WAVES BANNER 2025
माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वेव्हज 2025 मध्ये भारत पॅव्हेलियनचे होणार अनावरण


भारताची सांस्कृतिक प्रतिभा आणि माध्यम उत्क्रांतीचा प्रवास पहायला मिळणार

 Posted On: 22 APR 2025 8:04PM |   Location: PIB Mumbai

मुंबई, 22 एप्रिल 2025

 

मुंबईतील जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद वेव्हज 2025 साठी जग एकत्र येईल तेव्हा भारत अभिमानाने भारत पॅव्हेलियनचे अनावरण करेल, जी देशाचा कथाकथनाचा प्रदीर्घ वारसा  आणि जागतिक माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातल्या त्याच्या  वाढत्या प्रभावाला एक उत्कट मानवंदना असेल.

"कला टू कोड" या संकल्पनेवर  आधारित हे पॅव्हेलियन भारताच्या वसुधैव कुटुंबकम - जग एक कुटुंब आहे - या भावनेचा उत्सव साजरा करेल आणि देशाची कलात्मक परंपरा दीर्घकाळापासून कशा प्रकारे सर्जनशीलता, सुसंवाद आणि सांस्कृतिक मुत्सद्देगिरीचे  प्रतीक राहिली  आहे त्याचे दर्शन घडवेल.

वारसा लाभलेला आणि नवोन्मेषाने प्रेरित भारत आता भविष्याकडे पाहत आहे - कथाकथन, तंत्रज्ञान आणि परिवर्तनात्मक सांस्कृतिक देवाणघेवाणीमध्ये जगाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज आहे.

भारत पॅव्हेलियनच्या केंद्रस्थानी चार प्रमुख विभाग आहेत जे अभ्यागतांना भारताच्या सातत्यपूर्ण  कथाकथन परंपरेची ओळख करून देतील :

  • श्रुती – वैदिक मंत्र आणि लोकगीतांपासून ते शास्त्रीय संगीत, रेडिओ आणि बोली शब्दांपर्यंत मौखिक परंपरांची ओळख करून देणारी .
  • कृती – लिखित वारसा उलगडून दाखवणारी, गुहेतील कोरीवकाम आणि पाम लीफ हस्तलिखितांपासून ते प्रिंट मीडिया, साहित्य आणि आधुनिक प्रकाशनाच्या उत्क्रांतीपर्यंतच्या प्रवासाचा शोध घेणारी.
  • दृष्टी – प्राचीन नृत्यप्रकार, कठपुतली आणि लोकनाट्यापासून ते भारतातील समृद्ध  सिनेमा, टेलिव्हिजन, डिजिटल आणि इमर्सिव्ह स्टोरीटेलिंग परिसंस्थेपर्यंत दृश्य अभिव्यक्तीचा शोध घेणारी.
  • क्रिएटर्स लीप – अत्याधुनिक तंत्रज्ञानासह कथाकथनाचे भविष्य दाखवणारी

या अनुभवात्मक विभागांद्वारे भारताच्या कालातीत कथा शक्तिशाली आधुनिक माध्यम स्वरूपात कशा विकसित झाल्या आहेत हे पाहण्यासाठी अभ्यागतांना आमंत्रित करण्यात येत आहे. ओमच्या प्रतिध्वनीपासून ते तबल्याच्या तालापर्यंत, भीमबेटकाच्या कोरलेल्या प्रतीकांपासून ते आजच्या डिजिटल स्क्रीनपर्यंत, नटराजाच्या नृत्यापासून ते सिनेमॅटिक ब्लॉकबस्टरपर्यंत -हे पॅव्हेलियन भारताने जागतिक कथानकाला कसा  आकार दिला आणि यापुढेही देत आहे याचा चालताबोलता  संग्रह असेल.

मात्र हे  सांस्कृतिक प्रदर्शनापेक्षा अधिक  आहे - ते भारताच्या सर्जनशील सामर्थ्याची  आणि भविष्यातील दृष्टिकोनाची घोषणा आहे. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म, तंत्रज्ञान-जाणकार मोबाइल-प्रथम प्रेक्षक, जागतिक दर्जाचे व्हीएफएक्स, गेमिंग आणि अॅनिमेशन स्टुडिओ तसेच समृद्ध  स्टार्टअप परिसंस्थेसह  भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या माध्यम  आणि मनोरंजन बाजारपेठांपैकी एक आहे.

भारत पॅव्हेलियन हे माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेतले  निर्माते, सहयोगी आणि बदल घडवणाऱ्यांसाठी एक चैतन्यशील   व्यासपीठ आहे. हे संबंधितांना भारताच्या अपवादात्मक प्रतिभेशी, प्रगत कथाकथन तंत्रज्ञानाशी आणि वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेतील क्षमतेशी जोडण्याची एक अमूल्य संधी प्रदान करेल. सांस्कृतिक वारशाच्या प्रदर्शनाच्या पलीकडे जाऊन भारत पॅव्हेलियन हे आंतर-सांस्कृतिक भागीदारी आणि गुंतवणूकीला चालना देण्यासाठी मजबूत सरकारी पाठिंब्याचे प्रतिबिंब असेल -जे  सर्जनशील नवोन्मेष आणि सहकार्यासाठी जागतिक केंद्र म्हणून आपले स्थान बळकट  करेल.

वेव्हज 2025 मधील भारत पॅव्हेलियन हे असे ठिकाण आहे जिथे प्राचीन प्रेरणा आणि अत्याधुनिक नवोन्मेषांचा मिलाफ पहायला मिळेल.  समृद्ध सांस्कृतिक वारशासह, अतुलनीय सर्जनशील प्रतिभा आणि जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान  क्षमतांसह, भारत माध्यम  आणि मनोरंजन क्षेत्रातले  जागतिक नेतृत्व म्हणून उदयास येण्यास सज्ज आहे - जगाला खिळवून ठेवण्यास आणि प्रेरणा देण्यास सज्ज आहे.

 

* * *

PIB Mumbai | N.Chitale/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


Release ID: (Release ID: 2123591)   |   Visitor Counter: 27