माहिती आणि प्रसारण मंत्रालय
उद्यापासून सुरु होणाऱ्या वेव्हज 2025 साठी मुंबई सज्ज
वेव्हज - पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेविषयी अपार उत्सुकता
भारतीय आणि जागतिक माध्यम आणि मनोरंजन हितधारकांमध्ये चार दिवसीय ज्ञान आदानप्रदान, संवाद आणि सहयोगपर कार्यक्रम
वेव्हज द्वारे भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला मिळणार कलाटणी
Posted On:
30 APR 2025 6:52PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 30 एप्रिल 2025
माध्यम आणि मनोरंजन (एम अँड ई) क्षेत्रातील बहुप्रतिक्षित मैलाचा दगड असलेल्या वेव्हज (जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद 2025) कार्यक्रमाची उलट गणती सुरू झाली आहे. उद्यापासून मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे प्रारंभ होणाऱ्या या चार दिवसीय अभूतपूर्व कार्यक्रमाची आखणी भारताच्या माध्यम आणि मनोरंजन उद्योगाला नव्या उंचीवर नेण्यासाठी करण्यात आली आहे.
भारताची मनोरंजन राजधानी मुंबई, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांचे स्वागत करण्यासाठी सज्ज होत आहे जे आकर्षक पॅनेल चर्चा, विचारप्रवर्तक आणि प्रेरणादायी व्याख्याने, संभाषण आणि परस्परसंवादी सत्रांद्वारे ज्ञानाची देवाणघेवाण, उद्योगतज्ज्ञांचे समृद्ध मास्टर-क्लास इत्यादींमध्ये सहभागी होतील. त्यामुळे येत्या चार दिवसांतील बहुआयामी फलनिष्पत्ती ही देशातील भविष्यासाठी सज्ज असलेल्या माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी आशादायक राहील.

कारण वेव्हज शिखर परिषद ही जागतिक बलस्थान म्हणून भारताचा आवाज बुलंद करण्यासाठी आहे. वेव्हज, त्याच्या पहिल्या पर्वापासून, भारताच्या चैतन्यदायी सर्जनशील उद्योगाचे आणि जागतिक एम अँड ई क्षेत्रात त्याच्या प्रचंड क्षमतेचे प्रदर्शन करण्यासाठी एक मंच प्रदान करेल. याशिवाय,भारतीय आणि जागतिक हितधारकांमध्ये ज्ञान आदानप्रदान, संवाद आणि सहयोगाला देखील प्रोत्साहन देईल. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या या अग्रगण्य उपक्रमाची संकल्पना जागतिक सुसंवादासाठी भारताच्या समृद्ध आध्यात्मिक वारशाच्या फायदेशीर वापराकरिता आणि सर्जकांच्या अर्थव्यवस्थेला योग्य दिशेने चालना देण्यासाठी केली आहे.

वेव्हजचे चार स्तंभ
माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राचे संपूर्ण पटल सामावणारा हा महामहोत्सव व्यापकपणे चार स्तंभांमध्ये विभागला गेला आहे.
एक: प्रसारण आणि माहिती मनोरंजन: माहिती आणि मनोरंजन वितरणाच्या पारंपरिक आणि विकसित होत असलेल्या परिदृश्याचा समावेश करून, माहितीला प्राधान्य देत, नागरिकांना सक्षम करून आणि 21 व्या शतकातील आव्हानांशी जुळवून घेऊन जागतिक पातळी गाठण्याचा या लक्ष्यीत क्षेत्राचा उद्देश आहे. यामध्ये सर्जनशील अर्थव्यवस्थेच्या खालील क्षेत्रांचा समावेश आहे:
- प्रसारण: दूरचित्रवाणी, रेडिओ, पॉडकास्ट, क्रीडा प्रसारण
- आशय निर्मिती: मुद्रित माध्यम, संगीत
- वितरण प्लॅटफॉर्म: कॅरेज (केबल आणि उपग्रह), डीटीएच (डायरेक्ट-टू-होम)
- जाहिरात आणि विपणन: एम अँड ई क्षेत्रात दर्जेदार धोरणांना नवा आयाम देणारे आघाडीचे व्यावसायिक
दोन: एव्हीजीसी-एक्सआर: हा विभाग कलात्मकता, मनोरंजन आणि तंत्रज्ञानाच्या संयोजनाने समर्थित मंत्रमुग्ध करणारे कथाकथन आणि परस्परसंवादी अनुभवाच्या अत्याधुनिक जगाचा वेध घेतो. यात खालील विशिष्ट क्षेत्रांचा समावेश आहे:
- अॅनिमेशन
- व्हिज्युअल इफेक्ट्स
- ई-स्पोर्ट्स
- कॉमिक्स
- ऑगमेंटेड रिअॅलिटी/व्हर्च्युअल रिअॅलिटी (एआर/व्हीआर)
- मेटाव्हर्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी (एक्सआर)
तीन: डिजिटल मीडिया आणि नवोन्मेष: हा विभाग निरंतर विकसित होत असलेल्या डिजिटल क्षेत्र आणि मनोरंजनाच्या वापरावर त्याच्या परिणामाचा धांडोळा घेतो. त्यात समाविष्ट बाबी:
- डिजिटल मीडिया आणि अॅप अर्थव्यवस्था
- ओटीटी प्लॅटफॉर्म
- सोशल मीडिया प्लॅटफॉर्म
- जनरेटिव्ह एआय आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान
- प्रभावक आणि सर्जक
चार: चित्रपट: हा विभाग चित्रपट निर्मिती, निर्मिती आणि जागतिकीकरणाच्या जगाचा वेध घेतो.
- चित्रपट, माहितीपट, लघुपट, व्हिडिओ
- चित्रपट तंत्रज्ञान (चित्रीकरण, पोस्ट-प्रॉडक्शन)
- भारतीय चित्रपटाचे जागतिकीकरण
- सह-निर्मिती
- चित्रपट प्रोत्साहन
- दृक-श्राव्य सेवा
क्रिएट इन इंडिया चॅलेंज आणि क्रिएटोस्फीअर: वेव्हजचा भाग म्हणून सुरू झालेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सीआयसी) पर्व -1 ने 85,000 नोंदणींचा टप्पा गाठला आहे ज्यामध्ये 1,100 आंतरराष्ट्रीय सहभागींचा समावेश आहे. 32 विविध आव्हानांमधून काटेकोर तपशिलासह निवड प्रक्रियेनंतर 750 हून अधिक अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. या प्रतिभावान सर्जनशील मनांना क्रिएटोस्फीअरमध्ये त्यांच्या वैयक्तिक प्रतिभेचे आणि कौशल्यांची निष्पत्ती आणि निष्कर्ष प्रदर्शित करण्याची एक अनोखी संधी मिळेल, त्याव्यतिरिक्त पिचिंग सत्रांसह त्यांच्या संबंधित क्षेत्रातील व्यावसायिक अग्रणींसोबत नेटवर्किंगच्या संधी मिळतील आणि मास्टरक्लासेस आणि पॅनेल चर्चांद्वारे जागतिक दिग्गजांकडून बोध घेता येईल.
वेव्हज मधील क्रिएटोस्फीअर मास्टरक्लासेस, कार्यशाळा, गेमिंग अरेना आणि क्रिएट इन इंडिया चॅलेंजेसच्या भव्य सांगता सोहोळ्यासह अद्भुत अनुभूती देईल. सीआयसी पुरस्कारांनी वेव्हज सोहोळा संपन्न होईल.
ग्लोबल मीडिया डायलॉग: वेव्हजमध्ये 2 मे 2025 रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या ग्लोबल मीडिया डायलॉग (जागतिक माध्यम संवाद) या विभागात जागतिक नेते, धोरणकर्ते, उद्योग क्षेत्रातील भागधारक, मीडिया व्यावसायिक आणि कलाकार एकत्र येतील आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यतांत्रिक नवोन्मेश आणि नैतिक पद्धतींवर लक्ष केंद्रित करून दृकश्राव्य आणि मनोरंजन क्षेत्राचे भविष्य घडवण्याच्या उद्देशाने रचनात्मक चर्चेत सहभागी होतील.
थॉट लीडर्स ट्रॅक: पूर्ण सत्रे, परिषद सत्रे आणि ब्रेकआऊट सत्रांद्वारे, आघाडीचे सीईओ आणि जागतिक नेते सहकार्यासाठी धोरणात्मक चर्चा करतील आणि या विषयावरील दृष्टीकोन आणि वैविध्यपूर्ण पैलू उलगडून सांगतील.
WaveXcelerator: हा विभाग नवोन्मेश आणि वित्तपुरवठ्याला चालना देण्यासाठी लाइव्ह पिचिंग सत्रांद्वारे एम अँड ई (माध्यमे आणि मनोरंजन) स्टार्टअप्सना गुंतवणूकदार आणि मार्गदर्शकांशी जोडेल. हे सत्र भारतीय स्टार्टअप्ससाठी परिवर्तन घडवून आणण्यात चालना देईल, त्यांना योग्य माहिती देईल आणि त्यांचे व्यवसाय वाढवण्यासाठी गुंतवणूक मिळवून देईल.
वेव्हज बझार: वेव्हज बझार हे माध्यम आणि मनोरंजन उद्योगासाठीची प्रमुख जागतिक बाजारपेठ असून, ते चित्रपट निर्माते आणि उद्योग व्यावसायिकांना खरेदीदार, विक्रेते आणि विविध प्रकल्प आणि प्रोफाइलशी जोडून घेण्याची संधी देईल. व्ह्यूइंग रूम हे वेव्हज बझारमध्ये उभारलेले एक समर्पित व्यासपीठ असून, ते 1 ते 4 मे 2025 या काळात खुले राहील. पहिल्या वेव्हज बझारमधील WAVES Bazaar व्ह्यूइंग रूम लायब्ररीमध्ये भारत, श्रीलंका, अमेरिका, स्वित्झर्लंड, बल्गेरिया, जर्मनी, मॉरिशस आणि संयुक्त अरब अमिराती या आठ देशांचे एकूण 100 चित्रपट पाहता येतील.
भारत पॅव्हेलियन: "कला ते कोड" या संकल्पनेवर आधारित असलेले भारत पॅव्हेलियन, Bharat Pavilion वसुधैव कुटुंबकम- जग हे एक कुटुंब आहे, या भारताच्या भावनेचा उत्सव साजरा करेल आणि देशाची कलात्मक परंपरा ही सर्जनशीलता, सौहार्द आणि सांस्कृतिक मुत्सद्देगिरीचे प्रतीक कसे आहे, हे प्रदर्शित करेल. भारत पॅव्हेलियनच्या केंद्रस्थानी श्रुती, क्रिती, दृष्टी आणि क्रिएटर्स लीप, हे चार मंत्रमुग्ध करणारे विभाग आहेत, जे या ठिकाणी येणाऱ्यांना भारताच्या कथाकथन परंपरेचा प्रवास घडवतील.
प्रदर्शन मंडप: कल्पनाशक्ती आणि नवोन्मेषाच्या संगमाचे एक उत्कृष्ट दर्शन घडवणारा, अत्याधुनिक तंत्रज्ञानापासून ते भविष्यवेधी कल दाखवणारा, हा मंडप माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील भारतीय आणि जागतिक नवनिर्मितीचे दर्शन घडवतो.
‘वेव्हज’ चा भाग म्हणून कम्युनिटी रेडिओवरील राष्ट्रीय संमेलन देखील आयोजित केले जाईल, जे कम्युनिटी रेडिओच्या शक्तिशाली व्यासपीठाच्या माध्यमातून स्थानिक समुदायासोबतचा संवाद अधिक दृढ करण्यासाठी त्यांच्या क्षमतांमध्ये आणखी वाढ करण्यासाठी नावीन्यपूर्ण कल, धोरणे आणि कार्यक्रमांशी संबंधित समस्यांवर विचारमंथन करेल आणि त्यावर अधिक लक्ष केंद्रित करेल.
‘वेव्हज कल्चरल्स’, भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिभांचे मिश्रण असलेले विविध कार्यक्रम आणि सादरीकरणाचे प्रदर्शन करेल. सांस्कृतिक आदानप्रदान आणि सौहार्द यांना चालना देण्यामध्ये माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या परिवर्तनकारी सामर्थ्याला अधोरेखित करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
म्हणूनच तुम्ही उद्योगातील एक व्यावसायिक, गुंतवणूकदार, सृजनकार किंवा नवोन्मेषकार का असेना, या पहिल्यावहिल्या शिखर परिषदेमध्ये मनोरंजनाच्या परिदृश्यात परस्परांसोबत जोडले जाण्यासाठी, सहकार्यासाठी, नवोन्मेषासाठी आणि माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात योगदान देण्यासाठी तुम्हाला एक उत्कृष्ट जागतिक व्यासपीठ उपलब्ध आहे.

भारताच्या सर्जनशील सामर्थ्याचे वर्धन करण्यासाठी ‘वेव्हज’ सज्ज आहे, ज्यामुळे आशय निर्मिती, बौद्धिक संपदा आणि तंत्रज्ञानात्मक नवोन्मेषांचे केंद्र म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट होईल. यात प्रसारण, मुद्रित माध्यमे, दूरदर्शन, रेडिओ, चित्रपट, ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स,
ध्वनी आणि संगीत, जाहिरात, डिजिटल मीडिया, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, जनरेटिव्ह एआय, ऑगमेंटेड रिॲलिटी (AR), व्हर्च्युअल रिॲलिटी (VR) आणि एक्सटेंडेड रिॲलिटी (XR) यांसारख्या उद्योग आणि क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाईल.

अधिक माहितीसाठी, https://wavesindia.org/ येथे भेट द्या
या 4 दिवसांच्या भव्य सोहळ्याचे वेळापत्रक पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा
'वेव्हज’ 2025 विषयी ताजी माहिती जाणून घेत रहा PIB
* * *
PIB Mumbai | N.Chitale/S.Kakade/Vasanti/Rajshree/Shailesh/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
Release ID:
(Release ID: 2125578)
| Visitor Counter:
14