पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील नागपूर येथे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची केली पायाभरणी


देशातील सर्व नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात याला आमचे प्राधान्य : पंतप्रधान

भारतात अत्यंत कठीण परिस्थितीतही चेतना जागृत ठेवण्यासाठी नवीन सामाजिक चळवळी होत राहिल्या: पंतप्रधान

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षयवट आहे, हा अक्षयवट भारतीय संस्कृती आणि आपल्या राष्ट्र भावनेला सतत ऊर्जा देत आहे: पंतप्रधान

जेव्हा राष्ट्र विकासासाठी केले जाणारे प्रयत्न ‘मी’ वर नाही तर आपण या संकल्पनेवर केंद्रित असतात, जेव्हा राष्ट्र प्रथम ही भावना सर्वोच्च असते, जेव्हा देशातील धोरणे आणि निर्णयांमध्ये लोकांचे हित हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो, तेव्हाच त्याचा परिणाम सर्वत्र दिसून येतो : पंतप्रधान

जगात जिथे जिथे नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी भारत मनापासून मानव सेवेसाठी तत्पर उभा असतो : पंतप्रधान

राष्ट्र उभारणीच्या भावनेने ओतप्रोत भरलेले आपले तरुण 2047 पर्यंत विकसित भारत साध्य करण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहेत: पंतप्रधान

Posted On: 30 MAR 2025 2:09PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील नागपूर येथे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी केली. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पवित्र नवरात्रोत्सवाचा प्रारंभ म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेचे महत्त्व अधोरेखित केले. देशभरात आज गुढी पाडवा, उगादी आणि नवरेह असे सण साजरे केले जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याच दिवसाला जोडून येणाऱ्या भगवान झुलेलाल आणि गुरु अंगद देव यांच्या जयंतीचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. हा दिवस प्रेरणादायी डॉ. के. बी. हेडगेवार यांची जयंती तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) गौरवशाली प्रवासाच्या शताब्दी वर्षाची आठवण करून देणारा असल्याचेही त्यांनी सांगितले. आजच्या महत्त्वपूर्ण दिवशी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींना आदरांजली वाहण्यासाठी स्मृती मंदिराला भेट देणे हा आपल्यासाठी सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.

याच दरम्यान भारतीय संविधानाच्या 75 व्या वर्षाच्या उत्सवाचे आणि पुढील महिन्यात राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दीक्षाभूमी येथे डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहण्याचे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. देशात सर्वत्र साजऱ्या होत असलेल्या नवरात्रोत्सव आणि इतर सर्व सणानिमित्त पंतप्रधानांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

नागपूर शहराचे ‘सेवेचे पवित्र केंद्र’ म्हणून असणारे महत्त्व अधोरेखित करून आणि एका उदात्त उपक्रमाच्या विस्ताराची वाखाणणी करत पंतप्रधानांनी माधव नेत्रालयाच्या प्रेरणादायी गीतावर भाष्य केले. हे गीत अध्यात्म, ज्ञान, अभिमान आणि मानवता प्रतिबिंबित करत असल्याचे त्यांनी सांगितले. माधव नेत्रालय ही एक अशी संस्था आहे जी कैक दशकांपासून पूज्य गुरुजींच्या आदर्शांचे अनुसरण करत लाखो लोकांची सेवा करत आहे आणि असंख्य जीवनांना पुन्हा प्रकाशित करत आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी माधव नेत्रालयाच्या नवीन प्रांगणाच्या पायाभरणीचा उल्लेख करत हा विस्तार संस्थेच्या सेवा कार्यांना गती देईल, हजारो नवीन जीवनांना उजळून टाकेल आणि त्यांच्या जीवनातील अंधार दूर करेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी माधव नेत्रालयाशी संबंधित प्रत्येकाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि त्यांच्या निरंतर सेवेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

लाल किल्ल्यावरून बोलताना आपण 'सब का प्रयास' वर भर दिला होता याची आठवण करून देत तसेच आरोग्यसेवा क्षेत्रात देशाने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर प्रकाश टाकत, माधव नेत्रालय या प्रयत्नांना पूरक आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. "सर्व नागरिकांसाठी चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील आणि गरीबांनाही सर्वोत्तम उपचार मिळावेत हे सुनिश्चित करणे, याला सरकार प्राधान्य देत आहे", असे त्यांनी नमूद केले. कोणताही नागरिक जीवनाच्या प्रतिष्ठेपासून वंचित राहता कामा नये तसेच देशासाठी आपले जीवन समर्पित केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय उपचारांची चिंता नसावी यावर त्यांनी भर दिला. लाखो लोकांना मोफत उपचार देणाऱ्या आयुष्मान भारत योजनेच्या परिणामांवर त्यांनी प्रकाश टाकला. देशभरातील हजारो जनऔषधी केंद्रांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. जनऔषधी केंद्रामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या दरात औषधे मिळत असल्याने नागरिकांच्या हजारो कोटी रुपयांची बचत होत आहे, असेही ते म्हणाले. गेल्या दशकात अनेक गावांमध्ये लाखो आयुष्मान आरोग्य मंदिरांची स्थापना झाल्याने लोकांना टेलिमेडिसिनद्वारे प्राथमिक आरोग्य सेवा मिळत आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला. या सुविधांमुळे नागरिकांना वैद्यकीय चाचण्यांसाठी शेकडो किलोमीटर प्रवास करण्याची गरज राहिली नाही, यावर त्यांनी भर दिला.

देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पटीने तर देशात कार्यरत एम्स संस्थांची संख्या तिप्पटीने वाढवली असल्याचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, भविष्यात देशवासीयांना आरोग्य सेवा देण्यासाठी अधिक कुशल डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील जागांची संख्या देखील दुप्पट करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला. आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीबरोबरच, देश आपल्या पारंपारिक ज्ञानाचाही प्रचार करत आहे असे त्यांनी सांगितले. भारताच्या योग आणि आयुर्वेदाला जागतिक स्तरावर मिळत असलेल्या मान्यतेबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे जागतिक स्तरावर देशाची प्रतिष्ठा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही राष्ट्राचे अस्तित्व त्याची संस्कृती आणि चेतनेच्या पिढ्यान् पिढ्या होणाऱ्या विस्तारावर अवलंबून असते, असे सांगत, भारताच्या सामाजिक संरचना नष्ट करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ती भारताची शतकानुशतकांची गुलामगिरी आणि झालेली आक्रमणे यांच्या इतिहासाला पंतप्रधानांनी अधोरेखित केले. तरीही भारताची राष्ट्रीय चेतना जागृत आणि या संकटांना तोंड देत राहिली,असे त्यांनी नमूद केले. "सर्वात कठीण काळातही भारतातील नव्या सामाजिक चळवळींनी ही चेतना जागृत ठेवली," असे त्यांनी सांगितले. त्यांनी भक्ती चळवळीचे उदाहरण दिले, जिथे गुरु नानक देव, कबीरदास, तुलसीदास, सूरदास तसेच महाराष्ट्रातील संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या मौलिक विचारांद्वारे भारताच्या राष्ट्रीय चेतनेला नवजीवन दिले. या चळवळींनी भेदभावाच्या बेड्या तोडून समाजाला एकसंध केले, असे त्यांनी नमूद केले. स्वामी विवेकानंदांनी एका निराश समाजाला जागे करून त्याला त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली, आत्मविश्वास निर्माण केला आणि भारताची राष्ट्रीय चेतना टिकून राहील, हे सुनिश्चित केले. पंतप्रधानांनी डॉ. हेडगेवार आणि गुरुजी यांच्या योगदानाचाही उल्लेख केला, ज्यांनी वसाहतवादी राजवटीच्या शेवटच्या दशकांत ही चेतना जागृत केली. 100 वर्षांपूर्वी राष्ट्रीय चेतनेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी रोवलेले विचारांचे बीज आज एका विशाल वृक्षाच्या रूपात वाढले आहे, असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, या महान वृक्षाला त्याची तत्त्वे आणि आदर्श उंची देतात, तर लाखो स्वयंसेवक ह्या त्याच्या शाखा आहेत. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षयवट आहे, जो भारतीय संस्कृती आणि राष्ट्राच्या चेतनेला सातत्याने ऊर्जा देत आहे," असे त्यांनी सांगितले.

माधव नेत्रालयाच्या नव्या परिसराच्या उद्घाटनप्रसंगी, पंतप्रधानांनी "दृष्टी आणि दिशा" यांच्यातील नैसर्गिक संबंध स्पष्ट केला. जीवनातील दृष्टीच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला आणि वेदातील "पश्येम शरदः शतम्" हा मंत्र उद्धृत केला, ज्याचा अर्थ आहे, "आपण शंभर शरद ऋतू पाहो." त्यांनी बाह्य दृष्टीबरोबरच अंतःदृष्टीचेही महत्त्व सांगितले. विदर्भातील महान संत प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराज यांचा उल्लेख करताना ते म्हणाले, "लहानपणी दृष्टी गमावल्यानंतरही, त्यांनी असंख्य ग्रंथ लिहिले."

पंतप्रधानांनी सांगितले की, जरी त्यांच्याकडे बाह्य दृष्टी नव्हती, तरी त्यांच्याकडे असाधारण अंतःदृष्टी होती, जी ज्ञानातून प्रकट होते आणि विवेकाने परिपूर्ण होते. अशा प्रकारची दृष्टी व्यक्ती आणि समाज दोघांनाही सक्षम बनवते, असे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बाह्य आणि अंतःदृष्टी या दोन्ही दृष्टींवर कार्य करणारी एक पवित्र चळवळ आहे, असे त्यांनी सांगितले. माधव नेत्रालय हे बाह्य दृष्टीचे उदाहरण असून, अंतःदृष्टीमुळे संघ सेवा परंपरेचे प्रतीक बनले आहे.

जीवनाचा खरा हेतू सेवा आणि परोपकार असतो, यावर त्यांनी वेदवचनांचा आधार घेत भर दिला. "जेव्हा सेवा आपल्या मूल्यांचा अविभाज्य भाग बनते, तेव्हा ती भक्तीचे रूप धारण करते," असे ते म्हणाले. स्वयंसेवकांचे जीवन याच सेवाभावाने प्रेरित असून, त्यांच्यात ही भावना पिढ्यान पिढ्या जिवंत राहते. हा सेवाभाव स्वयंसेवकांना कधीही थकू देत नाही, थांबू देत नाही.

गुरुजींच्या विचारांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, "जीवनाचे मोल त्याच्या कालावधीमध्ये नाही, तर उपयुक्ततेत आहे." त्यांनी "देव ते देश" आणि "राम ते राष्ट्र" या तत्त्वांनुसार कार्य करण्यावर भर दिला. सरहद्दीवरील गावे, डोंगराळ भाग, वनक्षेत्रे या ठिकाणी स्वयंसेवकांची सेवा आणि त्यांचे योगदान त्यांनी अधोरेखित केले.

ते म्हणाले की, वनवासी कल्याण आश्रम, आदिवासी मुलांसाठी एकल विद्यालय, सांस्कृतिक जागृती मोहिमा आणि सेवा भारतीच्या माध्यमातून गरजूंपर्यंत सेवा पोहोचवणारे स्वयंसेवक सतत कार्यरत असतात. प्रयाग महाकुंभमध्ये "नेत्र कुंभ" उपक्रमाच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी लाखो लोकांना मदत केली, याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. पूर आणि भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये स्वयंसेवकांनी दाखवलेली शिस्तबद्धता, नि:स्वार्थी भाव आणि समर्पण यांचे त्यांनी कौतुक केले.

"सेवा हा एक यज्ञ आहे आणि आम्ही आहुतीसारखे त्यात जळून त्या उद्देशाच्या महासागरात विलीन होतो," असा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

गुरुजींच्या एका प्रेरणादायी आठवणीचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, गुरुजींना एकदा विचारण्यात आले होते की, ते संघाला सर्वव्यापी का म्हणतात? त्यावर त्यांनी उत्तर दिले की, "प्रकाश स्वतः सर्व कार्य करत नाही, पण तो अंधार दूर करून इतरांना मार्ग दाखवतो."

गुरुजींची ही शिकवण आपला जीवनमंत्र आहे, असे सांगून पंतप्रधानांनी सर्वांना प्रकाशाचा स्रोत बनण्याचे आणि समाजातील अडथळे दूर करून प्रगतीचा मार्ग मोकळा करण्याचे आवाहन केले.

"स्वतःसाठी नव्हे, तर तुमच्यासाठी" आणि "माझे नाही, तर राष्ट्रासाठी" या तत्त्वांवर आधारित विचारसरणीच खऱ्या सेवाभावाची ओळख आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मी’ पेक्षा ‘आपण’ याला प्राधान्य देण्याचे तसेच सर्व प्रकारच्या धोरणांमध्ये आणि निर्णयांमध्ये राष्ट्र प्रथम ही भावना असण्याचे महत्त्व अधोरेखित करून, या दृष्टीकोनामुळे देशभरात सकारात्मक परिणाम दिसून येतात असं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्राला पिछाडीवर आणणाऱ्या साखळ्या तोडण्याची गरजही त्यांनी अधोरेखित करत वसाहतवादी मानसिकतेच्या पलीकडे जाण्याचे महत्त्व अधोरेखित केले. गेल्या 70 वर्षांपासून न्यूनगंडासह जपलेल्या वसाहतवादांच्या अवशेषांच्या जागी भारत राष्ट्रीय अभिमानाचे नवीन अध्याय पुनर्स्थापित करत आहे असे प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केले. भारतीयांना कमी लेखणाऱ्या कालबाह्य ब्रिटिश कायद्यांच्या जागी नव्या भारतीय न्याय संहितेच्या वापरावरही भाष्य केले. वसाहतवादाच्या वारशावर कर्तव्याचे प्रतीक म्हणून राजपथाचे रुपांतर कर्तव्य पथ केले त्यावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच नौदलाच्या झेंड्यावरील वसाहतवादाची चिन्हे काढल्याची नोंद घेत तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रा अभिमानाने लावल्या आहेत, असे सांगितले.  त्यांनी ज्या ठिकाणी वीर सावरकरांनी देशासाठी कष्ट सहन केले आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यवीरांचा सन्मान करण्यासाठी स्वातंत्र्याचा बिगुल वाजवला, त्या अंदमान बेटाच्या नावात बदल केल्याचे महत्त्व सांगितले.

‘“वसुधैव कुटुंबकम्” हे भारताचे मार्गदर्शक तत्व जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचत असून भारताच्या कृतींमध्ये त्याचे प्रतिबिंब पडताना दिसते”, असे सांगून, मोदी यांनी कोविड 19 महामारी दरम्यान भारताने एक कुटुंब म्हणून जगाला लस पुरवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. म्यानमारमध्ये नुकत्याच झालेल्या भुकंपात ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत भारताने दिलेल्या त्वरित प्रतिसादासह तुर्कीये आणि नेपाळमधील भूकंप आणि मालदीव्जमधील पाणी संकटादरम्यान केलेल्या मदतीची त्यांनी माहिती दिली. त्यांनी संघर्षाच्या काळात इतर देशांतील नागरिकांना बाहेर काढण्याच्या भारताच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला आणि भारताच्या प्रगतीमुळे विकसनशील देशांचा आवाज वाढत असल्याचे नमूद केले. जागतिक बंधुत्वाची भावना ही भारताच्या सांस्कृतिक मूल्यांमधून निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. आत्मविश्वासपूर्ण, आणि जोखीम पत्करण्याची क्षमता वाढलेले भारतातील युवक ही देशाची सर्वात मोठी संपत्त्ती असून  मोदी यांनी नवोन्मेष, स्टार्टअप आणि भारताच्या वारसा आणि संस्कृतीविषयीच्या अभिमानातील त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला. प्रयाग महाकुंभात लाखो तरुणांचा सहभाग हा त्यांची नाळ भारताच्या शाश्वत परंपरेशी जोडली गेली असल्याचे उदाहरण म्हणून त्यांनी नमूद केले.  राष्ट्रीय गरजांवर तरुणांचा भर,  “मेक इन इंडिया” च्या यशात त्यांची असलेली भूमिका आणि स्थानिक उप्तादनांना ते देत असलेला पाठिंबा यावर त्यांनी भाष्य केले. राष्ट्रउभारणीच्या भावनेने प्रेरित होऊन क्रीडा क्षेत्रापासून ते अंतराळ संशोधनापर्यंत उत्कृष्ट कामगिरीपर्यंत देशासाठी जगण्याच्या आणि काम करण्याच्या त्यांच्या दृढनिश्चयावर भर दिला. 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारतीय युवा भारताचे नेतृत्व करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रवासात प्रेरक शक्ती म्हणून संघटन, समर्पण आणि सेवा यांच्या समन्वयाची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक दशकांच्या प्रयत्नांची आणि समर्पणाची फळे चाखता येत आहेत आणि भारताच्या विकासाचा नवा अध्याय लिहीला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.  1925 मध्ये आरएसएसच्या स्थापनेदरम्यान असलेल्या विरोधाभासी परिस्थितीवरही पंतप्रधानांनी भाष्य केले, हा काळ संघर्ष आणि स्वातंत्र्याच्या ध्येयाने भारलेला होता. त्यांनी संघाच्या शतकी प्रवासाचे महत्त्व अधोरेखित केले आणि 2025 ते 2047 हा काळ राष्ट्रासाठी नवीन, महत्त्वकांक्षी ध्येये समोर ठेवतो आहे, असे त्यांनी नमूद केले. मोदींनी, गुरूजींच्या एका पत्रातील प्रेरणादायी शब्दांची आठवण करून दिली ज्यामध्ये भव्य राष्ट्रीय इमारतीच्या पायाभरणीतील लहानसा दगड होण्याची इच्छा व्यक्त केली होती. सेवेप्रती असलेल्या कटिबद्धतेला प्रज्वलित ठेवत, अथक प्रयत्न करत राहाण्यासाठी आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यादरम्यान सामाईक केलेल्या, पुढील हजारो वर्षांसाठी भारताचा भक्कम पाया रचण्याविषयीच्या आपल्या दृष्टीकोनाचा पुनरूच्चार केला. डॉ. हेडगेवार आणि गुरूजी यांच्यासारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन देशाला सक्षम बनवत राहील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. त्यांनी भाषणाच्या समारोपावेळी, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याचा आणि पिढ्यान् पिढ्या केल्या जाणाऱ्या बलिदानाचा सन्मान करण्याचा संकल्प केला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी, आरएसएस सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, स्वामी गोविंद देवगिरी महाराज, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज, डॉ. अविनाश चंद्र अग्निहोत्री आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

***

S.Patil/S.Mukhedkar/G.Deoda/VSS/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2116855) Visitor Counter : 47