इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

चारधाम आणि हेमकुंड साहिब यात्रा 2025: जलद आणि सुरक्षित नोंदणीसाठी आधार-आधारित ई-केवायसी सुरू


आधार प्रमाणीकरण वापरून 7.5 लाखांहून अधिक यात्रेकरूंनी चारधाम हेमकुंड साहिब यात्रा 2025 साठी नोंदणी केली

गर्दीचे सुयोग्य व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी उत्तराखंड पर्यटन विकास मंडळ (युटीडीबी) ने चारधाम यात्रेसाठी आधार-आधारित नोंदणी प्रक्रिया उपलब्ध केली

Posted On: 26 MAR 2025 7:54PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 मार्च 2025

 

भारतातील सर्वात महत्त्वाच्या तीर्थयात्रांपैकी एक असलेल्या चारधाम आणि हेमकुंड साहिब यात्रेची नोंदणी प्रक्रिया सुलभ करण्याच्या दृष्टीने उत्तराखंड पर्यटन विकास मंडळाने (युटीडीबी) आधार प्रमाणीकरण आणि ई-केवायसी सुरू केले आहे.

नोंदणीचा वेळ कमी करणे तसेच यात्रेकरूंना चांगला अनुभव मिळवून देणे हे यामागील उद्दिष्ट आहे. आधार-आधारित ऑनलाइन नोंदणीमुळे, अधिकारी यात्रेकरूंच्या हालचालींवर लक्ष ठेवू शकतात, मंदिरांमधील गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सुयोग्य तयारी करू शकतात आणि विशेषतः उंचावरील प्रदेशांमध्ये हवामानाशी संबंधित माहितीचा प्रवाह सुधारू शकतात.

परंपरेचे तंत्रज्ञानाशी संतुलन 

चारधाम आणि हेमकुंड साहिब यात्रा 2025 साठीची नोंदणी 20 मार्च रोजी सुरू झाली आणि आज सकाळपर्यंत 7,50,000 हून अधिक यात्रेकरूंनी आधार आधारित ऑनलाइन नोंदणी सुविधेचा लाभ घेतला आहे.

लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी आधार प्राधिकरण राज्यांच्या नाविन्यपूर्ण उपक्रमांना हातभार लावत आहे. यासाठी (https://registrationandtouristcare.uk.gov.in) हे नोंदणी पोर्टल आणि "टूरिस्ट केअर उत्तराखंड" हे मोबाइल ॲप अशा सुविधा याचा वापर करत आहेत.

या उपायामुळे दुहेरी नोंदणीला आळा बसेल आणि अधिक यात्रेकरूंना यात्रा करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. आधार-आधारित डिजिटल पडताळणीमुळे नोंदणी प्रक्रिया जलद होईल तसेच कागदपत्रांची कामे कमी होतील अशीही अपेक्षा आहे. निवडक केंद्रांवर ऑफलाइन नोंदणी देखील सुरू आहे.

आधार-आधारित नोंदणीमुळे नोंदणीकृत यात्रेकरूंच्या प्रत्यक्ष संख्येवर आधारित निवास व्यवस्था, वाहतूक, अन्न आणि वैद्यकीय मदतीचे चांगले नियोजन आणि व्यवस्थापन करण्यास मदत होऊ शकेल, ज्यामुळे संसाधनांचा अपव्यय न होता तुटवडाही कमी होईल. आपत्कालीन परिस्थितीला चांगल्या प्रकारे तोंड देण्यास देखील हे उपयुक्त ठरू शकेल कारण यामुळे यात्रेकरू आणि अधिकाऱ्यांमधील समन्वय आणखी सुधारेल.

 

* * *

S.Patil/N.Mathure/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2115499) Visitor Counter : 26