सहकार मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांचे भोपाळमध्ये राज्यस्तरीय सहकारी परिषदेत मुख्य अतिथी म्हणून मार्गदर्शन
प्रविष्टि तिथि:
13 APR 2025 7:12PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ येथे आयोजित राज्यस्तरीय सहकारी परिषदेमध्ये मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले. शाह यावेळी म्हणाले की, मध्य प्रदेशमध्ये कृषी, पशुपालन आणि सहकारी या तीन क्षेत्रांमध्ये खूप वाव आहे. याचा पूर्ण लाभ घेण्यासाठी खूपच जास्त काम करणे आवश्यक आहे.
केंद्रीय सहकारमंत्री म्हणाले की, आज राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ (एनडीडीबी) आणि मध्यप्रदेश सहकारी दुग्ध महासंघ (एमपीसीडीएफ) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यांनी सांगितले की, सध्या मध्य प्रदेशात साडेपाच कोटी लिटर दूध उत्पादन होते, जे देशाच्या एकूण दूध उत्पादनाच्या 9 टक्के आहे. यामध्ये सहकारी दुग्ध संस्थांचा वाटा एक टक्क्यापेक्षा कमी आहे. मध्य प्रदेश आणि राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळामधील या करारामुळे हा टक्का वाढेल.
ते पुढे म्हणाले की, एखादा शेतकरी आपले दूध खुल्या बाजारात विकण्यासाठी जातो त्यावेळी त्याचे शोषण होते. आपले उद्दिष्ट असे आहे की प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकरी लवकरात लवकर सहकारी दुग्ध संस्थेशी जोडला जावा आणि या माध्यमातून त्याला विविध सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. या माध्यमातून दुधापासून चीज, ताक, दही, लस्सी इत्यादी उत्पादने तयार करून ती विकली जातील आणि शेतकऱ्याला त्याचा नफा मिळेल.
शाह यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात मध्य प्रदेशात प्राथमिक दुग्ध संस्थांचा विस्तार करणे, दूध संकलन वाढवणे, पशुधनाला चांगला चारा उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या जाती सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. याद्वारे प्रत्येक पशुधनाकडून अधिक दूध मिळेल. दूध प्रक्रिया करून अधिक नफा मिळवण्यासाठी प्रक्रिया केंद्रही उभारणे गरजेचे आहे.
ते म्हणाले की, मोदी सरकार मध्य प्रदेश सरकारच्या सहकार्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शक्य ते सर्व उपाय योजण्यास वचनबद्ध आहे.
***
S.Patil/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2121504)
आगंतुक पटल : 59