माहिती आणि प्रसारण मंत्रालय
जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेमध्ये (WAVES 2025) मुकेश अंबानी यांनी मांडली भारताच्या नेतृत्वातील जागतिक मनोरंजन विश्वाच्या क्रांतीची कल्पना
वेव्हज म्हणजे नवी भरारी घेत असलेल्या नव्या भारताचा संपूर्ण जगासाठी आशेचा संदेशवाहक: मुकेश अंबानी
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र ही भारताची केवळ ‘सॉफ्ट पॉवर’ नाही तर हे क्षेत्र भारताची खरी ताकद: मुकेश अंबानी
Posted On:
01 MAY 2025 10:32PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 1 मे 2025
भारत केवळ एक देश नाही—ही ती कथांची एक अशी समाजव्यवस्था आहे, जिथे कथात्मक मांडणी ही एक जीवनशैलीच आहे," असे प्रतिपादन रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी आजपासून मुंबईत सुरू झालेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेतील बीजभाषणात केले. यावेळी अंबानी यांनी प्रसिद्ध अमेरिकी लेखक मार्क ट्वेन यांचे एक वक्तव्य उद्धृत केले. त्यांनी ट्वेन यांच्या भारत केवळ एक देश नाही—ही ती कथांची एक अशी समाजव्यवस्था आहे, जिथे कथात्मक मांडणी ही एक जीवनशैलीच आहे या वक्तव्याचा दाखला देत भारत हा मानवी वंशाचे उगमस्थान, मानवी भाषेचे जन्मस्थान, इतिहासाची जननी, पुराणकथांची आजी आणि परंपरांची पणजी असल्याचे म्हणत भारताचे महत्व अधोरेखित केले. कथात्मक मांडणी ही भारतीय जीवनशैलीशी घट्टपणे विणलेली वीण असून, इथल्या चिरंतन महाकाव्यांपासून पौराणिक कथांपर्यंत, कथात्मक मांडणी हा भारताचा वारसा राहिला असल्याचे त्यांनी नमूद केले. आशय हा राजा आहे, आणि चांगल्या कथांना कायमच बाजारपेठेत मोल मिळते. हे कालातीत तत्त्व असून, हेच जागतिक मनोरंजनाचा आधार आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी अंबानी यांनी ‘Building the Next Global Entertainment Revolution from India’ अर्थात भारतातून भविष्यातील जागतिक मनोरंजन क्रांतीची बांधणी करणे या विषयावर त्यांनी उत्साहाने भारलेले आणि दूरदर्षी भाषण केले. आपल्या भाषणातून त्यांनी भारत हा जगाच्या मनोरंजन उद्योग क्षेत्राचे मुख्य केंद्र बनणार असल्याची कल्पना उपस्थितांसमोर मांडली. आपल्या संबोधनातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवर्तनाची प्रेरणा देणार्या धाडसी दृष्टिकोनाचा प्रशंसा केली तसेच वेव्हज शिखर परिषद ही याच भविष्याच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल असल्याचे गौरवोद्गारही काढले. आपल्या भाषणातून अंबानी यांनी जागतिक संस्कृती आणि सर्जनशीलतेच्या अवकाशात भारताचा वाढत्या प्रभावावावरही शिक्कामोर्तब केले. माध्यम आणि मनोरंजन क्षेत्र ही भारताची ‘सॉफ्ट पॉवर’ अर्थात राजकीय क्षेत्रापलीकडची सांस्कृतिक ताकद असल्याचे लोक म्हणतात, मात्र ही भारताची खरी ताकद असल्याचे आपण ठाम मानतो असे त्यांनी सांगितले.
उद्योगपती मुकेश अंबानी यांनी भूअर्थशास्त्र आणि तंत्रज्ञान या सर्जनशील परिदृश्याला आकार देणाऱ्या दोन विवर्तनीय शैली जाणल्या. जगाच्या 85% लोकसंख्येचे वास्तव्य असणाऱ्या ग्लोबल साऊथचे आर्थिक सामर्थ्य वाढत असताना आशय निर्मिती आणि वापरात त्याची भूमिका देखील वाढते. त्याच वेळी, कृत्रिम प्रज्ञेसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान सामग्री निर्मितीपासून वितरणापर्यंत मनोरंजन मूल्य साखळीच्या प्रत्येक टप्प्यात क्रांती घडवत आहेत. "कृत्रिम प्रज्ञा ही कल्पनाशक्ती आणि अंमलबजावणीमधील सीमा मिटवत आहे. आज कृत्रिम प्रज्ञा मनोरंजनासाठी जे करत आहे ते एक शतकापूर्वी मूक कॅमेऱ्याने सिनेमासाठी केले त्यापेक्षा दशलक्ष पट अधिक परिवर्तनकारी आहे", असे त्यांनी निदर्शनास आणले.
भारताच्या अद्वितीय ताकदींवर प्रकाश टाकताना अंबानी म्हणाले की, आकर्षक आशय मांडणी, गतिमान लोकसंख्याशास्त्र आणि तंत्रज्ञानात्मक नेतृत्व या तीन स्तंभांनी बळकट असलेल्या मनोरंजन क्रांतीचे नेतृत्व करण्यासाठी देश सज्ज आहे. “भारताची डिजिटल क्रांती ही केवळ व्यापकतेची कथा नाही तर ती आकांक्षा, महत्त्वाकांक्षा आणि परिवर्तनाची कहाणी आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना, अंबानी यांनी आशावादाचा संदेश दिला: “ध्रुवीकृत आणि अनिश्चित जगात, लोक आनंद, संवाद आणि प्रेरणा शोधतात. मनोरंजनाच्या या जागतिक भूकेला भारत उत्तर देईल. पुनरुज्जीवित नवीन भारताकडून जगाला वेव्हज हा आशेचा संदेश ठरावा.’’
* * *
PIB Mumbai |S.Bedekar/Tushar/Vasanti/D.Rane
Release ID:
(Release ID: 2125986)
| Visitor Counter:
29