निती आयोग
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते 1 एप्रिल, 2025 रोजी NITI NCAER States Economic Forum या पोर्टलचं लोकार्पण होणार
Posted On:
31 MAR 2025 1:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 मार्च 2025
निती आयोगानं, राष्ट्रीय उपयोजित आर्थिक संशोधन परिषदेच्या (National Council of Applied Economic Research - NCAER) सहकार्यानं सामाजिक, आर्थिक आणि वित्तीय मापदंड, संशोधन अहवाल, शोधनिबंध आणि सुमारे 30 वर्षांच्या (म्हणजे 1990-91 ते 2022-23) कालावधीसाठी राज्य वित्तविषयक तज्ञांच्या टिप्पण्यांच्या माहिती साठ्याचा एक व्यापक संग्रह असलेले पोर्टल विकसित केले आहे. NITI NCAER States Economic Forum असं या पोर्टलचं शिर्षक आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते 1 एप्रिल, 2025 रोजी नवी दिल्लीत या पोर्टलचं लोकार्पण होईल.
हे पोर्टल चार मुख्य घटकांमध्ये विभागले गेले आहे. त्याबद्दलचा तपशील खाली दिला आहे:
- राज्य अहवाल - याअंतर्गत भारताच्या 28 राज्यांचा लोकसंख्याशास्त्र, आर्थिक रचना, सामाजिक-आर्थिक आणि वित्तीय निर्देशकांच्या आधारे संरचित केलेला माहितीसाठा स्थूल आणि वित्तीय परिस्थितीचा सारांश स्वरुपात उपलब्ध असेल.
- माहितीसाठा भांडार - यात लोकसंख्याशास्त्र; आर्थिक रचना; वित्तीय; आरोग्य आणि शिक्षण या आणि अशा पाच विभागांमध्ये वर्गीकृत केलेला संपूर्ण माहितीसाठा थेट आणि सुलभतेने उपलब्ध असेल.
- राज्य वित्तीय आणि आर्थिक डॅशबोर्ड - यात कालपरत्वानुसार आर्थिक घडामोडींच्या कारक घटकांची माहिती आलेखीय स्वरुपात मांडलेली असेल. यासोबतच माहितीसाठा्या विषयक परिशिष्टाद्वारे तसेच अतिरिक्त माहितीशी संबंधित सारांशाच्या सारणीच्या माध्यमातून कच्च्या स्वरुपातील माहितीसाठा उपलब्ध असेल.
- संशोधन आणि टिप्पण्या - याअंतर्गतचा माहितीसाठा हा राज्य वित्त आणि राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावरील वित्तीय धोरण आणि वित्तीय व्यवस्थापनाशी संबंधित महत्त्वाच्या पैलूंवरील विस्तृत संशोधनावर आधारित आहे.
या पोर्टलच्या माध्यमातून वापरकर्त्यांना स्थूल, वित्तीय, लोकसंख्याशास्त्रीय आणि सामाजिक-आर्थिक कलांबद्दलची माहिती सुलभतेने उपलब्ध होईल. अशा तर्हेने सहज उपलब्ध असलेला माहितीसाठ्यासह या पोर्टलची संरचना देखील वापरकर्त्यांसाठी अनुकूल स्वरूपाची आहे. यामुळे एकाच ठिकाणी एकत्रित क्षेत्रीय माहितीसाठा उपलब्ध असण्याची विद्यमान गरजही यामुळे पूर्ण होईल. हे पोर्टल इतर राज्यांच्या आणि राष्ट्रीय आकडेवारीचे, प्रत्येक राज्याच्या माहितीसाठ्याचे तुलनात्मक विश्लेषण करण्यात मदतीचे ठरेल. हे पोर्टल धोरणकर्ते, संशोधक आणि माहिती आधारित वादविवाद तसेच चर्चांसाठी माहितीसाठा्याचा संदर्भ घेण्यात स्वारस्य असलेल्या इतरांसाठीही उपयुक्त मंच म्हणून कामी येईल.
या पोर्टलच्या माध्यमातून सखोल संशोधन विषयक अभ्यासांसाठी माहितीसाठा आणि विश्लेषणात्मक साधनांचा मोठे भांडार उपलब्ध होणार असल्याने, एका अर्थाने हे पोर्टल एक व्यापक संशोधन केंद्र म्हणून काम करेल. थोडक्यात या पोर्टलच्या माध्यमातून मागील 30 वर्षांतील सामाजिक, आर्थिक आणि वित्तीय निर्देशकांचा विस्तृत माहितीसाठा सुलभतेने उपलब्ध होणार आहे, त्यामुळे हे पोर्टल माहितीचे मध्यवर्ती भांडार म्हणून काम करेल. या पोर्टलवरील उपलब्ध माहितीसाठ्याच्या आधारे ऐतिहासिक कल आणि प्रत्यक्ष त्या त्या वेळचे विश्लेषण करता येईल, आणि त्याचा उपयोग करून, वापरकर्ते प्रगतीचा मागोवा घेऊ शकतील, उदयोन्मुख घटक निश्चित करू शकतील आणि विकासासाठी पुरावा-आधारित धोरणे तयार करू शकतील.
* * *
S.Tupe/T.Pawar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2116989)
Visitor Counter : 56