजधानी अमरावतीमधील मध्यवर्ती मार्ग, सायकल ट्रॅक आणि एकात्मिक उपयुक्तता असलेल्या 1,281 किमी रस्त्यांचा समावेश असेल, यासाठी अंदाजे  20,400 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च  येईल.

पंतप्रधानांनी आंध्र प्रदेशातील नागायलंका येथे सुमारे 1,460 कोटी रुपये किमतीच्या क्षेपणास्त्र चाचणी रेंज /क्षेत्राची पायाभरणी देखील केली. यामध्ये प्रक्षेपण केंद्र, तांत्रिक उपकरणे सुविधा, स्वदेशी रडार, टेलिमेट्री आणि इलेक्ट्रो-ऑप्टिकल प्रणालींचा समावेश असेल ज्यामुळे देशाची संरक्षणविषयक तयारी बळकट होईल.

पंतप्रधानांनी विशाखापट्टणममधील मधुरावाडा येथे पीएम एकता मॉलची पायाभरणी देखील केली. राष्ट्रीय एकात्मतेला चालना देणे, मेक इन इंडिया उपक्रमाला पाठिंबा देणे, एक जिल्हा एक उत्पादनाला प्रोत्साहन देणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, ग्रामीण कारागिरांना सक्षम करणे आणि स्वदेशी उत्पादनांची बाजारपेठेत उपस्थिती वाढवणे या उद्देशाने याची कल्पना करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

 

 

* * *

N.Chitale/S.Bedekar/Shailesh/Vasanti/Nandini/Nikhilesh/Hemangi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2126338) Visitor Counter : 20