माहिती आणि प्रसारण मंत्रालय

आगामी वेव्हज परिषद 2025 च्या पार्श्वभूमीवर ट्रुथटेल हॅकेथॉनच्या पहिल्या 5 विजेत्यांची घोषणा


चुकीच्या माहितीचा सामना करण्यासाठी एआय उपाय विकसित केल्याबद्दल युनिक्रॉन, अल्केमिस्ट, हूशिंग लायर्स, बग स्मॅशर्स आणि व्हॉर्टेक्स स्क्वॉड या संघांनी जिंकले 10 लाख रुपयांचे पारितोषिक

एआय व्हेरिफिकेशन टूल्सपासून मॅनिपुलेटेड मीडिया डिटेक्शन सिस्टीमपर्यंतचे नवोन्मेशी उपाय 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्हज परिषदेत प्रदर्शित केले जाणार

Posted On: 07 APR 2025 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 7 एप्रिल 2025

 

इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशनने (आयसीईए) माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या (एमआयबी) सहयोगाने, आयोजित केलेल्या ट्रुथ टेल हॅकेथॉनच्या पहिल्या पाच विजेत्यांची आज घोषणा केली. ट्रुथ टेल हॅकेथॉन हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चुकीची माहिती आणि माहितीमध्ये फेरफार करणाऱ्या प्रसार माध्यमांचा सामना करणारे जागतिक आव्हान आहे. हे हॅकेथॉन आगामी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्हज), अर्थात जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद 2025 मधील 'क्रिएट इन इंडिया चॅलेंज' चा एक भाग आहे. इंडिया हॅबिटॅट सेंटर, नवी दिल्ली येथे आयोजित विशेष कार्यक्रमात विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी निवडलेल्या पहिल्या 25 नवोन्मेशींनी उद्योग जगतातील तज्ञांच्या पॅनेलसमोर आपल्या कामाचा नमुना   आराखडा सादर केला.  

जगभरातून आलेल्या 5,600 पेक्षा जास्त प्रवेशिकांमधून निवड झालेल्या पुढील पाच विजेत्या नवोन्मेशींनी एकत्रितपणे 10 लाख रुपयांचे रोख पारितोषिक मिळवले.

  • दिल्लीच्या टीम युनिक्रॉनने त्यांच्या नवोन्मेशी कामासाठी पारितोषिक पटकावले- मजकूर, प्रतिमा आणि व्हिडिओंमधील चुकीची माहिती शोधणारे अन्वेषा.
  • डेहराडूनच्या टीम अल्केमिस्टला VeriStream साठी पारितोषिक देण्यात आले- प्रत्येक फ्रेममध्ये फॅक्ट-फर्स्ट, लॅंगचेन वापरणारा एक सर्वसमावेशक उपाय, जो एनएलपी संचालित आहे, गतिशील नॉलेज ग्राफ्स, GIS दृष्टीकोन, आणि थेट प्रसारणातील चुकीची माहिती शोधण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी स्पष्टीकरण करण्याची क्षमता असणारी  एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता).
  • बंगळूरूच्या टीम हूशिंग लायर्सला नेक्सस ऑफ ट्रुथसाठी पुरस्कार मिळाला, हे डीपफेक शोधण्यासाठी डिझाइन केलेले एआय-संचालित साधन असून, नवीन बातम्यांची सत्यता पडताळते, खोटी माहिती त्वरित लक्षात आणून देते, याला बहुभाषिक समर्थन आणि  लाइव्ह-स्ट्रीमिंग अलर्टची जोड आहे.
  • लाइव्ह ट्रुथसाठी दिल्लीच्या टीम बग स्मॅशर्सला पुरस्कार देण्यात आला: एआय संचालित चुकीची माहिती शोधणारा उपाय, जो स्थानिक लार्ज लँग्वेज मॉडेल्स (एलएलएम) आणि सत्यता-तपासणी एपीआय एकत्र करून अद्ययावत विश्वासार्हता प्रदान करतो, तसेच थेट प्रक्षेपणादरम्यान जीपीएस-आधारित एसएमएस पडताळणीद्वारे समुदाय-संचालित  प्रमाणीकरण करतो.
  • बंगळूरूच्या टीम व्हॉर्टेक्स स्क्वॉडने रिअल टाइम मिसइन्फॉर्मेशन डिटेक्शन अँड फॅक्ट चेकिंग सिस्टीमसाठी पुरस्कार पटकावला. हे एआय-आधारित साधन, थेट प्रक्षेपणा दरम्यान चुकीची माहिती शोधण्याचे आणि फ्लॅग करण्याचे आव्हान पेलते, आणि तात्काळ  अचूकता आणि पारदर्शकता प्रदान करते.

या प्रत्येक टीमने थेट प्रसारणादरम्यान माध्यमांची एकात्मता सुधारण्यासाठी आणि चुकीच्या माहितीचा सामना करण्यासाठी नवोन्मेशी दृष्टिकोन प्रदर्शित केला. एआय व्हेरिफिकेशन टूल्सपासून मॅनिपुलेटेड मीडिया डिटेक्शन सिस्टीमपर्यंतचे त्यांचे उपाय आता 1 ते 4 मे 2025 दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्हज परिषदेत सादर केले जातील. माध्यम आणि तंत्रज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात जबाबदार नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेले हे हॅकेथॉन वेव्हज 2025 चा एक भाग असेल.

भारतीय सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स संघटनेचे अध्यक्ष पंकज मोहिंद्रू यांनीही या कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त केले. भारताने गावा गावांतील दंतकथांपासून ते चुकीच्या समजुतींपर्यंत अफवांच्या ताकदीचा अनुभव फार पूर्वीच घेतला असल्याची बाब त्यांनी नमूद केली.  आणि आजच्या डिजिटल युगात, चुकीची माहिती केवळ चालत नाही, तर ती उड्डाणच घेते हे वास्तव त्यांनी मांडले. त्यामुळेच, चुकीच्या माहितीच्या समस्येचा सामना करण्यासाठी डिजिटल जगात प्रवेश करणे आता पूर्वीपेक्षा जास्त महत्त्वाचे झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अभिषेक सिंह यांनीही आपले विचार मांडले.  अशा काळात जिथे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या आधारे कोणाच्याही आवाजाची, प्रतिमेची आणि संपूर्ण व्यक्तिमत्वाची हुबेहुब नक्कल केली जाऊ शकते, अशा काळात सत्य आणि काल्पनिक गोष्टींमधला फरक समजावून घेणे एक मोठे आव्हान बनले असल्याची जाणिव त्यांनी करून दिली. याच पार्श्वभूमीवर ट्रूथटेल हॅकेथॉन हे या समस्येचे निराकरण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे ते म्हणाले. अशा नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्याच्या प्रयत्नांमध्ये सहभागी झाल्याबद्दल त्यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदनही केले.

यावेळी सिंह यांनी या हॅकेथॉनचे आयोजन केल्याबद्दल भारतीय सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स संघटनेचेही अभिनंदन केले. या हॅकेथॉनच्या माध्यमातून आपण डिजीटल भवितव्याचे खरे चलन असलेली विश्वासार्हता  टिकवून ठेवण्याच्या प्रक्रियेत गुंतवणूक करत असल्याची बाब त्यांनी नमूद केली.  या हॅकेथॉनमधले पहिले 5 विजेते चुकीच्या माहितीचा सामना करण्यासाठी सर्वोत्तम उपाययोजना विकसित करतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव संजीव शंकर यांनी देखील उपस्थितांशी संवाद साधला. आजच्या डिजिटल युगातील चुकीच्या माहितीमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्याच्या दृष्टीने ट्रूथटेल हॅकेथॉन हा एक महत्त्वाचा उपक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. क्रिएट इन इंडिया चॅलेंज अंतर्गतच्या 32 आव्हानात्मक स्पर्धांपैकीची एक स्पर्धा म्हणून आयोजित केलेला हा उपक्रम माध्यम आणि मनोरंजन उद्योगावर विपरीत परिणाम करणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या समस्यांपैकी एक समस्या असलेल्या या आव्हानावर उपाययोजना करण्यासाठी जगभरातील नवोदित युवा वर्गाला एकत्र आणणारा उपक्रम असल्याचे ते म्हणाले.चुकीच्या आणि फसव्या माहितीमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो आणि सामान्यांचे जगणेच बाधित करू शकतो, त्यामुळेच प्रत्यक्ष त्या त्या वेळीच अशा खोट्या - फसव्या आशय सामग्रीचा शोध घेऊ शकणारे तांत्रिक उपाय शोधणे आजच्या काळात गरजेचे झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

ऑक्टोबर 2024 मध्ये ट्रूथटेल हॅकेथॉनच्या आयोजनाला सुरुवात झाली होती. या हॅकेथॉनच्या यंदाच्या पर्वात 300 पेक्षा जास्त शहरांमधील विद्यार्थी आणि व्यावसायिक तज्ञांनी 450 पेक्षा जास्त अभिनव कल्पना सादर केल्या आहेत. या हॅकेथॉनमध्ये भाग घेतलेल्यांपैकी 36% प्रमाण महिला सहभागींचे आहे. या हॅकेथॉनच्या निवडप्रक्रियेअंतर्गत राबवलेल्या अनेक फेऱ्यांमध्ये कठोर छाननी आणि मार्गदर्शनानंतर, दिल्लीत होणाऱ्या अंतिम फेरीसाठी अंतिम 25 स्पर्धकांची निवड केली गेली. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या समावेश असलेल्या कोईम्बतूर ते चंदीगड आणि बंगलोर ते भोपाळ पर्यंतच्या स्पर्धकांच्या माध्यमातून भारतातील तरुणाईतील अतुलनीय  ऊर्जेचीच साक्ष मिळते.

ट्रूथटेल हॅकेथॉनच्या आयोजनात केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे तसेच इंडिया एआय मिशन अर्थात भारतीय बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अभियाचे मोठे पाठबळ लाभले आहे. या हॅकेथॉनचे आयोजन हे भारत सरकारच्या, भारतातील युवा वर्गातील नवोन्मेषाच्या आधारे समस्यांवर उपाय योजना विकसित करण्याकरता बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा नैतिकतेने वापर करण्याच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे, आणि यामुळे नागरिकांचा डिजिटल परिसंस्थेवरचा विश्वास वाढण्यालाही मदत होणार आहे.

अधिक माहितीसाठी, https://icea.org.in/truthtell या संकेतस्थळाला भेट द्या.

 

भारतीय सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स संघटनेविषयी

भारतीय सेल्युलर आणि इलेक्ट्रॉनिक्स संघटना ही भारतातील इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान कंपन्यांसोबत काम करणारी  एक प्रमुख उद्योग संघटना आहे. हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर क्षमतांचे सुलभतेने एकात्मिकरण घडवून आणत भारताला तंत्रज्ञान क्षेत्रातली जागतिक महासत्ता बनवणे हेच आमचे ध्येय आहे. आम्ही आमच्या नेतृत्वाअंतर्गत, नवोन्मेषाला आणि उत्कृष्टतेला चालना देणारी बहुआयामी परिसंस्था घडवण्याचा प्रयत्न करत आहोत.

 

* * *

N.Chitale/Rajshree/Tushar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2119913) Visitor Counter : 14