श्रम आणि रोजगार मंत्रालय
कामगार आणि मजुरांवर अतितीव्र उष्णतेच्या लाटांचे विपरित परिणाम टाळण्यासाठी आणि त्यांचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे केंद्राचे मुख्य सचिव/प्रशासनांना लेखी निर्देश
Posted On:
22 APR 2025 6:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 एप्रिल 2025
केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना विविध क्षेत्रात काम करणारे कामगार आणि मजूर यांच्यावर अतितीव्र उष्णतेच्या लाटांचे विपरित परिणाम होऊ नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या संदर्भात मुख्य सचिव/ सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेश यांचे प्रशासक यांना कामगार आणि रोजगार मंत्रालयाने पत्र लिहिले आहे. रहिवासी/नियोक्ते/ बांधकाम कंपन्या/ उद्योग यांना कामगार/ मजूर यांच्यावर उष्णतेच्या लाटेचे विपरित परिणाम टाळण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश देण्याच्या आवश्यकतेवर या पत्रामध्ये भर देण्यात आला आहे.
कामाच्या तासांचे पुनर्नियोजन करण्यासहित, पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध करावे, कामाच्या तसेच विश्रांतीच्या जागांवर वायुवीजन आणि जागा थंड राखण्याच्या उपाययोजना, कामगारांच्या आरोग्याची नियमित तपासणी आणि बांधकाम कामगारांना तातडीच्या परिस्थितीत आईस पॅक पुरवणे आणि उष्माघात टाळणारी सामग्री पुरवणे इ. सहित विविध उपाययोजनांच्या यादीचा समावेश असलेल्या समन्वयित, बहु-स्तरीय दृष्टीकोनाची शिफारस या पत्रात करण्यात आली आहे.
खाण आणि कारखाना व्यवस्थापनांना देखील या पत्रात सूचना केल्या असून त्यामध्ये कामाची गती कमी करण्याची परवानगी द्यावी, वेळापत्रकामध्ये सोयीनुसार बदल, अति उष्णतेच्या काळात दोन-व्यक्तींचा कर्मचारीवर्ग, जमिनीखालील खाणींमध्ये योग्य प्रकारचे वायुवीजन सुनिश्चित करण्याचा समावेश आहे. कारखाने आणि खाणीं व्यतिरिक्त बांधकाम आणि वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगारांकडे विशेष लक्ष पुरवण्यावर आणि अतितीव्र उष्णतेच्या परिस्थितीत स्वतःचे कशा प्रकारे संरक्षण करावे याबाबत जागरुकता शिबिरे, कामगार चौकात पोस्टर्स आणि बॅनर्स यांच्या माध्यमातून कामगारांमध्ये माहितीचा प्रसार करण्यावर या पत्रात भर देण्यात आला आहे.
मंत्रालयाने आपल्या स्वतःच्या कामगार कल्याण महासंचालनालय, मुख्य कामगार आयुक्त,खाण सुरक्षा महासंचालनालय, यासारख्या संस्थानाही जागरुकता सत्रांचे आयोजन करण्याच्या आणि त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात कामगारांना उष्णतेच्या लाटेची कारणे आणि परिणाम याबाबत जागरुक करण्यावर, उष्णतेचा ताण, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उष्णतेच्या लाटांचे विपरित परिणाम टाळण्याच्या उपाययोजनांची माहिती देण्यावर भर देण्याच्या सूचना जारी केल्या आहेत. कामगार कल्याण महासंचालनालय आणि कामगार राज्य विमा महामंडळा अंतर्गत असलेल्या रुग्णालयांना देखील उष्माघाताच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी समर्पित डेस्क उभारण्याच्या आणि ओआरएस, आईस पॅक्स आणि इतर उष्माघात प्रतिबंधक सामग्री यांचा पुरवठा पुरेशा प्रमाणात सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
* * *
N.Chitale/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2123550)
Visitor Counter : 13