युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
डॉ.मनसुख मांडवीय यांनी दुसऱ्या ‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’चा केला प्रारंभ
‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’च्या माध्यमातून आपल्या खेळाडूंना मिळणाऱ्या सर्वोत्तम संधीमुळे, त्यांच्या यशाचा मार्ग मोकळा होईल - डॉ. मांडवीय
Posted On:
20 MAR 2025 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 मार्च 2025
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज नवी दिल्लीतील इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील केडी जाधव ‘इनडोअर’ सभागृहामध्ये दुसऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 चे उद्घाटन होत असल्याचे जाहीर केले. आठ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 1300 पेक्षा अधिक पॅरा खेळाडू वेगवेगळ्या सहा क्रीडा प्रकारांमध्ये भाग घेणार आहेत.

उद्घाटन समारंभ सहा पॅरालिम्पियन - सिमरन शर्मा (अॅथलेटिक्स), प्रवीण कुमार (बॅडमिंटन), नितेश कुमार (बॅडमिंटन), नित्या श्री (बॅडमिंटन) आणि प्रीती पाल (अॅथलेटिक्स) यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. याप्रसंगी केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार, अरुणाचल प्रदेशचे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री केंटो जिनी आणि भारतीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष आणि माजी पॅरालिम्पियन देवेंद्र झाझरिया यांच्यासमवेत एका अनोख्या मशाल रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 ला औपचारिक हिरवा झेंडा दाखवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या अनोख्या मशाल रॅलीत डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले की, देशासाठी पदके जिंकण्याची इच्छा असलेल्या सर्व खेळाडूंसाठी आता "छत्री" बनलेल्या प्रत्येक खेलो इंडिया स्पर्धेला मिळणारा प्रतिसाद पाहून ते उत्सुक आहेत. “भारतीय खेळांमध्ये खेलो इंडियाने दिलेल्या योगदानाबद्दल मला खूप अभिमान आणि आनंद आहे.’’

यावेळी डॉ. मांडविय पुढे म्हणाले, “ज्यावेळी एखादी व्यक्ती दृढनिश्चयी असते, योग्य दिशेने जात असते आणि कठोर परिश्रम करत असते, तेव्हा त्याचे परिणाम नेहमीच सकारात्मक असतात. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील यशाचा उल्लेख करताना ते म्हणाले, या क्रीडा स्पर्धे आपण एकूण 29 पदके जिंकली, यावरून हे सिद्ध झाले की आमच्या खेळाडूंमध्ये जागतिक स्तरावर अभिमानास्पद कामगिरी करण्याची क्षमता नक्कीच आहे. खेलो इंडिया पॅरा गेम्सच्या माध्यमातून, आमच्या खेळाडूंना सर्वोत्तम संधी मिळत आहेत आणि त्यांना यशाचा मार्ग मोकळा होत आहेत. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमके हेच स्वप्न पाहिले होते”.

डॉ.कुमार यांनीही खेलो इंडिया उपक्रमाचे कौतुक केले आणि म्हटले की, “खेलो इंडिया पॅरा गेम्स 2025 मध्ये पॅरा खेळाडूंना केवळ स्वतःला सिद्ध करण्याचीच नाही तर, त्यांच्या आव्हानात्मक प्रवासातून इतरांना प्रेरणा मिळते.”
केआयपीजी 2025 विषयी अधिक माहितीसाठी, येथे क्लिक करावे : स्वागत आहे | केआयपीजी 2025
‘खेलो इंडिया पॅरा गेम्स’ विषयी माहिती -
खेलो इंडिया पॅरा गेम्स हे प्रतिभावंत खेळाडूंना त्यांचे क्रीडा आणि स्पर्धात्मक कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्याच्या खेलो इंडिया मोहिमेचा एक भाग आहे. 20 ते 27 मार्च 2025 या दरम्यान राजधानीतील तीन ठिकाणी या स्पर्धा होणार आहेत. केआयपीजीच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये वेगवेगळ्या सहा क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा आयोजित केली जाईल - पॅरा-अॅथलेटिक्स, पॅरा तिरंदाजी , पॅरा भारोत्तोलन , पॅरा बॅडमिंटन, पॅरा टेबल टेनिस आणि पॅरा नेमबाजी या क्रीडा प्रकारांमध्ये स्पर्धा होणार आहे.
N.Chitale/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2113475)
Visitor Counter : 85