माहिती आणि प्रसारण मंत्रालय
जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद (WAVES -2025) मध्ये भारताच्या सर्जनशीलतेचे आणि तंत्रज्ञानात्मक सामर्थ्याचे प्रदर्शन
वेव्हज शिखर परिषदेत कृत्रिम प्रज्ञा (एआय), समाज माध्यमे आणि जाहिरात क्षेत्रांवरील चर्चांमधून डिजीटल माध्यम क्षेत्रातील भारताच्या वाढत्या प्रभावाचे दर्शन
Posted On:
01 MAY 2025 11:15PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 1 मे 2025
मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर इथे आयोजित जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषद ( WAVES- 2025) चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औपचारिकपणे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. कथात्मक मांडणीची भारताची समृद्ध परंपरा आणि आशय सामग्री निर्मितीचे जागतिक केंद्र बनण्याची क्षमता यावर त्यांनी आपल्या संबोधनात भर दिला. ‘ऑरेंज इकॉनॉमी’ अर्थात सर्जनशील अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ असलेल्या आशय सामग्री, सर्जनशीलता आणि संस्कृतीचा मिलाफ घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले. जगभरातील सर्जनशील कलाकारांना ‘क्रिएट इन इंडिया क्रिएट फॉर वर्ल्ड’ अर्थात अवघ्या जगासाठी भारतात निर्मिती करा असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी पंतप्रधानांनी स्मरणिका स्वरुपातील टपाल तिकीटांचे प्रकाशन करून भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गजांना आदरांजली वाहिली. जगभरातील सर्जनशील कलाकारांनी भारताच्या विविध कथांचा शोध घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. भारतातील प्रत्येक गाव, रस्ता, डोंगर आणि नदीत एक कथा दडलेली आहे, जी जगासमोर मांडण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. या सत्राला 100 पेक्षा जास्त देशांतील मान्यवर, उद्योग क्षेत्रातील दिग्गज मान्यवर आणि प्रसिद्ध कलाकार उपस्थित होते. हे सर्जनशील क्षेत्रातील महासत्ता बनण्याच्या दिशेने भारताने टाकलेले महत्वाचे पाऊलच ठरले.
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2125725
कृत्रिम प्रज्ञा (एआय ) आणि सर्जनशीलता : ॲडोब (Adobe) आणि एनव्हिडिया (NVIDIA) यांनी मांडली भविष्याची दिशा
डिजिटल साधने आणि जनरेटिव्ह एआयच्या पाठबळावर भारत हा सर्जनशीलतेचे जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचे ॲडोबचे (Adobe) मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण यांनी अधोरेखित केले. इथे 100 दशलक्षापेक्षा जास्त आशय सामग्री निर्माते आणि 500 दशलक्ष ओटीटी (OTT) ग्राहक आहेत, एका अर्थाने भारत हा जगातील पुढची सर्जनशील महासत्ता आहे असे शंतनू नारायण म्हणाले. यावेळी त्यांनी ॲडोबची फायरफ्लाय कृत्रिम प्रज्ञेची प्रारुपे उपस्थितांसमोर सादर केली. शाश्वत विकासासाठी नितिमूल्याधारीत कृत्रिम प्रज्ञा , आशयाची समाग्रीची सत्यता आणि सर्जनशील निर्माते हे अत्यंत महत्वाचे घटक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
एनव्हिडियाचे (NVIDIA) रिचर्ड केरिस आणि विशाल धुपार यांच्यासोबतही या सत्रात चर्चात्मक संवाद झाला. मोठ्या प्रमाणात आशय सामग्री तयार करणे, त्याचे स्थानिकीकरण करणे आणि ती आणखी वैयक्तिक स्वरूपामध्ये करण्यासारख्या प्रक्रिया पार पाडत, कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञान कशा प्रकारे निर्मिती प्रक्रियेत क्रांती घडवत आहे ही बाब त्यांनी उपस्थितांना उलगडून सांगितली. भारताने दीर्घकाळापासून आपली प्रतिभा निर्यात केली आहे, आता भारत आपली संस्कृतीही निर्यात करू शकतो, असे मत केरिस यांनी व्यक्त केले. स्थानिक पातळीवरचा आवाज इतरांपर्यंत पोहचवण्याची आणि भारताला कथा उत्तम मांडणीच्या क्षेत्रातला बलाढ्य देश बनवण्याची क्षमता कृत्रिम प्रज्ञे तंत्रज्ञानात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2125947
सर्जनशील निर्मिती अर्थव्यवस्थेला (Creator Economy) चालना देण्यासाठी यूट्युबकडून (YouTube) अधिकचे पाठबळ उपलब्ध करून देण्याची घोषणा
यूट्युबचे (YouTube) मुख्य कार्यकारी अधिकारी नील मोहन यांनी भारतातील सर्जनशील निर्मिती अर्थव्यवस्थेला (Creator Economy) गती देण्यासाठी 850 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. यूट्युबवर 1 दशलक्षापेक्षा जास्त सदस्य असलेल्या 15,000 पेक्षा जास्त भारतीय वाहिन्या असल्याची माहिती त्यांनी दिली. जागतिक पटलावरील आघाडीचे सर्जनशील कलाकार मार्क रोबर आणि गौतमी कवळे (Slayy Point) हे देखील या संवादात सहभागी झाले होते. या दोघांसह नील मोहन यांनी भारतीय कथांना जागतिक पटलावर सादर करण्यासाठी यूट्युब महत्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद केले. भारत केवळ संगीत आणि चित्रपटांमध्येच आघाडीवर नाही तर तो आता सर्जनशील निर्मितीचा देश (Creator Nation) बनला आहे असे ते म्हणाले. सांस्कृतिक मुळांशी जोडलेला स्थानिकतेचा स्पर्श असलेला भारतीय आशय जगाला आकर्षित करतो असे गौतमी कवळे म्हणाल्या. कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाधारित डबिंग आणि स्थानिककरणामुळे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणिताशी (STEM) संबंधित आशय सामग्री आता सीमेपलिकडे पोहचू लागली असल्याचे मार्क रोबर यांनी सांगितले.
डब्ल्यू पी पी (WPP) आणि जाहिरात क्षेत्राची पुनर्रचना
डब्ल्यू पी पी (WPP - Wire and Plastic Products) चे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क रीड यांनी 1 ट्रिलियन डॉलर मूल्य असलेले जागतिक जाहिरात उद्योग क्षेत्र आणि कृत्रिम प्रज्ञा आधारित कथात्मक मांडणीमुळे या क्षेत्रात घडून आलेले बदल उपस्थितांसमोर मांडले. यावेळी त्यांनी डब्ल्यू पी पीच्या (WPP) ओपन व्हिडिओ प्रोडक्शन प्लॅटफॉर्मचे अर्थात चित्रफित निर्मितीच्या खुल्या व्यासपीठाचे अनावरण केले. यावेळी त्यांनी वैयक्तिकृत आशय निर्मितीची प्रक्रिया दर्शवण्यासाठी हालचालिविषयक कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाचा वापर करून शाहरुख खान अभिनीत एका मोहिमेचे सादरीकरण उपस्थितांसमोर केले. कृत्रिम बुद्धिमत्ता सर्जनशीलतेची जागा घेत नसून हे तंत्रज्ञान तिचा विस्तार करत असल्याचे रीड म्हणाले. गुणवत्तापूर्ण जाहिरातींच्या सुलभ उपलब्धतेचे लोकशाहीकरण करण्याच्या प्रक्रियेतील सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांची तसेच डिजिटल साधनांच्या भूमिकीही त्यांनी यावेळी अधोरेखित केली.
जागतिक सहकार्य : यूके आणि भारता यांच्यामध्ये सांस्कृतिक करार
यूकेच्या डिजीटल, सांस्कृतिक, माध्यम आणि खेळ विभागाच्या (DCMS - Department for Digital, Culture, Media and Sport) मंत्री लिसा नॅंडी यांनीही मुत्सद्देगिरी आणि वैयक्तिक वारसा यांचा मिलाफ असलेले भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी भारत आणि यूके मधील सांस्कृतिक संबंध अधोरेखित केले. दोन्ही देशांमध्ये चित्रपट, संग्रहालये आणि परफॉर्मिंग आर्ट अर्थात प्रदर्शनकला प्रकार या क्षेत्रांतील संबंध अधिक दृढ करण्यासाठी द्विपक्षीय सांस्कृतिक महासंघाच्या स्थापनेसाठी कराराची घोषणा त्यांनी केली. आपण मँचेस्टरपासून मुंबईपर्यंतच्या कथात्मक मांडणी कलाकांरांच्या भावी पिढ्यांचे सक्षमीकरण केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी सोफिया दलीप सिंग तसेच यूके आमि भारतातील आधुनिक कलाकारांचाही दाखला दिला.
निमंत्रितांच्या चर्चा : कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), संस्कृती आणि प्रभाव ; निमंत्रितांच्या दोन चर्चासत्रांतून या विषयावर खोलवर वैचारिक मंथन :
India M&E @100: The Future of Media and Entertainment अर्थात भारताच्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचे शतक : माध्यम आणि मनोरंजन विश्वाचे भविष्य या विषयावर झालेल्या निमंत्रितांच्या चर्चासत्रात इरॉस नाऊ (Eros Now), जेटसिंथेसिस (Jetsynthesys) आणि ग्रुपएम (GroupM) या आघाडीच्या संस्थामधील दिग्गज व्यक्तिमत्वांनी सहभाग घेतला. या सगळ्यांनी आज भारत मोठ्या बदलांच्या चौथ्या लाटेवर स्वार असून, इथे कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाधारीत बौद्धिक मालमत्तेची निर्मिती (AI-led IP creation) आणि अतिआधुनिक पिढीची (Gen Z) आवड यामुळे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र नव्याने आकार घेऊ लागला असल्याचे सांगितले.
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2125886
द बिझनेस ऑफ इन्फ्लुएन्स या विषयावरही एक चर्चासत्र झाले. यात युट्युबचे गौतम आनंद यांनी सूत्रधाराची भूमिका पार पाडली. या चर्चासत्रात शेफ रणवीर ब्रार, चेस टॉकचे (ChessTalk) जितेंद्र अडवानी आणि जपानी यूट्युबर मेयो मुरासाकी यांसारखे सर्जनशील कलाकार सहभागी झाले होते. डिजीटल व्यासपीठांमुळे बुद्धिबळापासून ते शेतीपर्यंतचे भारतीय ज्ञान आता जागतिक पातळीवर पोहचत असून, या प्रक्रियेत भारतीय संस्कृतीची अस्सलता कशा प्रकारे टिकून राहते ही बाब त्यांनी आपल्या चर्चांमधून उपस्थितांसमोर मांडली.
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2125889
* * *
PIB Mumbai |S.BedekarJPS/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Release ID:
(Release ID: 2126040)
| Visitor Counter:
22