WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वेव्हज 2025 मध्ये ईशान्य भारतात सिनेमाची 'आव्हाने आणि भवितव्य' या विषयावरील चर्चेत आसाममधील चित्रपट निर्माते आणि कलाकार झाले सहभागी


ईशान्य भारत हे प्रतिभेचे भांडार आहेः जानू बारुआ

आसामला आपल्या चित्रपटांना चांगली बाजारपेठ देण्यासाठी ओटीटी मंचांची गरज आहे, जतीन बोरा यांचे प्रतिपादन

 Posted On: 01 MAY 2025 10:55PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 1 मे 2025

 

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आयोजित  जागतिक दृक-श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेत(वेव्हज 2025) ईशान्य भारतीय सिनेमासाठी ऐतिहासिक क्षण ठरणाऱ्या "ईशान्य भारतातील सिनेमाची आव्हाने आणि भवितव्य" या शीर्षकाखाली एक पॅनेल चर्चेचे आयोजन करण्यात आले. या सत्रात या प्रदेशातील चित्रपट उद्योगातील काही महत्त्वाची व्यक्तीमत्वे एकत्र आली आणि त्यांनी येथील सळसळत्या चेतनादायी चित्रपट परिदृश्याचा आढावा घेतला.

या पॅनेलमध्ये जानू बरुआ, जतीन बोरा, रवी शर्मा, ऐमी बरुआ, हाओबम पाबन कुमार आणि डोमिनिक संगमा यांच्यासारखे नामवंत चित्रपट निर्माते आणि कलाकारांचा समावेश होता ज्यांच्यापैकी सर्वांनीच ईशान्येतील चित्रपट संस्कृतीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

या चर्चेत या प्रदेशातील चित्रपट निर्मात्यांना भेडसावणाऱ्या  अपुऱ्या उत्पादन पायाभूत सुविधा, भाषिक अडथळे, मर्यादित बाजारपेठ उपलब्धता आणि संस्थात्मक पाठबळाचा अभाव यांच्यासह अनेक समस्यांवर विशेष भर देण्यात आला. या अडचणी असूनही, पॅनेल सदस्यांनी ईशान्य भारत चित्रपट निर्मितीतील नवोन्मेष आणि सांस्कृतिक कथाकथनासाठी एक सुपीक भूमी असल्याबाबत सहमती व्यक्त केली.

ईशान्य भारत म्हणजे प्रतिभेचे भांडार असल्याचे मत ज्येष्ठ चित्रपट निर्माते जानू बारुआ यांनी व्यक्त केले. या प्रदेशातील चित्रपट निर्माते उल्लेखनीय कामाची निर्मिती करत आहेत. या प्रदेशातील सांस्कृतिक गुंफण आणि अकथित कथांच्या विपुलतेवर त्यांनी भर दिला. अनेक युवा प्रतिभांचा उदय होत असल्याने ईशान्येकडील सिनेमाचे भवितव्य उज्ज्वल आहे, असे त्यांनी नमूद केले.

ईशान्येकडील चित्रपटांची प्रादेशिक सीमांच्या पलीकडे असलेली मर्यादित पोहोच आसाममधील लोकप्रिय अभिनेते जतीन बोरा यांनी अधोरेखित केली. डिजिटल वितरणाच्या गरजेवर बोलताना ते म्हणाले, "आसामला आपल्या चित्रपटांना अधिक चांगली बाजारपेठ देण्यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्म्सची गरज आहे." त्यांनी प्रादेशिक चित्रपटांना अधिक मोठ्या प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवण्यात मदत करण्यासाठी अशा मंचांच्या निर्मितीला पाठिंबा देण्याचे आवाहन सरकारला केले. त्यांनी केंद्र आणि राज्य सरकार दोघांनाही प्रादेशिक चित्रपट परिसंस्थेला पाठिंबा देण्यासाठी दीर्घकालीन धोरणे विकसित करण्याचे आवाहन केले आणि मजबूत वितरण नेटवर्कशिवाय, सर्वोत्कृष्ट चित्रपटदेखील राज्याच्या सीमा ओलांडण्यासाठी संघर्ष करतात यावर भर दिला.

रवी सरमा यांनी या प्रदेशातील सर्जनशील पायाभूत सुविधांमध्ये पद्धतशीर गुंतवणुकीची तातडीची गरज असल्याचे सांगितले. प्रादेशिक उद्योगाच्या वाढीसाठी आर्थिक पाठबळ आणि विपणन पायाभूत सुविधा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ईशान्येकडे लाखो सुंदर आणि अद्वितीय कथा आहेत, असे ते म्हणाले.

अभिनेत्री-दिग्दर्शिका ऐमी बरुआ यांनी भाषिक विविधता जपण्यामध्ये  सिनेमा महत्वाची  भूमिका बजावतो असे सांगितले.. "आपल्या भाषांना शतकानुशतकांचा मौखिक इतिहास आहे. चित्रपट हे त्यांचे संरक्षण आणि प्रोत्साहन देण्यासाठी एक शक्तिशाली माध्यम आहे," असे त्यांनी नमूद केले.

चित्रपट निर्माते हाओबम पबन कुमार आणि डोमिनिक संगमा यांनी या प्रदेशातील तळागाळातील चित्रपट निर्मितीबद्दल माहिती दिली आणि हे दाखवून दिले की अनेक कथाकार औपचारिक समर्थन प्रणालीशिवाय काम करत आहेत.

सत्राचा शेवट आशादायक पद्धतीने झाला. पॅनेल सदस्यांनी पारंपरिक अडथळे दूर करण्यासाठी धोरणात्मक सुधारणा, प्रादेशिक सहकार्य आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा धोरणात्मक वापर करण्याचे आवाहन केले. त्यांनी सर्व भागधारक, सरकारी संस्था, खाजगी गुंतवणूकदार आणि राष्ट्रीय स्टुडिओना ईशान्य भारतातील चित्रपटसृष्टीचे आवाज ओळखण्यासाठी आणि त्यांना उभारी देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले.

 

* * *

PIB Mumbai |S.Bedekar/JPS/Shailesh/Nandini/D.Rane


Release ID: (Release ID: 2125994)   |   Visitor Counter: 19