पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हरियाणात यमुना नगर येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी


विकसित भारतासाठी विकसित हरियाणा हाच आमचा निर्धार: पंतप्रधान

देशातील विद्युत उत्पादन वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, विजेचा अभाव हा राष्ट्र उभारणीत अडथळा ठरता कामा नये: पंतप्रधान

आम्ही सुरु केलेली पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना सौर पॅनेल्स बसवून विजेचे बिल शून्यावर आणता येते : पंतप्रधान

हरियाणाच्या शेतकऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत: पंतप्रधान

Posted On: 14 APR 2025 3:12PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणात यमुनानगर येथे विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले तसेच त्यांच्या हस्ते या प्रकल्पांचा कोनशीला समारंभ झाला. हरियाणाच्या जनतेला शुभेच्छा देऊन त्यांनी हरियाणाच्या पवित्र भूमीला आदरांजली वाहिली आणि ही भूमी माता सरस्वतीचे उत्पत्तिस्थान, मंत्रादेवीचे निवासस्थान, पंचमुखी हनुमानाची आणि पवित्र कपालमोचन साहिब यांची भूमी असल्याचा आवर्जून उल्लेख केला. “हरियाणा म्हणजे संस्कृती, भक्ती आणि समर्पण यांचा संगम आहे,” ते म्हणाले.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची दूरदृष्टी आणि प्रेरणा भारताच्या विकासात्मक वाटचालीला मार्गदर्शक ठरत आहे हे अधोरेखित करत पंतप्रधानांनी सर्व नागरिकांना बाबासाहेबांच्या 135 व्या जयंतीदिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

यमुनानगर हे केवळ एक शहर नसून भारताच्या औद्योगिक परिदृष्याचा महत्त्वाचा भाग आहे आणि येथील प्लायवूड, पितळ आणि पोलाद उद्योग अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देत आहेत,” पंतप्रधान मोदी म्हणाले. कपाल मोचन मेळा, ऋषी वेद व्यासांची पवित्र भूमी आणि गुरु गोविंद सिंहजी यांचे शस्त्रागार यांचा उल्लेख करत पंतप्रधानांनी या भूमीचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित केले. हरियाणाचे प्रभारी म्हणून काम करताना मोदी यांनी पंचकुला येथून वारंवार यमुनानगर येथे अनेक भेटी दिल्या असल्याची आठवण करत  त्यांनी यमुनानगरशी असलेल्या वैयक्तिक नात्याची माहिती दिली. त्यावेळी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या समर्पित वृत्तीच्या कामगारांप्रती कृतज्ञता व्यक्त करत मोदी यांनी या भागातील कठोर परिश्रम आणि वचनबद्धतेच्या शाश्वत परंपरेची नोंद घेतली.

तिसऱ्या कार्यकाळातील केंद्र तसेच राज्य सरकारच्या नेतृत्वाखाली हरियाणातील विकासाचा वेग दुप्पट झालेला दिसत आहे हे अधोरेखित करत पंतप्रधानांनी विकसित भारताच्या संकल्पनेचा भाग म्हणून विकसित हरियाणाची उभारणी करण्याप्रती कटिबद्धतेवर अधिक भर दिला. हरियाणाच्या जनतेची सेवा करण्यासाठी तसेच येथील युवकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक वेगाने आणि मोठ्या प्रमाणात काम करण्याप्रती सरकारचे समर्पण पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आज उद्घाटन झालेले प्रकल्प हे याच कटिबद्धतेचा पुरावा आहेत याकडे त्यांनी निर्देश केला आणि या नव्या विकासविषयक उपक्रमांसाठी त्यांनी हरियाणाच्या जनतेचे अभिनंदन केले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनाला पुढे नेण्याप्रती आपल्या सरकारच्या वचनबद्धतेबद्दल अभिमान व्यक्त करून पंतप्रधान मोदी यांनी औद्योगिक विकास हा सामाजिक न्यायाकडे नेणारा मार्ग आहे या बाबासाहेबांच्या विश्वासावर अधिक भर दिला. बाबासाहेबांनी भारतातील जमिनीच्या लहान तुकड्यांच्या मालकीची समस्या ओळखली आणि म्हणूनच पुरेशी शेतजमीन नसलेल्या दलितांना औद्योगीकरणातून अधिक लाभ मिळेल यावर अधिक भर दिला असे निरीक्षण पंतप्रधानांनी नोंदवले. कारखाने दलितांना रोजगाराच्या जास्त संधी उपलब्ध करून देतील आणि त्यातून त्यांची जीवनशैली सुधारेल हा बाबासाहेबांचा दृष्टीकोन मोदी यांनी सामायिक केला. भारताच्या औद्योगिकरणातील प्रगतीला चालना देण्यासाठी देशाचे पहिले उद्योगमंत्री डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासोबत काम करून या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नांमध्ये बाबासाहेबांनी महत्त्वाची भूमिका निभावली अशी पोचपावती देखील पंतप्रधान मोदी यांनी दिली.

औद्योगिकीकरण आणि वस्तुनिर्माण यांचा ताळमेळ ग्रामीण समृद्धीचा पाया असल्याचे दीनबंधु चौधरी छोटू राम जी यांनी ओळखले होते. शेतकरी जेव्हा शेतीसोबतच लघु उद्योगांच्या माध्यमातून त्यांचे उत्पन्न वाढवतील तेव्हाच गावांमध्ये खरी समृद्धी येईल, असा छोटू राम जी यांचा विश्वास होता, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. गावे आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करणारे चौधरी चरण सिंह यांचाही दृष्टिकोन असाच होता, असे सांगून औद्योगिक विकास शेतीला पूरक असावा, कारण दोन्ही अर्थव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत, या चौधरी चरणसिंह यांच्या दृष्टिकोनावर त्यांनी भर दिला.

'मेक इन इंडिया' आणि 'आत्मनिर्भर भारत'चा गाभा वस्तुउत्पादनाला चालना देणे असल्याचे सांगत पंतप्रधान मोदी यांनी सरकारचा उत्पादन क्षेत्रावरचा भर अधोरेखित केला. यंदाच्या अर्थसंकल्पातील 'मिशन मॅन्युफॅक्चरिंग' घोषणेतून याचे प्रतिबिंब उमटत असल्याचे ते म्हणाले.  "या मोहिमेचे उद्दिष्ट दलित, मागास, वंचित आणि उपेक्षित तरुणांसाठी जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करणे, त्यांना आवश्यक प्रशिक्षण देणे, व्यवसाय खर्च कमी करणे, एमएसएमई क्षेत्राला बळकटी देणे, उद्योगांना आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करणे आणि भारतीय उत्पादने जागतिक दर्जाची असण्याची सुनिश्चिती करणे आहे", असे ते म्हणाले. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अखंड वीज पुरवठ्याचे महत्त्व अधोरेखित करून आणि आजच्या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करून, त्यांनी दीनबंधू चौधरी छोटू राम औष्णिक वीज प्रकल्पाच्या तिसऱ्या एककाच्या कामाच्या प्रारंभाची  घोषणा केली. याचा लाभ  यमुनानगर आणि हरियाणाला होईल.   भारतातील प्लायवूडपैकी अर्धे उत्पादन यमुनानगरमध्ये होते  आणि अॅल्युमिनियम, तांबे आणि पितळ भांडी तयार करण्याचे हे केंद्र असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.    यमुनानगरमधील पेट्रोकेमिकल प्लांट उपकरणे अनेक देशांमध्ये निर्यात केली जातात. वाढीव वीज उत्पादनामुळे या उद्योगांना फायदा होईल आणि 'मिशन मॅन्युफॅक्चरिंग'ला पाठबळ  मिळेल यावर त्यांनी भर दिला.

विकसित भारताच्या उभारणीत विजेची महत्त्वाची भूमिका अधोरेखित करताना, पंतप्रधानांनी वीज उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारच्या बहुआयामी प्रयत्नांवर प्रकाश टाकला.  यात एक राष्ट्र -एक ग्रीड, नवीन कोळसा ऊर्जा संयंत्र, सौर ऊर्जा प्रकल्प आणि अणु क्षेत्राचा विस्तार यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. "विजेचा तुटवडा राष्ट्र उभारणीत अडसर ठरू नये याची सुनिश्चिती करण्यासाठी  वीज उत्पादन वाढवणे आवश्यक आहे", यावर त्यांनी भर दिला. मागील सरकारच्या राजवटीत 2014 पूर्वी वारंवार वीज खंडित होण्याच्या घटनांची त्यांनी आठवण करून दिली. जर काँग्रेस सत्तेत राहिली असती तर असे संकट कायम राहिले असते, असे ते म्हणाले.  त्या काळात कारखाने, रेल्वे आणि सिंचन व्यवस्थांवर गंभीर परिणाम झाला होता असे त्यांनी नमूद केले. गेल्या दशकात भारताने आपली वीज उत्पादन क्षमता जवळजवळ दुप्पट केली आहे आणि आता शेजारील देशांना वीज निर्यात करत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. हरियाणासाठी वीज उत्पादनावर आपल्या सरकारने लक्ष केंद्रित केल्यामुळे झालेल्या  फायद्यांवर पंतप्रधानांनी  प्रकाश टाकला.  हरियाणात सध्या 16,000 मेगावॅट वीज निर्मिती होत असून  येत्या काही वर्षांत ही क्षमता 24,000 मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्टही त्यांनी जाहीर केले.

औष्णिक वीज प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणे आणि नागरिकांना स्वतः वीजनिर्मिती करण्याचे अधिकार देणे या सरकारच्या दुहेरी दृष्टिकोनावर प्रकाश टाकताना, पंतप्रधान मोदी यांनीपंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेचा  उल्लेख केला. या योजनेअंतर्गत लोक त्यांच्या छतावर सौर पॅनेल बसवू शकतात, वीजदेयकांपासून मुक्ती मिळवू शकतात  आणि अतिरिक्त वीज विकून पैसेही कमवू शकतात.  देशभरातील 1.25 कोटींहून अधिक लोकांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. यात हरियाणातील लाखो लोकांनीही सहभागी  होण्यासाठी अर्ज केले आहेत. या योजनेच्या विस्ताराबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि संबंधित सेवा परिसंस्थेचाही विस्तार होत असल्याचे सांगितले. सौर क्षेत्र नवीन कौशल्ये निर्माण करत आहे, एमएसएमईसाठी संधी निर्माण करत आहे आणि तरुणांना  रोजगारासाठी असंख्य संधी खुल्या करत असल्याचे पंतप्रधानांनी  नमूद केले.

छोट्या शहरांमधील छोट्या उद्योगांना पुरेशी वीज आणि आर्थिक संसाधनांचा पुरवठा होत राहील याची सुनिश्चित करण्यावर केंद्र सरकारचा भर असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधोरेखित केले. कोविड-19 महामारीच्या काळात, सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना  आधार देण्यासाठी लाखो कोटी रुपयांची आर्थिक मदत पुरवल्याचे त्यांनी सांगितले. लघु उद्योगांना आपल्या व्याप्तीचा विस्तार करताना, तो सरकारचे पाठबळ गमावण्याच्या भीतीशिवाय करता यावा यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची व्याख्याही बदलली असल्याचेही त्यांनी नमूद केले. छोट्या उद्योगांसाठी विशेष क्रेडिट कार्ड आणि पत हमीच्या व्याप्तीत वाढ केल्याचा उल्लेखही त्यांनी केला केला. मुद्रा योजनेला नुकतीच 10 वर्षे पूर्ण झाली, या योजनेअंतर्गत 33 लाख कोटी रुपयांचे विना तारण कर्ज वितरित केले गेले अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेच्या लाभार्थ्यांपैकी 50% पेक्षा जास्त लाभार्थी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय  कुटुंबांमधले आहेत ही बाब त्यांनी आवर्जून नमूद केली. भारताच्या युवा वर्गाची मोठी स्वप्ने पूर्ण करण्याच्या दृष्टीने छोट्या उद्योगांना सक्षम करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

हरयाणाच्या  शेतकऱ्यांचे  प्रत्येक भारतीयाच्या थाळीतल्या  अन्नात योगदान  आहे  अशा शब्दांत पंतप्रधानांनी हरयाणाच्या शेतकऱ्यांच्या कठोर परिश्रमाचे कौतुक केले. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात खंबीरपणे त्यांच्यासोबतीने उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. हरयाणातील शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहितीही त्यांनी दिली. आता राज्य सरकार किमान आधारभूत किंमतीवर  24 पिकांची खरेदी करत असल्याची बाब त्यांनी नमूद केली. पंतप्रधान पिक विमा योजनेचा हरियाणातल्या लाखो शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे, या योजनेअंतर्गत 9,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे दावे सादर  झाल्याचेही त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून  हरयाणातील शेतकऱ्यांना 6,500 कोटी रुपयांचा निधी वितरित केला आहे, यामुळे या शेतकऱ्यांच्या उपजीविकेला आणि प्रगतीला अधिकचे पाठबळ मिळाले आहे असे पंतप्रधान म्हणाले.

हरयाणा सरकारने ब्रिटीश राजवटीपासून चालत आलेला जल कर  रद्द करायचा निर्णय घेतल्याची बाबही पंतप्रधानांनी अधोरेखित केली. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यावर कर भरण्यापासून मुक्ती मिळाली असल्याचे पंतप्रधानांनी  नमूद केले. या कराअंतर्गत असलेली यापूर्वीची 130 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची थकबाकी देखील माफ केली असल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी आणि पशुधन मालकांसाठी उत्पन्नाच्या नवनव्या संधी उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना शेण, कृषी प्रक्रियेतले टाकाऊ अवशेष आणि इतर सेंद्रिय कचऱ्यातून बायोगॅस तयार करून कचरा व्यवस्थापित करण्यात तसेच अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी उपयुक्त ठरत असलेल्या गोबरधन योजनेविषयी  देखील सांगितले.  या वर्षीच्या अर्थसंकल्पात देशभरात 500 गोबरधन प्रकल्प सुरू करण्याची घोषणा केली असल्याचेही त्यांनी सांगितले. यमुनानगरमध्ये नवीन गोबरधन प्रकल्पाची पायाभरणी केली असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. या प्रकल्पामुळे महानगरपालिकेची वार्षिक 3 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे ते म्हणाले. गोबरधन योजना ही स्वच्छ भारत अभियानासाठीही पुरक ठरत असून, यामुळे स्वच्छता आणि शाश्वततेचे अभियान यशस्वीपणे पुढे जात असल्याचे ते म्हणाले.

हरियाणा अत्यंत वेगाने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आपल्या आजच्या भेटीआधी हरयाणाला दिलेल्या भेटीत आपण  हिसारला अयोध्या धामसाठी थेट रवाना होणाऱ्या विमानसेवेचे उद्घाटन केल्याचे स्मरण त्यांनी करून दिले. रेवाडीसाठी नवीन बायपास बांधणार असल्याची घोषणा केली. या बायपासमुळे बाजारपेठा, चौक आणि रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूक कोंडी कमी होईल आणि वाहनांची शहरातली ये - जा सुरळीत होणार असल्याचे ते म्हणाले. हा बायपास चार-पदरी असेल, यामुळे दिल्ली आणि नारनौल दरम्यानच्या प्रवासाचा कालावधी एका तासाने कमी होईल अशी माहिती त्यांनी दिली. या बायपाससाठी त्यांनी हरयाणाच्या जनतेचे अभिनंदही केले.

राजकारण हे आपल्यासाठी लोकांची आणि राष्ट्राची सेवा करण्याचे माध्यम आहे ही बाब पंतप्रधानांनी अधोरेखित केली. आमचा पक्ष आपण दिलेली आश्वासने पूर्ण करतो, आपण तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर आपले सरकार जनतेला दिलेली वचने पूर्ण करत आहे आणि हरयाणा  याची साक्ष आहे, असे ते म्हणाले. यानिमित्ताने त्यांनी विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांसोबतची तुलना उपस्थितांसमोर मांडली आणि विरोधी पक्षांनी जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप केला. आता हिमाचल प्रदेशातील विकास आणि कल्याणकारी प्रकल्प थांबले आहेत आणि तिथल्या जनतेला संघर्ष करावा लागत आहे असे ते म्हणाले. कर्नाटकातही सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात वीज, दूध, बस भाडे आणि बियाणांसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत, समाज माध्यमांवर कर्नाटकातील विद्यमान सरकारबद्दल नाराजी दिसून येत आहे असे त्यांनी सांगितले. तिथे भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत, खुद्द मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनीही कर्नाटक भ्रष्टाचारात प्रथम क्रमांकावर असल्याचे म्हटले आहे असे पंतप्रधान म्हणाले.

तेलंगणामधील सध्याचे राज्य सरकार लोकांना दिलेल्या आश्वासनांकडे दुर्लक्ष करत आहे आणि जंगल नष्ट करण्यावर भर देत आहे. यामुळे निसर्ग व वन्यजीवांचे नुकसान होत असल्याची टीका मोदी यांनी केली. त्यांनी दोन सरकारांच्या कारभारातील विरोधाभास दाखवून दिला. आपले सरकार प्रामाणिक आणि विकसित भारताच्या उभारणीसाठी समर्पित आहे तर विरोधक जनतेला धोका देत असून त्यांचे लक्ष केवळ सत्तेवर केंद्रित आहे असे मोदी म्हणाले. आपल्या सरकारच्या विकासाप्रती असलेल्या वचनबद्धतेचे उदाहरण देताना त्यांनी यमुनानगर प्रकल्पाच्या कामाविषयी सांगितले. 

बैसाखी व जालियनवाला बाग हत्याकांडाच्या 106 व्या स्मृतीदिनाविषयी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी आयुष्याचा त्याग केलेल्या हुतात्म्यांच्या सन्मानार्थ गौरवोद्गार काढले व ब्रिटीश राजवटीचे क्रौर्य ठळकपणे सांगितले. शंकरन नायर यांच्या उदाहरणातून त्यांनी मानवता व राष्ट्रासाठी कार्यरत राहण्याच्या अतुलनीय भावनेचा आणखी एक पैलू सांगितला.  ते पुढे म्हणाले की, नामांकित वकील असलेल्या व ब्रिटीश सरकारमध्ये वरीष्ठ अधिकारी असलेल्या शंकरन नायर यांनी नोकरीचा राजीनामा देऊन परकीय राजवटीच्या अत्याचारांविरोधात आवाज उठवला. त्यांनी जालियनवाला बाग खटला एकहाती लढवला आणि ब्रिटीश साम्राज्याला हादरे देत या हत्याकांडासाठी त्यांना न्यायालयात जबाबदार ठरविले. शंकरन नायर यांची ही कामगिरी एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेचे लक्षणीय उदाहरण आहे. केरळमधील एका व्यक्तीने पंजाबमधल्या हत्याकांडासाठी ब्रिटीश सरकारविरोधात कशाप्रकारे लढा दिला हे यातून दिसून येते. एकतेची ही भावना आणि परकीयांना  विरोध ही  भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामागची खरी प्रेरणा होती आणि विकसित भारताच्या प्रवासातही ही एकतेची भावना प्रेरणा देण्याचे काम करेल असे ते म्हणाले. 

शेवटी पंतप्रधानांनी सर्वांना शंकरन नायर यांच्या योगदानाबद्दल जाणून घेण्याचे आवाहन केले आणि केंद्र व राज्य सरकारांनी गरीब, शेतकरी, युवा आणि महिला या समाजाच्या आधारस्तंभांना सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत या मुद्द्यावर भर दिला.  सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हरियाणाच्या विकासाला दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह  सैनी, केंद्रिय मंत्री मनोहर लाल, राव इंदरजित सिंह , कृष्ण पाल गुर्जर आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

पार्श्वभूमी

या क्षेत्रातील उर्जाविषयक पायाभूत सुविधांना चालना देण्यासह शेवटच्या गावापर्यंत वीज पोहोचवण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधानांच्या हस्ते यमुनानगर इथे दीनबंधू छोटू राम औष्णिक उर्जा प्रकल्पाअंतर्गत 800 मेगावॅट क्षमतेच्या आधुनिक औष्णिक उर्जा प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली.  233 एकर जागेत उभारलेल्या 8,470 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पामुळे हरियाणाच्या उर्जा स्वावलंबनाला चालना मिळेल व राज्यभरात अखंड वीजपुरवठा करता येईल. 

गोबर म्हणजेच जैव –कृषी संसाधनाला प्रोत्साहन देण्याचा दृष्टीकोन पुढे नेत   यमुनानगरमधील मुकरबपूर इथल्या कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची पायाभरणीदेखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली. या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता 2,600 मेट्रीक टन इतकी आहे व जैविक कचरा व्यवस्थापनात यांची चांगली मदत होईल. स्वच्छ उर्जा निर्मिती आणि पर्यावरण संवर्धनालादेखील हातभार लागेल.

पंतप्रधानांनी भारतमाला परियोजना अंतर्गत बांधण्यात येत असलेल्या 1070 कोटी रुपये खर्चाच्या व 14.4 किलोमीटर लांबीच्या रेवाडी बाह्यवळण प्रकल्पाचेदेखील उद्घाटन केले. यामुळे या  शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल, दिल्ली ते नारनौल  प्रवासाचा वेळ सुमारे एक तासाने कमी होईल आणि हरियाणातील आर्थिक व सामाजिक कार्याला चालना मिळेल.

***

N.Chitale/S.Chitnis/S.Kakade//T.Pawar/S.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2121651) Visitor Counter : 19