माहिती आणि प्रसारण मंत्रालय

वेव्हज ओटीटी भारतात डीएफबी-पोकल (DFB-Pokal) उपांत्य आणि अंतिम फेरीतील सामन्यांचे थेट प्रक्षेपण करणार


फुटबॉल प्रेमींना मिळणार जागतिक दर्जाचे फुटबॉल सामने पाहण्याची अनोखी संधी

वेव्हज ओटीटीने भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी आयोजित केली विशेष स्पर्धा: विजेत्यांना मिळणार डीएफबी-पोकल स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी जर्मनीचा दौरा करण्याची संधी

भारत-जर्मनी दृढ फुटबॉल भागीदारी : डीएफबी-प्रसार भारती करारामुळे 20 युवा भारतीय फुटबॉलपटूंना जर्मनीत प्रशिक्षण घेण्याचा मार्ग मोकळा

Posted On: 19 MAR 2025 10:01PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मार्च 2025


भारतातील फुटबॉल प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, वेव्हज ओटीटी, डीएफबी-पोकलच्या (DFB-Pokal) भागीदारीने 2 आणि 3 एप्रिल रोजी फुटबॉल सामन्यांच्या उपांत्य फेरीचे आणि त्यानंतर 24  मे 2025 रोजी स्पर्धेच्या अंतिम सामन्याचे थेट प्रक्षेपण करणार आहे. भारत आणि जर्मनी यांच्यातील फुटबॉल क्रीडा प्रकारातील संबंध दृढ करण्यासाठी प्रसार भारती आणि डीएफबी यांनी महत्वाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यानुसार भारतात फुटबॉल या क्रीडा प्रकाराशी संबंधित अधिकाधिक माहिती प्रसारित केली जाईल, तसेच 17 वर्षांखालील वयोगटासाठी प्रतिभा शोध स्पर्धा सुरु केली जाईल, ज्यामध्ये 20 युवा भारतीय खेळाडूंना जर्मनीत प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.

प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी म्हणाले, “डीएफबीबरोबरचे हे सहकार्य केवळ भारतीय प्रेक्षकांसाठी अव्वल दर्जाचे फुटबॉल सामने घेऊन येणार नसून, आपल्या युवा फुटबॉलपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनुभवांचे दरवाजे देखील खुले करणार आहे. तळागाळातील विकासाबरोबर उच्च-गुणवत्तेच्या सामग्रीची सांगड घालून आम्ही भारतात मजबूत फुटबॉल संस्कृती जोपासत आहोत आणि आमच्या तरुणांना अभूतपूर्व जागतिक संधी मिळवून देत आहोत.”

डीएफबी जीएमबीएच अँड कंपनी केजीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.होल्गर ब्लास्क म्हणाले:

प्रसार भारतीबरोबरच्या या ऐतिहासिक सहकार्याबद्दल आम्हाला अत्यंत अभिमान आणि उत्साह वाटत आहे. वेव्हज  आणि डीडी स्पोर्ट्सच्या माध्यमातून होणारे अमुल्य विनामूल्य प्रसारण म्हणजे, डीएफबी-पोकलचे लोकशाहीकरण करण्याच्या डीएफबीच्या रणनीतीची आधारशीला आहे.”

भारत-जर्मनी फुटबॉल संबंध मजबूत करण्यासाठी डीएफबी आणि प्रसार भारती यांच्यात विनिमय पत्रावर स्वाक्षरी करण्यात आली, ज्याद्वारे भारतात जागतिक दर्जाच्या फुटबॉल विषयक सामग्रीची उपलब्धता वाढेल. या सहकार्यामुळे भारतभर 17 वर्षांखालील टॅलेंट सर्च (प्रतिभा शोध) स्पर्धांच्या आयोजनाचा मार्ग मोकळा होणार आहे, ज्यामध्ये डीएफबी आणि त्याचा भागीदार ब्रँड नेक्स्टचे सहाय्य असलेल्या जर्मनीतील विशेष प्रशिक्षण कार्यक्रमासाठी 20 प्रतिभावान युवा खेळाडूंची निवड केली जाईल.

फुटबॉल चाहत्यांच्या उत्साहात भर घालणारी आणखी एक गोष्ट म्हणजे, बर्लिनमध्ये होणाऱ्या डीएफबी-पोकल फायनलसाठी दोन भाग्यवान भारतीय फुटबॉल चाहत्यांना जर्मनीची मोफत सहल करण्याची संधी देणारी एक विशेष स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. स्पर्धकांनी वेव्हजओटीटी ॲप डाऊनलोड करून, डीएफबी-पोकल स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे सामने पाहावेत आणि सोप्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत. उपांत्य फेरीच्या शेवटच्या  सामन्यादरम्यान विजेत्यांची घोषणा केली जाईल आणि त्यांना जर्मनीमध्ये अंतिम फेरीचा रोमांचक सामना प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळेल.

फुटबॉल विषयक शिक्षण आणि पोहोच वाढवण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, वेव्हज ओटीटी वर डीएफबी-पोकल ट्यूटोरियल मालिका देखील असेल, ज्यामधून वापरकर्त्यांना जर्मनीच्या प्रतिष्ठित नॉकआऊट स्पर्धेबद्दल सखोल ज्ञान मिळवण्यासाठी ऐतिहासिक दृष्टीकोन, अभिलेखीय फुटेज आणि तज्ञांचे विश्लेषण उपलब्ध होईल.

डीएफबी-पोकल (DFB-Pokal)

डीएफबी-पोकल (Deutscher Football-Bund Pokal) ही जर्मनीची प्रमुख देशांतर्गत स्पर्धा असून त्याचे आयोजन जर्मन फुटबॉल संघटना (डीएफबी) करते.  

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2113102) Visitor Counter : 44