लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

कृत्रिम बुद्धिमत्ता-समर्थित बहुभाषिक संसदीय कामकाजासाठी 'संसद भाषिणी' सुरू करण्याच्या उद्देशाने लोकसभा सचिवालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने केला सामंजस्य करार

Posted On: 18 MAR 2025 10:13PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 मार्च 2025

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत संसद कृत्रिम बुद्धिमत्ता पर्यायाच्या विकासासाठी लोकसभा सचिवालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MEITY) यांच्यात एक सामंजस्य करार झाला. संसदीय कामकाजात बहुभाषिक सहयोग आणि सुव्यवस्थित प्रक्रियांसाठी व्यापक इन-हाऊस कृत्रिम बुद्धिमत्ता पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संसद भाषिणी उपक्रमाची कल्पना करण्यात आली आहे.

लोकसभा सचिवालय आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने संसदीय डेटाच्या संचाचा वापर करून उत्पादने/साधने एकत्रितपणे आणि सहकार्यातून विकसित करण्यास सहमती दर्शविली आहे. संसदेने प्रदान केलेला संसदीय डेटा आणि संसाधने कृत्रिम बुद्धिमत्ता साधने किंवा उत्पादने शिकण्यासाठी आणि त्यांचे परिष्करण करण्यासाठी वापरली जातील. दरम्यान, भाषिणी   द्वारे भाषांतर क्षमता आणि इतर तांत्रिक कौशल्ये प्रदान केली जातील.

संसद भाषिणी अंतर्गत प्रमुख कृत्रिम बुद्धिमत्ता उपक्रम आहेत:

1. कृत्रिम बुद्धिमत्ता-आधारित भाषांतर

2. संसदेच्या संकेतस्थळासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता-समर्थित चॅटबॉट

3. भाषण-ते-मजकूर रूपांतरण आणि त्याचवेळी अर्थ समजावून सांगणे

4. रिअल-टाइम ट्रान्सक्रिप्शनसह भाषण-ते-भाषण रूपांतरण

यावेळी उपस्थित असलेले केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचे या उपक्रमासाठी त्यांचे नेतृत्व आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. हा उपक्रम अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता उपायांद्वारे संसदीय प्रक्रियांमध्ये परिवर्तन घडवेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 'संसद भाषिणी’ बहुभाषिक सुलभता वाढवेल, कायदेविषयक दस्तऐवजीकरण सुलभ करेल आणि तंत्रज्ञान-चालित प्रशासनात भारताचे स्थान मजबूत करेल, असा विश्वास वैष्णव यांनी व्यक्त केला.  

N.Chitale/S.Mukhedkar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 


(Release ID: 2112590) Visitor Counter : 49