वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
आहार 2025 च्या 39 व्या आवृत्तीत अपेडा अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने भारताच्या कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थातील प्रभुत्व दर्शवले
अपेडाने 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 95 प्रदर्शकांच्या साथीने भारताचे कृषी क्षेत्रातील सामर्थ्य दाखवून दिले
आहार 2025 मध्ये कृषी निर्यातीमधील आणि वनस्पती आधारित अन्न क्षेत्रातील भारताचे वाढते सामर्थ्य प्रभावीपणे दिसून आले
Posted On:
11 MAR 2025 6:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2025
भारतीय व्यापार प्रोत्साहन प्राधिकरणाने नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 4 ते 8 मार्च 2025 या कालावधीत आयोजित केलेल्या आहार 2025 च्या 39 व्या आवृत्तीत अपेडा (APEDA) अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने भारताच्या कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न पदार्थातील प्रभुत्व दर्शवले.
अपेडाने या कार्यक्रमात महाराष्ट्रासह 17 राज्ये आणि दिल्ली, हरियाणा, चंदिगढ आणि जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील शेतकरी उत्पादक संघटना, शेतकरी उत्पादक कंपन्या, उद्योजक आणि उत्पादन कंपन्या अशा 95 प्रदर्शकांच्या साथीने भाग घेतला. या व्यापक सहभागामुळे भारताचे कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थातील सामर्थ्य दिसून आले, शिवाय या उद्योगातील नाविन्यपूर्ण योजनांना चालना देणारी सहयोगाची भावना आणि वृद्धी अधोरेखित झाली.
आहार 2025 मध्ये वनस्पती-आधारित अन्न उद्योग संघटनेने आयोजित केलेल्या 'भारत वनस्पती-आधारित अन्न प्रदर्शना'ला संबोधित करताना, अपेडा चे अध्यक्ष अभिषेक देव यांनी कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न निर्यातीत भारताचा वाढता ठसा अधोरेखित केला. तसेच पर्यावरणाशी संबंधित जागतिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शाश्वत पर्याय म्हणून वनस्पतीजन्य पदार्थांच्या निर्यातीसाठी नवनवीन मार्ग शोधण्यावर त्यांनी भर दिला.
या दालनात सेंद्रिय आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, कृषी उत्पादने, पेये, मसाले आणि मांस उत्पादनांची विस्तृत श्रेणी मांडण्यात आली होती. प्रदर्शकांनी भरड धान्य आणि मूल्यवर्धित उत्पादने, डिहाइड्रेटेड किंवा निर्जलीकरण केलेले कांदे आणि लसूण, गोठवलेले शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ, कॅन फळे, भाज्यांचे सॉस, खाद्यतेल, तृणधान्ये आणि इतर विविध उत्पादने सादर केली.
नाविन्यपूर्ण घटकांचा समावेश, उच्च दर्जाचे सेंद्रिय मसाले आणि आरोग्यपूर्ण पेये यांचा समावेश असलेल्या भारताच्या वैविध्यपूर्ण अन्न प्रक्रिया क्षेत्रात नवीन संधींचा शोध घेणाऱ्या उद्योग तज्ञांना अपेडा पॅव्हेलियन म्हणजे वन स्टॉप केंद्र अर्थात एकाच ठिकाणी सर्व मिळू शकेल असे केंद्र म्हणून उदयाला आले आहे.
पॅव्हेलियनमध्ये एक वेट सॅम्पलिंग दालन उभारण्यात आले होते, या दालनात प्रसिद्ध भारतीय शेफ आणि त्यांच्या टीमने विविध आरोग्यपूर्ण भारतीय पाककृती तयार करुन त्यांचे थेट प्रात्यक्षिक दाखवले ज्याचा उपस्थितांना आस्वाद घेता आला. या उपक्रमाला अनेकांनी हजेरी लावली आणि आरोग्यपूर्ण पोषक मिलेट पाककृती आणि इतर पदार्थ चाखले. या संवादात्मक अनुभवामुळे उपस्थितांना भारताच्या समृद्ध पाककृती वारशाचा आणि नाविन्यपूर्णतेची खराखुरी लज्जत अनुभवायला मिळाली.
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी जगभरातील आघाडीचे उद्योजक, नवोन्मेषक आणि तज्ज्ञ उपस्थित होते. अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांच्या हस्ते 4 मार्च 2025 रोजी अपेडा पॅव्हेलियनचे उद्घाटन झाले. यावेळी एफएसएसएआयच्या विज्ञान आणि मानके आणि नियमन विभागाच्या सल्लागार डॉ. अलका राव आणि संस्थेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
या पॅव्हेलियनमध्ये भारताच्या निर्यातक्षम कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांवर भर देण्यात आला, ज्यामुळे जागतिक अन्न बाजारपेठेत देशाचा वाढता प्रभाव अधोरेखित झाला.
आहार 2025 मधील अपेडाचा सहभाग दर्जेदार, शाश्वत आणि निर्यातक्षम अन्न उत्पादने प्रदान करण्याच्या भारताच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो.
* * *
JPS/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2110369)
Visitor Counter : 24