पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या 1996 च्या क्रिकेट संघासोबत साधला संवाद


भारत 'शेजारी प्रथम' या धोरणाप्रति वचनबद्ध: पंतप्रधान

शेजारच्या देशांमधल्या संकटाच्या काळात भारत सर्वात पहिला प्रतिसाद देणारा देश  : पंतप्रधान

Posted On: 06 APR 2025 8:19PM by PIB Mumbai


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल श्रीलंकेत कोलंबो इथे श्रीलंकेच्या 1996 च्या क्रिकेट संघासोबत संवाद साधला. हा एक मनमोकळा अनौपचारिक संवाद होता. या संवादादरम्यान, क्रिकेटपटूंनी पंतप्रधानांना भेटून आनंद आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. पंतप्रधानही या संघाला भेटून आनंद झाल्याची भावना व्यक्त केली. या संघाची प्रभावी कामगिरी भारतीय नागरिकांच्या अद्यापही स्मरणात असल्याचे, विशेषत: कायमस्वरूपी छाप सोडलेला त्यांचा अविस्मरणीय विजय त्यांना अजूनही आठवत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. या संघाची कामगिरी आजही देशात गाजत असल्याचेही पंतप्रधानांनी नमूद केले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2010 मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या एका सामन्याला आपण उपस्थित राहिल्याची आठवण सांगितली. या सामन्यात त्यांनी श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंपैकी एका क्रिकेटपटूला पंच म्हणून काम करताना पाहिले होते असे त्यांनी सांगितले. त्यांनी भारताच्या 1983 च्या विश्वचषक विजयाचा आणि श्रीलंकेच्या संघाने 1996 चा विश्वचषक जिंकल्यानंतरचा परिवर्तनात्मक प्रभावही या गप्पांमध्ये अधोरेखित केला. या ऐतिहासिक विजयांनी क्रिकेट जगताला कशा रितीने नवे रुप मिळवून दिले यावरही पंतप्रधानांनी या गप्पांमध्ये भर दिला. टी 20 क्रिकेटच्या उदयाचा मागोवा घ्यायचा झाला तर आपण 1996 च्या सामन्यांमध्ये श्रीलंकेच्या तत्कालीन क्रिकेट संघाने दाखवलेल्या खेळण्याच्या अभिनव शैलीपर्यंत मागे जायला हवे असे पंतप्रधान म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी इतर खेळाडूंच्या सध्याच्या प्रयत्नांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता व्यक्त केली आणि ते अजूनही क्रिकेट अथवा क्रिकेट प्रशिक्षकाच्या भूमिकेत  आहेत किंवा नाही याबद्दलही विचारपूस केली.

श्रीलंकेत 1996 साली झालेल्या बॉम्बस्फोटानंतर इतर संघांनी माघार घेतलेली असतानाही, भारताने मात्र श्रीलंकेत खेळायचा निर्णय घेतला होता, या घटनेचेही स्मरण पंतप्रधानांनी करून दिले. श्रीलंकेच्या त्या कठीण काळात भारताने दाखवलेल्या या भक्कम  पाठबळाबद्दल श्रीलंकन खेळाडूंनी केलेल्या कौतुकाचाही उल्लेख पंतप्रधानांनी केला. भारताने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीबाबतच्या भावनाही पंतप्रधानांनी बोलून दाखवल्या. श्रीलंकेला हादरवून सोडणाऱ्या 1996 च्या बॉम्बस्फोटांसह, अशा प्रतिकूल परिस्थितीवर भारताने कशी मात केली यावरही पंतप्रधानांनी या गप्पांमध्ये भर दिला. यावेळी पंतप्रधानांनी श्रीलंकेत 2019 साली चर्चमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर, स्वतः श्रीलंकेला दिलेल्या भेटीचीही आठवण करून दिली. त्यावेळी ते श्रीलंकेला भेट देणारे पहिले जागतिक नेते असल्याचेही त्यांनी नमूद केले. भारतीय क्रिकेट संघानेही 2019 मध्ये अत्यल्प कालावधीतच श्रीलंकेचा दौरा केला केल्याच्या घटनेचेही त्यांनी स्मरण केले. 

आनंदाच्या आणि दुःखाच्या अशा दोन्ही प्रसंगांमध्ये श्रीलंकेच्या पाठीशी ठामपणे  उभे राहण्याची भारताची अढळ भावना आणि वचनबद्धताही पंतप्रधानांनी या गप्पांमधून अधोरेखित केली. ही बाब भारताच्या कालातीत मूल्यांना प्रतिबिंबित करणारी असल्याचे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

श्रीलंकेच्या पुरुष क्रिकेट संघाचे विद्यमान प्रशिक्षक  सनथ जयसुर्या यांनी श्रीलंकेच्या अलीकडील आर्थिक संकटाच्या काळात भारताच्या अढळ पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. त्यांनी पुढे पंतप्रधानांना विचारले की, भारत श्रीलंकेमध्ये जाफना येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यासाठी एक क्रिकेट मैदान उभारण्याच्या शक्यतेचा विचार करू शकेल का. या मैदानामुळे होतकरू क्रिकेटपटुंना आणि श्रीलंकेच्या उत्तर-पूर्व भागातील लोकांना मदत होईल, असेही त्यांनी नमुद केले.

पंतप्रधानांनी  जयसुर्या यांची प्रशंसा केली. ते म्हणाले, ``भारत  'शेजारी प्रथम' धोरणाबाबत वचनबद्ध आहे”. त्यांनी शेजारी देशांमध्ये उद्भवलेल्या संकटांना प्रतिसाद देण्यासाठी भारताने तातडीने केलेल्या मदतीचे उदाहरण दिले. म्यानमारमधील अलीकडील भूकंपाच्या काळात प्रतिसाद देणारा पहिला देश म्हणून भारताने कार्य केल्याचे त्यांनी नमुद केले. त्यांनी शेजारी व मैत्रीपूर्ण देशांच्या कल्याणासाठी राष्ट्र म्हणून भारताची जबाबदारी यावेळी अधोरेखित केली.  मोदी यांनी श्रीलंकेच्या आर्थिक संकटाच्या काळात भारताने दिलेल्या सातत्यपूर्ण पाठिंब्याचा उल्लेख केला. ते म्हणाले की, श्रीलंकेला अडचणींवर मात करण्यात मदत करणे हे भारताचे कर्तव्य आहे असे आम्ही मानतो.  त्यांनी अनेक नवीन प्रकल्पांची घोषणा केल्याचे या निमित्त नमूद केले. जाफनाबद्दल  जयसुर्या यांची चिंता रास्त असल्याचे त्यांनी नमुद केले. तिथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. आपले शिष्टमंडळ या सूचनेची नोंद घेईल आणि त्याची व्यवहार्यता तपासेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

पंतप्रधानांनी सर्वांशी पुन्हा संपर्क साधण्याची, जुन्या आठवणींना उजाळा देण्याची आणि परिचित चेहऱ्यांना पाहण्याची संधी मिळाल्याबद्दल या प्रसंगी आभार व्यक्त केले. श्रीलंकेबरोबर भारताच्या दीर्घकालीन संबंधांची पुनः पुष्टी करत श्रीलंकेच्या क्रिकेट समुदायाद्वारे राबविल्या जाणार्‍या कोणत्याही उपक्रमांना पूर्ण समर्थन देण्याचे वचन त्यांनी समारोप करताना दिले.

***

S.Kane/T.Pawar/N.Gaikwad/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2119623) Visitor Counter : 34