राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींच्या हस्ते रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान

Posted On: 19 MAR 2025 10:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मार्च 2025

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज (19 मार्च 2025) नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात 19 वे रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाल्या की, लोकशाहीसाठी मुक्त आणि निष्पक्ष पत्रकारितेचे महत्व सर्वोच्च स्थानी आहे. नागरिकांना उत्तम प्रकारे माहिती मिळाली नाही तर  लोकशाही प्रक्रियेचा अर्थच हरवतो.

राष्ट्रपती म्हणाल्या की, वृत्त व्यवसायासाठी कल्पनांनी समृद्ध असलेली ‘न्यूजरूम’ आवश्यक आहे. बातम्यांची गुणवत्ता आणि अचूकता सुनिश्चित करण्यासाठी संशोधन शाखेचे असलेले महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. पत्रकारितेचा आत्मा असलेले वृत्त संकलन हे अधिक बळकट व्हायला हवे, असे त्या म्हणाल्या.

सामग्री निर्मितीच्या मुद्द्यावर बोलताना राष्ट्रपतींनी विश्वास व्यक्त केला, की आपण लवकरच अशा टप्प्यावर पोहोचू, जेव्हा वाईट हेतूने तयार केलेला मजकूर वगळला जाईल आणि पोस्ट-ट्रुथ कालबाह्य ठरेल. त्यासाठी तांत्रिक साधनेही वापरली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. नागरिकांना या धोक्याची जाणीव करून देण्यासाठी सक्रिय मोहिमा राबवून त्या प्रक्रियेला गती देण्याची सूचना त्यांनी केली.  

त्या म्हणाल्या की, डीप फेक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापराचा धोका आपल्याला बातम्यांच्या या महत्वाच्या पैलूबद्दल सर्वसामान्य नागरिकांना सजग करण्यासाठी भाग पाडत आहे. विशेषतः युवा पिढीला कोणत्याही स्वरूपाच्या बातम्या अथवा विश्लेषणातील पूर्वग्रह आणि उद्दिष्ट शोधण्याचे प्रशिक्षण द्यायला हवे, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपती म्हणाल्या की, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) जग ढवळून काढत असून, पत्रकारितेसह अनेक क्षेत्रांमध्ये नवीन संधी तसेच नवीन आव्हाने निर्माण करत आहे. यंत्रांच्या मदतीने अहवालांचे संकलन आणि संपादन होऊ लागले आहे. तथापि, त्यांच्यात कमतरता आहे, ती सह वेदनेची, जो एक घटक पत्रकारांना एआयवर मात करायला सहाय्य करेल. मानवी मूल्यांवर आधारित पत्रकारिता कधीच लोप पावणार नाही.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करा -


N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2113109) Visitor Counter : 44