पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

महाराष्ट्रात नागपूर येथील माधव नेत्रालय प्रिमियम सेंटरच्या भूमिपूजन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 30 MAR 2025 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 मार्च 2025

 

भारत माता की जय,

भारत माता की जय,

भारत माता की जय,

गुढी पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना अतिशय मनःपूर्वक शुभेच्छा! कार्यक्रमाला उपस्थित असलेले सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी, स्वामी गोविंद गिरी महाराज जी, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज जी, महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रिय मंत्रीमंडळातले माझे सहकारी नितीन गडकरी जी, डॉ. अविनाशचंद्र अग्निहोत्री जी, अन्य मान्यवर आणि इथे उपस्थित असलेल्या सर्व वरीष्ठ सहकाऱ्यांनो, आज या राष्ट्र यज्ञाच्या पवित्र कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य मला लाभले आहे. आजचा चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा दिवसही खास आहे. आजपासून नवरात्र सुरू होत आहे. देशाच्या निरनिराळ्या भागात आज गुढी पाडवा, उगादी आणि नवरेह सण साजरा केला जात आहे. आज भगवान झुलेलाल आणि गुरू अंगद देव यांचा प्रकटदिन देखील आहे.  आमचे प्रेरणास्थान, परमपूज्य डॉक्टरसाहेबांचीही आज जयंती आहे आणि याच वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गौरवशाली परंपरेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. आजच्या दिवशी स्मृती मंदिराला भेट देऊन पूज्य डॉक्टर साहेब आणि गुरुजी यांना आदरांजली अर्पण करता आली, हे मी माझं भाग्य समजतो.

मित्रांनो,

अलिकडेच आपण राज्यघटनेचा अमृत महोत्सव साजरा केला. पुढच्याच महिन्यात घटनाकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीसुद्धा आहे. आज मी दीक्षाभूमीवर जाऊन बाबासाहेबांना नमन करुन त्यांचा आशीर्वाद घेतला. या सर्व महान नेत्यांना अभिवादन करुन मी सर्व देशवासियांना नवरात्र आणि सर्व सणांच्या शुभेच्छा देतो.

मित्रांनो,

संघ सेवेचं पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या नागपूरच्या या भूमीत आज एका पवित्र कार्याच्या विस्ताराचा संकल्प केला जात आहे आणि आपण सगळे यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होत आहोत. आत्ताच आपण माधव नेत्रालयाच्या प्रार्थनेमध्ये ऐकलं की; अध्यात्म, ज्ञान, अभिमान आणि श्रेष्ठता यांचं हे अनोखं विद्यालय, निरंतर मानव सेवेत मग्न असलेलं मंदीर असून याच्या कणा-कणामध्ये राऊळाची महानता सामावली आहे.  माधव नेत्रालय ही संस्था गेली कित्येक दशकं पूज्य गुरुजींच्या आदर्श विचारसरणीनुसार लाखो लोकांची सेवा करत आहे. या संस्थेमुळे लोकांचं आयुष्य पुन्हा प्रकाशानं उजळून निघालं आहे. आज या संस्थेच्या नव्या इमारतीचं भूमीपूजन झालं आहे. आता या नव्या इमारतीमुळे इथल्या सेवा कार्याला आणखी गती मिळेल. यामुळे हजारो नवीन माणसांच्या आयुष्यात प्रकाश पसरेल आणि त्यांच्या जीवनातला अंधकार दूर होईल. माधव नेत्रालयाच्या संबंधित सर्व व्यक्तींचा हा समाजकार्याप्रतीचा सेवाभाव नक्कीच प्रशंसनीय आहे. या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!

मित्रांनो,

लाल किल्ल्यावरुन मी एकत्रित प्रयत्नांविषयी बोललो होतो. आरोग्य क्षेत्रासाठी आज देशात जे काम केलं जात आहे; ते आणखी पुढे घेऊन जाण्याचं काम माधव नेत्रालय करत आहे. देशातल्या सगळ्या नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात याला आमचं प्राधान्य आहे. देशातल्या अतिशय गरीब व्यक्तीलाही चांगल्यात चांगले उपचार मिळाले पाहिजेत, चांगलं जीवन जगण्यापासून कोणीही वंचित राहता कामा नये, आपलं आयुष्य देशाप्रती समर्पित केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना उपचार करुन घेण्याची चिंता नसावी, या चिंतेत त्यांना जगावं लागू नये या विचारांनुसारच सरकार धोरणं आखत आहे. म्हणूनच आयुष्मान भारत योजनेद्वारे करोडो लोकांना मोफत उपचार सुविधा दिली जात आहे. हजारो जनौषधी केंद्रांमधून देशातल्या गरीब, मध्यम वर्गीय नागरिकांना स्वस्त औषधं मिळत आहेत. सध्या देशात साधारण हजारभर डायलिसिस केंद्रांमधून मोफत डायलिसिस सुविधा दिली जात आहे, यामुळे देशवासियांच्या हजारो कोटी रुपयांची बचत होत आहे, त्यांचे आरोग्य सुधारत आहे. गेल्या 10 वर्षात गावागावांमध्ये लाखो आयुष्मान आरोग्य केंद्रं स्थापन करण्यात आली, या केंद्रांमधून टेलिमेडिसीन सुविधेद्वारे लोकांना देशातल्या सर्वात उत्तम डॉक्टरांचा सल्ला मिळत असून प्राथमिक उपचार मिळाल्यामुळे पुढचे उपचार सोपे झाले आहेत. आता त्यांना आजाराच्या तपासणीसाठी शेकडो किलोमीटर लांब असलेल्या शहरांत जावं लागत नाही.

मित्रांनो,

आम्ही देशातल्या वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पट करण्याबरोबरच, कार्यरत असलेल्या एम्स संस्थांची संख्यादेखील तिपटीनं वाढवली आहे. वैद्यकीय शिक्षणासाठीची प्रवेश संख्येची मर्यादाही दुप्पट झाली आहे. आगामी काळात लोकांच्या सेवेसाठी जास्तीत जास्त चांगले डॉक्टर्स उपलब्ध असावेत, असाच आमचा प्रयत्न आहे. स्वातंत्र्यांनंतर पहिल्यांदाच आम्ही एक ऐतिहासिक निर्णय घेतला. या देशातल्या गरीबांच्या मुलांनाही डॉक्टर होता यावं, त्यांची स्वप्नं पूर्ण व्हावीत यासाठी वैद्यकीय शिक्षणदेखील मातृभाषेतून घेता यावं अशी सुविधा आम्ही निर्माण केली आहे. आधुनिक वैद्यकशास्त्रातील या प्रयत्नांसह देशातल्या पारंपरिक वैद्यकीय ज्ञानालाही प्रोत्साहन दिलं जात आहे. आपल्या योग आणि आयुर्वेद शास्त्राला आज संपूर्ण जगात एक वेगळी ओळख प्राप्त झाली असून भारताचा मानसन्मानही वाढत आहे.  

मित्रांनो,

कोणत्याही देशाचं अस्तित्व तिथं पिढ्यान पिढ्या झालेला संस्कृतीचा विस्तार, राष्ट्र भावनेचा विस्तार यावर अवलंबून असतं. आपल्या देशाच्या इतिहासावर दृष्टीक्षेप टाकला तर हे लक्षात येतं की; शेकडो वर्षांचं पारतंत्र्य, इतकी आक्रमणं, भारताच्या सामाजिक रचनेला संपवण्याचे इतके क्रूर प्रयत्न झाल्यानंतरही भारतातली राष्ट्र भावना कधीच नष्ट झाली नाही, या राष्ट्रभावनेची ज्योत नेहमीच प्रज्वलित राहिली. हे कसं घडलं? अत्यंत कठीण काळातही या राष्ट्र भावनेला जागृत ठेवण्याचं काम तत्कालिन सामाजिक आंदोलनांनी केलं. भक्ती आंदोलन हे त्याचं एक उदाहरण आहे; जे आपल्या सर्वांच्या चांगल्याच परिचयाचं आहे.

मध्यकाळातील त्या कठीण कालावधीत आपल्या संतांनी भक्तीच्या विचारांतून आपल्या राष्ट्रीय भावनेला नवी उर्जा दिली. गुरु नानकदेव, कबीरदास, तुलसीदास, सूरदास तसेच आपल्या महाराष्ट्रातील संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर अशा कितीतरी संतांनी त्यांच्या मौलिक विचारांनी आपल्या या राष्ट्रीय भावनेत नवे प्राण फुंकले. या आंदोलनांनी भेदभावाच्या बेड्या तोडून समाजाला एकतेच्या धाग्याने जोडले.

त्याच पद्धतीने, स्वामी विवेकानंदांसारखे महंत संत देखील होऊन गेले.निराशेच्या गर्तेत बुडालेल्या समाजाला त्यांनी खडबडून जागे केले, समाजाच्या खऱ्या स्वरुपाची आठवण करून दिली, लोकांमध्ये आत्मविश्वास जागवला आणि आपली राष्ट्रीय भावना विझू दिली नाही. पारतंत्र्याच्या शेवटच्या काही दशकांमध्ये डॉक्टर साहेब आणि गुरुजींसारख्या महान व्यक्तिमत्त्वांनी या राष्ट्रीय चेतनेला नवी उर्जा देण्याचे काम केले. आज आपल्याला दिसत आहे की राष्ट्र भावनेचे संरक्षण आणि संवर्धनासाठी विचारांचे जे बीज 100 वर्षांपूर्वी पेरण्यात आले, त्याचा आज मोठा वटवृक्ष झालेला जगाला दिसत आहे. तत्वे आणि आदर्शवादी विचार या वटवृक्षाला उंची देत आहेत, लाखो-कोट्यवधी स्वयंसेवक या वृक्षाच्या फांद्या आहेत. हा एखादा सामान्य वटवृक्ष नव्हे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेभारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षयवट आहे. हा अक्षयवट आज भारतीय संस्कृतीला, आपल्या राष्ट्रीय भावनेला अखंडितपणे उर्जा देत आहे.

आज जेव्हा आपण माधव नेत्रालयाच्या नव्या परिसराचे काम सुरु करत आहोत तेव्हा दृष्टीचा विषय निघणे स्वाभाविकच आहे. आपल्या जीवनात दृष्टीच आपल्याला दिशा दाखवत असते. म्हणूनच वेदांमध्ये देखील अशी इच्छा प्रकट करण्यात आली आहे- पश्येम शरदः शतम्! म्हणजेच आपली दृष्टी शंभर वर्षांपर्यंत शाबूत राहो. ही दृष्टी आपल्या डोळ्यांची म्हणजेच बाह्यदृष्टी असावी आणि अंतर्दृष्टी सुद्धा असावी. जेव्हा आपण अंतर्दृष्टीचा विषय काढतो तेव्हा विदर्भातील महान संत श्री गुलाबराव महाराजजी यांची आठवण येणे स्वाभाविक आहे. त्यांना प्रज्ञाचक्षु म्हटले जायचे. अत्यंत कमी वयातच त्यांना डोळ्यांनी दिसणे अशक्य झाले. पण तरीही त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. आता कोणी असेही विचारेल की जर त्यांना डोळ्यांनी दिसत नव्हते तर असे असताना कोणी ग्रंथांचे लिखाण कसे करू शकेल? तर याचे उत्तर असे आहे की, भले त्यांच्याकडे बघण्यासाठी डोळे नव्हते पण दृष्टी होती. ही दृष्टी आकलनातून प्राप्त होते आणि विवेकातून व्यक्त होते. अशी दृष्टी त्या व्यक्तीसोबत समाजाला देखील मोठी ताकद देते. आपला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देखील असाच एक संस्कार यज्ञ आहे जो अंतर्दृष्टी आणि बाह्यदृष्टी अशा दोन्हीसाठी काम करत आहे. बाह्यदृष्टीच्या रुपात आपण माधव नेत्रालय उभारतो आहोत आणि अंतर्दृष्टीने संघाला सेवेचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

मित्रांनो,

आपल्याकडे परोपकाराय फलन्ति वृक्षाः, परोपकाराय वहन्ति नद्यः। परोपकाराय दुहन्ति गावः, परोपकारार्थ-मिदं शरीरम्। असे एक वचन आहे. आपले शरीर परोपकारासाठीच आहे, सेवा करण्यासाठीच आहे. आणि जेव्हा हा सेवाभाव संस्कारांमध्ये झिरपतो तेव्हा सेवा ही एक साधना बनते. ही साधना प्रत्येक स्वयंसेवकाच्या जीवनाचा प्राणवायू असते. सेवेचा हा संस्कार, ही साधना, हा प्राणवायू पिढ्यानपिढ्या प्रत्येक स्वयंसेवकाला तप-तपस्येसाठी प्रेरित करत आहे. ही सेवा-साधना प्रत्येक स्वयंसेवकाला सतत कार्यरत ठेवते, त्याला थकू देत नाही, त्याला थांबू देत नाही. पूजनीय गुरुजी नेहमी म्हणत की जीवनाचा कालावधी महत्त्वाचा नाही तर त्या जीवनाचा उपयोग किती झाला हे महत्त्वाचे आहे. आपण देवाकडून देश आणि रामापासून राष्ट्राचा जीवनमंत्र घेऊन निघालो आहोत, आपले कर्तव्य पार पाडत आहोत. आणि म्हणूनच आपण बघतो की, लहान-मोठे कोणतेही कार्य असो, कोणतेही कार्यक्षेत्र असो, सीमावर्ती गाव असो, पर्वतांचा प्रदेश असो किंवा जंगली भाग असो, संघाचे स्वयंसेवक निःस्वार्थ भावनेने कार्य करतात. एखादा स्वयंसेवक वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याला स्वतःचे ध्येय मानून झटून काम करतो आहे तर दुसरा एखादा एकशिक्षकी शाळेच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना शिकवत आहे, अजून एकजण संस्कृती जागरणाच्या अभियानात काम करत आहे तर एकजण सेवा भारतीमध्ये सहभागी होऊन गरिबांची-वंचितांची सेवा करतो आहे.

नुकतेच महाकुंभाच्या वेळी तेथील नेत्रकुंभात स्वयंसेवकांनी कशा पद्धतीने लाखो लोकांची मदत केली हे आपण बघितले आहे, म्हणजेच जेथे सेवा कार्य तेथे स्वयंसेवक. जिथे जिथे एखादे संकट कोसळलेले असेल, पुरामुळे झालेली वाताहत असो किंवा भूकंपाने माजवलेला हाहाकार असो, स्वयंसेवक एखाद्या शिस्तबद्ध सैनिकाप्रमाणे त्वरेने घटनास्थळी पोहोचतात. या स्वयंसेवकांपैकी कोणीच स्वतःची अडचण सांगत नाही, स्वतःचा त्रास बोलून दाखवत नाही, फक्त संपूर्ण सेवाभावाने कामात गढून जातात. कारण या सगळ्यांच्या हृदयात सेवेचे यज्ञकुंड धगधगते आहे, आपण समिधेसारखे त्यात समर्पित होऊन अग्नीत जळून जावे, ध्येयाच्या सागरात एखाद्या नदीप्रमाणे सामावून जावे.

मित्रांनो,

एकदा एका मुलाखतीत परमपूज्य गुरुजींना विचारण्यात आले की ते संघाला सर्वव्यापी का म्हणतात? यावर गुरुजींनी दिलेले उत्तर अत्यंत प्रेरणादायक होते. त्यांनी संघाची तुलना प्रकाशाशी, उजेडाशी केली होती. ते म्हणाले की प्रकाश स्वतः सर्वव्यापी असतो, तो स्वतःच सगळे काम करू शकत नसला तरीही अंधाराला दूर करून तो दुसऱ्यांना काम करण्याचा मार्ग दाखवतो. गुरुजींची ही शिकवण आपल्यासाठी एक जीवनमंत्र आहे. आपल्याला प्रकाश होऊन अंधार दूर लोटायचा आहे, अडचणी सोडवायच्या आहेत, नवे मार्ग तयार करायचे आहेत. हीच भावना आपण आयुष्यभर जागवत राहू, प्रत्येक जण कमी-अधिक प्रमाणात अशाच पद्धतीने जगण्याचा प्रयत्न करत राहो. मी नव्हे तर तू, अहम नव्हे तर वयम, “इदं राष्ट्राय इदं न मम्”। ही भावना आत्मसात करत राहू.

मित्रांनो,

कोणताही प्रयत्न करताना, मनात जेव्हा ‘माझ्यासाठी’ नव्हे, तर ‘आपल्यासाठी’ हा विचार असतो, जेव्हा राष्ट्र सर्वप्रथम ही भावना सर्वोच्च स्थानी असते, जेव्हा धोरणे आणि निर्णयांमध्ये, देशातील जनतेचे हित सर्वात मोठे असते, तेव्हा त्याचा प्रभाव आणि प्रकाश सर्वत्र दिसून येतो. विकसित भारतासाठी देश ज्या बंधनात अडकला होता, तो तोडणे सर्वात महत्त्वाचे आहे. गुलामगिरीची मानसिकता सोडून भारत कशा प्रकारे पुढे जात आहे, हे आज आपण पाहत आहोत. 70 वर्षे गुलामगिरीची जी प्रतिके वाहून नेली गेली, त्या ऐवजी आता राष्ट्रीय अभिमानाचे नवे अध्याय लहिले जात आहेत. ते इंग्रजी कायदे, जे भारताच्या जनतेचा अवमान करण्यासाठी बनवले गेले, ते देशाने बदलले आहेत. गुलामगिरीच्या विचाराने बनवलेल्या दंडसंहितेची जागा आता भारतीय न्याय संहितेने घेतली आहे. आपल्या लोकशाहीच्या अंगणात आता राजपथ नाही, तर कर्तव्यपथ आहे. आपल्या नौदलाच्या झेंड्यावरही गुलामगिरीचे चिन्ह छापले होते, त्याऐवजी आता नौदलाच्या झेंड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे चिन्ह फडकत आहे. ज्या अंदमान बेटांवर वीर सावरकरांनी देशासाठी दु:ख सोसले, जिथे नेताजी सुभाषबाबूंनी स्वातंत्र्याचे बिगुल वाजवले, त्या बेटांची नावेही आता स्वातंत्र्य सेनानींच्या स्मरणार्थ ठेवली गेली आहेत.

मित्रांनो,

'वसुधैव कुटुंबकम' हा आपला मंत्र आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत आहे. आणि जग आपल्या कृतीतूनही ते पाहत आणि अनुभवत आहे. जेव्हा कोविड सारखा साथरोग येतो, तेव्हा भारत जगाला एक कुटुंब मानतो आणि लस पुरवतो. जगात कुठेही नैसर्गिक आपत्ती आली तरी भारत मनापासून सेवेसाठी उभा राहतो. कालच आपण पाहिले की, म्यानमारमध्ये केवढा मोठा भूकंप झाला, तेथील लोकांच्या मदतीसाठी भारत ऑपरेशन ब्रह्मा अंतर्गत सर्वप्रथम पोहोचला आहे.

तुर्कस्तानमध्ये भूकंप झाला, नेपाळमध्ये भूकंप झाला, मालदीवमध्ये पाण्याचे संकट आले, तेव्हा भारताने मदतीसाठी क्षणभरही विलंब लावला नाही. युद्धजन्य परिस्थितीत आपण दुसऱ्या देशांमधून आपल्या नागरिकांनाही सुरक्षितपणे परत आणतो. आज जग पाहत आहे, भारत आज प्रगती करत आहे, तेव्हा संपूर्ण ग्लोबल साउथचा आवाजही बनला आहे. विश्वबंधुत्वाची ही भावना आपल्या संस्कारांचाच विस्तार आहे.

मित्रांनो,

आज भारताची सर्वात मोठी संपत्ती आपली तरुणाई आहे. आणि आज भारतातील तरुणांमध्ये किती आत्मविश्वास आहे, हे आपण पाहू शकतो. त्याची जोखीम घेण्याची क्षमता पूर्वीच्या तुलनेत अनेक पटींनी वाढली आहे. तो नवनवीन प्रयत्न करत आहे, स्टार्ट अपच्या दुनियेत आपला झेंडा फडकवत आहेत आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजच्या भारतातील तरुण आपल्या वारशाचा अभिमान बाळगून, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगून पुढे जात आहे. नुकतंच आपण प्रयागराज येथील महाकुंभ मध्ये पहिले, आजची युवा पिढी लाखो-करोडोंच्या संख्येने महाकुंभ मध्ये पोहोचली आणि या सनातन परंपरेत मोठ्या अभिमानाने सहभागी झाली. आज भारतातील तरुणाई देशाच्या गरजा लक्षात घेऊन काम करत आहे. भारतातील तरुणांनी मेक इन इंडिया यशस्वी केले आहे, भारतातील तरुण लोकलसाठी व्होकल झाले आहेत. एक उत्कटता आहे, देशासाठी जगायचे आहे, देशासाठी काहीतरी करायचे आहे, खेळाच्या मैदानापासून अंतराळाच्या उंचीपर्यंत राष्ट्रउभारणीच्या भावनेने ओतप्रोत भरलेले आपले तरुण पुढे जात आहेत. हेच  तरुण  स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होत असताना 2047 पर्यंत विकसित भारताच्या ध्येयाचा झेंडा हातात घेऊन पुढे जातील आणि संघटन, समर्पण आणि सेवेची ही त्रिसूत्री विकसित भारताच्या प्रवासाला निरंतर ऊर्जा आणि दिशा देत राहील, असा मला विश्वास आहे. संघाच्या एवढ्या वर्षांच्या मेहनतीला फळ मिळत आहे, संघाची इतक्या वर्षांची तपस्या विकसित भारताचा नवा अध्याय लिहित आहे.

मित्रांनो,

संघाची स्थापना झाली तेव्हा भारताची परीस्थित वेगळी होती, आणि इतर परिस्थितीही वेगळी होती. 1925 ते 1947 हा संघर्षाचा काळ होता. देशासमोर स्वातंत्र्याचे मोठे उद्दिष्ट होते. आज संघाच्या 100 वर्षांच्या प्रवासानंतर देश पुन्हा एका निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. 2025 ते 2047 या महत्त्वाच्या काळात पुन्हा एकदा मोठी उद्दिष्टे आपल्यासमोर आहेत. पूज्य गुरुजींनी एकदा एका पत्रात लिहिले होते की, मला आपल्या भव्य राष्ट्प्रसादाच्या पायाचा एक छोटासा दगड बनायचे आहे, आपल्याला आपला सेवेचा संकल्प सदैव तेवत ठेवावा लागेल. आपल्याला सतत मेहनत घ्यायची आहे. आपल्याला विकसित भारताचे स्वप्न साकार करायचे आहे आणि अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या पुनर्बांधणीबाबत मी म्हटले होते, त्याप्रमाणे आपल्याला पुढील एक हजार वर्षे सशक्त भारताचा पायाही रचायचा आहे. पूज्य डॉक्टर साहेब, पूज्य गुरुजी यांचे मार्गदर्शन आपल्याला सतत बळ देईल, असा मला विश्वास आहे. विकसित भारताचा संकल्प आपण पूर्ण करू, आपल्या मागील पिढ्यांचे बलिदान आपण सार्थकी लावू. हा संकल्प घेऊन मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद!  

 

* * *

S.Tupe/Surekha/Sanjana/Rajshree/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2117000) Visitor Counter : 25