पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिसार विमानतळाच्या 410 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या नवीन टर्मिनल इमारतीची केली पायाभरणी
आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती असल्यामुळे आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी, संपूर्ण देशासाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे: पंतप्रधान
आज हरियाणा ते अयोध्या धाम विमानसेवा सुरू झाली असून आता हरियाणातील श्रीकृष्णाची पवित्र भूमी थेट भगवान रामाच्या नगरीशी जोडली गेली आहे: पंतप्रधान
एकीकडे, आमचे सरकार कनेक्टिव्हिटीवर भर देत आहे आणि दुसरीकडे, आम्ही गरिबांचे कल्याण आणि सामाजिक न्यायदेखील सुनिश्चित करत आहोत: पंतप्रधान
Posted On:
14 APR 2025 12:14PM by PIB Mumbai
विमानप्रवास सर्वांसाठी सुलभ, किफायशीर आणि सुरक्षित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील हिसार येथील महाराजा अग्रसेन विमानतळाच्या 410 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. त्यांनी हरियाणाच्या लोकांना शुभेच्छा दिल्या, त्यांची शक्ती, खिलाडूवृत्ती आणि बंधुता ही हरियाणाची ओळख असल्याचे कौतुक त्यांनी केले. या व्यस्त कापणीच्या हंगामात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्यांनी दिलेल्या आशीर्वादांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
पंतप्रधानांनी गुरू जंभेश्वर, महाराजा अग्रसेन आणि पवित्र अग्रोहा धाम यांना वंदन केले. त्यांनी हरियाणा, विशेषतः हिसारच्या आनंददायी आठवणी सांगितल्या. त्यांच्या पक्षाने त्यांना या राज्याची जबाबदारी जेव्हा सोपवली होती तेव्हा इथल्या अनेक सहकाऱ्यांसोबत काम करतानाच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला. हरियाणामध्ये पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी या सहकाऱ्यांची समर्पित वृत्ती आणि त्यांचे प्रयत्न यावर त्यांनी प्रकाश टाकला. विकसित हरियाणा आणि विकसित भारताच्या ध्येयासाठी आपल्या पक्षाच्या वचनबद्धतेबद्दल, या लक्ष्यासाठी पक्ष करत असलेल्या सर्वतोपरी कामाबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला.
''राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती असल्यामुळे आजचा दिवस संपूर्ण देशासाठी महत्त्वाचा दिवस आहे,'' असे पंतप्रधान मोदी म्हणाले. बाबासाहेबांचे जीवन, संघर्ष आणि संदेश हे सरकारच्या 11 वर्षांच्या प्रवासाचा प्रेरणस्तंभ असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सरकारचा प्रत्येक निर्णय, प्रत्येक धोरण आणि प्रत्येक दिवस बाबासाहेबांच्या दृष्टिकोनाला समर्पित आहे यावर त्यांनी भर दिला. वंचित, पीडित, शोषित, गरीब, आदिवासी समुदाय आणि महिलांचे जीवन सुधारण्यासाठी आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सरकारच्या वचनबद्धतेचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निरंतर आणि जलद विकास हा आपल्या सरकारचा मंत्र आहे असे त्यांनी सांगितले.
श्रीकृष्णाची पवित्र भूमी आणि भगवान राम यांच्या नगरीला जोडणाऱ्या थेट दुव्याचे प्रतीक असलेल्या हरियाणा ते अयोध्या धाम या विमानसेवेच्या प्रारंभाची त्यांनी घोषणा केली. लवकरच इतर शहरांसाठी विमानसेवा सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. हिसार विमानतळावरील नवीन टर्मिनल इमारतीच्या पायाभरणीविषयी त्यांनी सांगितले आणि हरियाणाच्या आकांक्षा नव्या उंचीवर नेण्याच्या दिशेने हे एक पाऊल असल्याचे वर्णन केले. या महत्त्वपूर्ण टप्प्याबद्दल त्यांनी हरियाणाच्या जनतेचे अभिनंदन केले.
हवाई चप्पल घालणारेही विमानप्रवास करतील, या आपल्या आश्वासनाची आठवण करून देत हा संकल्प आता देशभरात प्रत्यक्षात येत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. गेल्या 10 वर्षांत लाखो भारतीयांनी पहिल्यांदाच हवाई प्रवासाचा अनुभव घेतल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ज्या भागात पूर्वी व्यवस्थित रेल्वे स्थानके नव्हती अशा ठिकाणीही नवीन विमानतळ बांधण्यात आले आहेत, असे त्यांनी नमूद केले. वर्ष 2014 पूर्वी भारतात 74 विमानतळ होते, ही संख्या 70 वर्षांत गाठली गेली होती, तर आज विमानतळांची संख्या 150 पेक्षा अधिक आहे, असे त्यांनी सांगितले. उडान योजनेशी जवळजवळ 90 विमानतळ जोडण्यात आले आहेत, उडान योजनेअंतर्गत 600 हून अधिक मार्गांवर हवाई सेवा सुरू आहे, ज्यामुळे अनेकांना परवडणारा हवाई प्रवास शक्य झाला आहे. यामुळे दरवर्षी हवाई प्रवाशांच्या संख्येने विक्रम रचला आहे, असे त्यांनी नमूद केले. विविध विमान कंपन्यांनी 2,000 नवीन विमानांच्या विक्रमी ऑर्डर दिल्या आहेत, ज्यामुळे वैमानिक, हवाई सुंदरी आणि इतर सेवांसाठी असंख्य नोकऱ्या निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले. विमान देखभाल क्षेत्र रोजगाराच्या महत्त्वपूर्ण संधी निर्माण करेल, याकडे त्यांनी लक्ष वेधले. "हिसार विमानतळ हरियाणाच्या युवा पिढीच्या आकांक्षांना बळ देईल, त्यांना नव्या संधी आणि स्वप्ने प्रदान करेल", असेही ते म्हणाले.
''आमचे सरकार एकीकडे कनेक्टिव्हिटीवर लक्ष केंदित करताना,दुसरीकडे गरिबांचे कल्याण आणि सामाजिक न्यायाची सुनिश्चिती करत संविधान निर्मात्यांच्या आकांक्षा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करत आहे,'' यावर पंतप्रधानांनी भर दिला. काँग्रेसने डॉ. आंबेडकर यांना योग्य आदर दिला नाही, अशी टीका पंतप्रधानांनी केली. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असताना त्यांचा अपमान केला, निवडणुकीत दोनदा त्यांचा पराभव घडवून आणला आणि त्यांना व्यवस्थेतून वगळण्याचा कट रचला, असे ते म्हणाले. बाबासाहेबांच्या निधनानंतर, काँग्रेस पक्षाने त्यांचा वारसा पुसून टाकण्याचा आणि त्यांचे विचार दडपण्याचा प्रयत्न केला. डॉ. आंबेडकर हे संविधानाचे रक्षक होते, तर काँग्रेस संविधानाची विध्वंसक बनली . डॉ. आंबेडकरांचे उद्दिष्ट समानता आणण्याचे होते, तर काँग्रेसने देशात मतपेढीच्या राजकारणाचा विषाणू पसरवला, अशी टीका पंतप्रधानांनी केली.
बाबासाहेबांनी प्रत्येक गरीब आणि वंचित व्यक्तीला स्वप्ने पाहणे आणि त्यांच्या आकांक्षा पूर्ण करणे शक्य करुन देणाऱ्या सन्मानपूर्ण जीवनाची परिकल्पना केली होती अशी टिप्पणी पंतप्रधान मोदी यांनी केली. याधीच्या सरकारांनी त्यांच्या दीर्घ कार्यकाळात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीय समुदायांतील व्यक्तींना दुय्यम दर्जाच्या नागरिकांची वागणूक दिली अशी टीका त्यांनी केली. त्या सरकारांच्या काळात काही नेत्यांच्या तरणतलावांमध्ये पाणी पोहोचत असे, मात्र गावांमध्ये पाणीच उपलब्ध नसे ही विषमता अधोरेखित करत पंतप्रधान मोदी म्हणाले की स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 70 वर्षे उलटूनही ग्रामीण भागातील केवळ 16% घरांना नळाने पाणीपुरवठा होत होता. यामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीय समुदायांवर प्रमाणाबाहेर परिणाम होत होता. गेल्या 6-7 वर्षांमध्ये त्यांच्या सरकारने 12 कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाचे पाणी उपलब्ध करून दिले अशी माहिती त्यांनी दिली. बाबासाहेबांच्या आशीर्वादाने प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा होईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. शौचालयांच्या अभावामुळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीय समुदायांतील व्यक्तींवर झालेल्या परिणामांबद्दल देखील त्यांनी चर्चा केली. समाजातील वंचितांसाठी सन्मानाचे जीवन सुनिश्चित करत 11 कोटींहून अधिक शौचालयांच्या उभारणीसाठी सरकारने केलेले प्रयत्न त्यांनी ठळकपणे मांडले.
पूर्वीच्या सरकारांच्या राजवटीत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीय समुदायांतील व्यक्तींना लक्षणीय अडथळ्यांचा सामना करावा लागला आणि त्यांच्यासाठी बँकांच्या सेवा मिळणे देखील दुरापास्त होते अशी टीका करत पंतप्रधान मोदी म्हणाले की विमा, कर्जे आणि वित्तीय मदत या बाबी त्यांच्यासाठी केवळ आकांक्षा होत्या. रालोआ सरकारच्या कार्यकाळात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीय समुदाय हे जनधन खात्यांचे सर्वात मोठे लाभार्थी ठरले याकडे त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधले. या समाजांतील व्यक्ती आता त्यांच्या आर्थिक समावेशनाचे आणि सक्षमीकरणाचे प्रतीक ठरलेली रूपे कार्डे आत्मविश्वासाने सादर करतात याचा त्यांनी अभिमानाने उल्लेख केला.
काँग्रेस पक्षावर आणखी टीका करत मोदी म्हणाले की या पक्षाने पवित्र संविधानाचा वापर केवळ सत्ता मिळवण्याचे साधन म्हणून केला. ते म्हणाले की जेव्हा जेव्हा त्यांच्या सत्तासामर्थ्यावर गदा आली तेव्हा त्यांनी संविधानाची तत्वे पायदळी तुडवली. आणीबाणीच्या काळाचा ठळक उल्लेख करत ते म्हणाले की, तत्कालीन सरकारने सत्ता टिकवून ठेवण्यासाठी संविधानाचा आत्माच कमजोर केला. सर्वांसाठी एकसमान नागरी संहिता लागू करणे हे संविधानाचे सार आहे मात्र तत्कालीन सरकारने त्याची अंमलबजावणी केली नाही यावर अधिक भर देत पंतप्रधानांनी संविधानातील तत्वांना अनुसरून असलेल्या एकसमान नागरी संहितेच्या अंमलबजावणीला उत्तराखंड राज्यात होत असलेल्या विरोधाकडे निर्देश केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की संविधानाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती तसेच इतर मागासवर्गीय समुदायांना आरक्षणाची सुविधा दिली मात्र काँग्रेसने याचा उपयोग तुष्टीकरणाचे साधन म्हणून केला. सरकारी निविदा प्रक्रियेत धर्मावर आधारित आरक्षणे देण्यासंदर्भात संविधानात अशा प्रकारची कोणतीही तरतूद नसताना कर्नाटकातील विद्यमान सरकार अशी पद्धत स्वीकारत असल्याबद्दलच्या अहवालांना त्यांनी अधोरेखित केले. अशा पद्धतीच्या तुष्टीकरणाच्या धोरणांमुळे मुसलमान समाजाचे मोठे नुकसान झाले असून या समाजातील केवळ मुठभर कट्टरपंथीयांना यातून लाभ झाला तर उर्वरित समाज दुर्लक्षित, अशिक्षित आणि गरीबच राहिला. वक्फ कायदा हा पूर्वीच्या सरकारच्या सदोष धोरणांचा सर्वात मोठा पुरावा आहे याकडे निर्देश करत पंतप्रधान म्हणाले की वर्ष 2013 मध्ये, निवडणुकीच्या काही महिने अगोदर, काँग्रेसने त्यांच्या मतदारांना खुश करण्यासाठी वक्फ कायद्यात सुधारणा केली आणि त्याला अनेक संवैधानिक तरतुदींच्या वरचे स्थान दिले.
मुस्लीम कल्याणासाठी काम केल्याचा दावा केल्याबद्दल आणि प्रत्यक्षात कोणतीही अर्थपूर्ण कामगिरी करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल काँग्रेस पक्षावर टीका करत मोदी म्हणाले की जर त्या पक्षाला मुस्लीम समुदायाची खरी काळजी होती तर त्यांनी त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून एका मुस्लीम व्यक्तीची नेमणूक करायला हवी होती किंवा निवडणुकीत उभे राहणाऱ्या त्यांच्या उमेदवारांपैकी 50% तिकिटे मुस्लीम उमेदवारांना द्यायला हवी होती. पंतप्रधान म्हणाले की काँग्रेसचा हेतू कधीच मुस्लीमांच्या खऱ्या कल्याणाचा नव्हता आणि यातून त्यांचे खरे स्वरूप उघड होते. वक्फच्या अखत्यारीत असलेल्या विस्तीर्ण भूमीचा वापर मुसलमान समाजातील गरीब, निराधार महिला आणि मुले यांच्यासाठी होणे अपेक्षित होते मात्र मुठभर भूमाफियांनी त्यांचे शोषण केले हे अधोरेखित करत मोदी म्हणाले की हे माफिया दलित, मागास वर्ग तसेच आदिवासींच्या जमिनी हडप करत असून पसमंदा मुसलमान समुदायाला काहीही लाभ मिळालेला नाही. वक्फ कायद्यातील सुधारणांमुळे अशा शोषणाला आला बसेल असे नमूद करत सुधारित कायद्यातील एका महत्त्वाच्या तरतुदीवर अधिक भर देत पंतप्रधान म्हणाले की या तरतुदीमुळे वक्फ बोर्ड आदिवासींच्या जमिनींना हात लावू शकणार नाहीत याची सुनिश्चिती करून घेण्यात आली आहे.आदिवासींच्या हितांचे संरक्षण करण्याच्यादृष्टीने हे एक मोठे पाऊल असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नवीन तरतुदींमुळे वक्फच्या पावित्र्याचे जतन होईल, आणि यातून गरीब आणि पस्मंदा मुस्लिम कुटुंबांचे, महिला आणि मुलांचे हक्क अबाधित राहतील याची सुनिश्चिती होईल, असे ते म्हणाले. यातून राज्य घटनेतील अपेक्षित खऱ्या भावनेचे आणि खऱ्या सामाजिक न्यायाचे प्रतिबिंब उमटले असल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने 2014 सालापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारशाचा सन्मान करणाऱ्या आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने राबवलेल्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. भारतात आणि परदेशात बाबासाहेबांशी संबंधित स्थळांकडे अनेक वर्षे दुर्लक्ष केले गेले, मुंबईतील इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचे स्मारक उभारण्यासाठीही लोकांना आंदोलन करावे लागले या बाबी त्यांनी नमूद केल्या. मात्र आपल्या नेतृत्वातील केंद्र सरकारने, बाबासाहेबांचे महू येथील जन्मस्थान, लंडनमधील ते शिक्षणासाठी राहीले होते ते ठिकाण, दिल्लीतील त्यांचे महापरिनिर्वाण स्थळ आणि नागपूरमधील दीक्षाभूमी यांसारख्या सर्व प्रमुख स्थळांचा पंचतीर्थ उपक्रमाअंतर्गत विकास केल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी अलिकडेच आपल्याला दीक्षाभूमीला भेट देण्याचा सन्मान मिळाल्याचा अनुभवही त्यांनी उपस्थितांसोबत सामायिक केला. सामाजिक न्यायाचा मोठा दावा करणारी काँग्रेस, त्यांच्या कार्यकाळात बाबासाहेब आणि चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात मात्र अपयशी ठरल्याची टीका पंतप्रधानांनी केली. मात्र जेव्हा केंद्रात भाजपाचे समर्थन असलेले सरकार सत्तेत होते त्यावेळीच बाबासाहेबांना भारतरत्न दिला गेला, तसेच भाजपाचीच सत्ता असतानाच चौधरी चरण सिंह यांनाही भारतरत्न देऊन सन्मानित केले, याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.
हरयाणा सरकारने गरीबांसाठी सामाजिक न्याय आणि कल्याणाची वाटचाल सातत्याने बळकट केल्याचे म्हणत त्यांनी हरयाणा सरकारचे कौतुक केले. मात्र याआधीच्या सत्ताधाऱ्यांच्या काळात हरयाणातील सरकारी नोकऱ्यांची स्थिती दयनीय होती, त्यावेळी उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी राजकीय लागेबांधे यावर अवलंबून राहावे लागत होते किंवा कौटुंबिक मालमत्ता विकावी लागत होती असे ते म्हणाले. मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांच्या सरकारने या भ्रष्ट प्रथांचे उच्चाटन केल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले. हरयाणाने लाच किंवा शिफारशीशिवाय नोकऱ्या देण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे, अशी प्रशंसा त्यांनी केली. याआधीच्या सरकारांनी हरयाणातील 25,000 युवांना सरकारी नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न केले मात्र नायब सिंह सैनी यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारताच, हजारो पात्र उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरित केली, त्यांची ही कृती त्यांच्या सुशासनाचेच उदाहरण असल्याचे पंतप्रधान म्हणाले. आगामी काळात हजारोंच्या संख्यने नवीन नोकऱ्या निर्माण करण्याच्या सरकारच्या आराखड्याचेही त्यांनी कौतुक केले.
सशस्त्र दलात मोठ्या संख्येने हरयाणातील युवा वर्ग सेवा देत असल्याचे नमूद करत पंतप्रधानांनी राष्ट्रासाठी हरयाणा देत असलेले महत्वाचे योगदानाही अधोरेखित केले. या आधीच्या सरकारांनी अनेक दशके वन रॅ न्क वन पेन्शन योजनेबाबत केलेल्या फसवणुकीवरही पंतप्रधांनी टीका केली. मात्र आपल्या सरकारनेच ती लागू केल्याचे त्यांनी नमूद केले. या योजनेअंतर्गत हरयाणाचे रहिवासी असलेल्या माजी सैनिकांना 13,500 कोटी रुपये वितरित केले असल्याची माहिती त्यांनी दिली. याआधीच्या सरकारने या योजनेसाठी केवळ 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती आणि देशाच्या जवानांची दिशाभूल केली होती असेही पंतप्रधानांनी सांगितले. याआधीच्या सरकारने दलित, मागास वर्ग किंवा सैनिकांना कधीही खऱ्या अर्थाने पाठबळ दिले नाही अशी टीका त्यांनी केली.
विकसित भारताच्या दृष्टिकोनाला बळकटी देण्यात हरयाणा महत्वाची भूमिका बजावेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. क्रीडा तसेच कृषी क्षेत्रातल्या हरयाणाच्या जागतिक प्रभावाचेही त्यांनी कौतुक केले. हरयाणाच्या युवा वर्गावरही आपला विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. नवीन विमानतळ आणि उड्डाणे हरयाणाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठीचे प्रेरणास्रोत आहेत असे ते म्हणाले. विकासाचा हा नवा टप्पा गाठल्याबद्दल त्यांनी हरयाणाच्या जनतेला शुभेच्छाही दिल्या
या कार्यक्रमाला हरयाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी, केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
महाराजा अग्रसेन विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीत अत्याधुनिक प्रवासी टर्मिनल, विमान मालवाहतूक टर्मिनल आणि एटीसी इमारतीची सुविधा असणार आहे. या विमानतळावरून हिसार ते अयोध्या (आठवड्यातून दोनदा), जम्मू, अहमदाबाद, जयपूर आणि चंदीगडसाठी आठवड्यातून तीन उड्डाणे होणार आहेत. विकासाचा हा टप्पा हरयाणाच्या विमान वाहतूक विषयक जोडणीतली एक महत्वाची झेप आहे.
***
N.Chitale/S.Kakade//S.Chitnis/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2121614)
Visitor Counter : 22
Read this release in:
Bengali
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam