माहिती आणि प्रसारण मंत्रालय
उत्कृष्टता पुरस्कार
भविष्याची जडणघडण, एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रांमधील उत्कृष्टतेचे अग्रणी
Posted On:
10 MAR 2025 4:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मार्च 2025
प्रस्तावना
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पाठबळासह एएसआयएफए इंडियाने आयोजित केलेली वेव्हज उत्कृष्टता पुरस्कार ही शो रील्स आणि ॲडफिल्म्स साठीची अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धा असून ती व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच ॲनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग आणि तत्सम क्षेत्रांचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. या वर्षीच्या वेव्हज च्या पहिल्या पर्वात, स्पर्धकांना भारताच्या मनोरंजन उद्योगातील सर्जनशीलता तसेच उत्कृष्टता यांचे प्रतीक असलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचे प्रदर्शन करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.

पहिल्याच वर्षीची जागतिक दृक्श्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषद (वेव्हज) एक अनोखे केंद्र तसेच संपूर्ण माध्यमे आणि मनोरंजन (एम आणि ई) क्षेत्राच्या एकत्रीकरणासाठी सज्ज असलेला मंच आहे. हा कार्यक्रम म्हणजे जागतिक एम आणि ई क्षेत्राचे लक्ष भारताकडे आकर्षित करून त्याला भारताच्या एम आणि ई क्षेत्रासोबत तसेच त्यातील प्रतिभावंतांसोबत जोडणे हे उद्दिष्ट असलेला प्रमुख जागतिक कार्यक्रम आहे.
मुंबई स्थित जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर आणि जिओ वर्ल्ड गार्डन्स येथे दिनांक 1 ते 4 मे 2025 या कालावधीत ही परिषद होणार आहे. प्रसारण आणि माहितीपूर्ण मनोरंजन, एव्हीजीसी-एक्सआर, डिजिटल माध्यमे आणि नवोन्मेष तसेच चित्रपट या चार स्तंभांवर लक्ष केंद्रित करुन वेव्हज हा कार्यक्रम भारताच्या मनोरंजन उद्योगाच्या भविष्याचे चित्र उभे करण्यासाठी प्रमुख व्यक्ती, सर्जक आणि तंत्रज्ञान यांना एकत्र आणेल.
उत्कृष्टता पुरस्कार स्पर्धा ही वेव्हज स्पर्धेतील एव्हीजीसी-एक्सआर (अॅनिमेशन, दृक परिणाम, गेमिंग आणि कॉमिक्स- विस्तारित वास्तव) या दुसऱ्या स्तंभाचा महत्त्वाचा घटक आहे. आतापर्यंत या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी 1,276 अर्जदारांनी नोंदणी केली असून, त्यातून एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्राबाबतची व्यापक रुची आणि प्रतिभा यांचे दर्शन घडते.
मार्गदर्शक तत्वे
वेव्हज उत्कृष्टता स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काही महत्वाची मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे आहेत:
अर्ज सादरीकरण प्रक्रिया: वेव्हज उत्कृष्टता स्पर्धेत (डब्ल्यूएओई) सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी त्यांच्या सर्वोत्तम कलाकृती/प्रकल्प ऑनलाईन पद्धतीने सादर केले आहेत. त्यापैकी नामनिर्देशित स्पर्धकांना महाअंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण समारंभात प्रत्यक्ष हजर राहणे आवश्यक आहे.
अर्ज सादरीकरणाचे प्रारुप: फिल्मफ्रीवे मंचाच्या माध्यमातून केवळ डिजिटल अर्ज स्वीकारण्यात आले असून प्रत्यक्ष अर्ज सादरीकरणाला परवानगी देण्यात आली नव्हती.
पात्रता: या स्पर्धेतील सहभागासाठी कोणतीही वयोमर्यादा ठेवण्यात आली नव्हती. शाळा किंवा पदवीपूर्व/पदव्युत्तर अभ्यासक्रमात शिकणारे महाविद्यालयीन विद्यार्थी या स्पर्धेसाठी विद्यार्थी विभागात अर्ज करण्यास पात्र होते. उर्वरित सर्व स्पर्धकांनी व्यावसायिक विभागांतर्गत आपापली नोंदणी केली होती.
नोंदणी प्रक्रिया
ही स्पर्धा व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच ॲनिमेशन, व्हीएफएक्स, गेमिंग आणि तत्सम क्षेत्रांचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी खुली होती. स्पर्धकांना त्यांची ॲनिमेशन, लघुपट, गेम डिझाईन अथवा व्हीएफएक्स समक्रम इत्यादी स्वरुपातील सर्वोत्तम कलाकृती सादर करण्यास सांगण्यात आले होते.अर्ज सादरीकरण प्रक्रिया 28 फेब्रुवारी 2025 रोजी समाप्त झाली. यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नव्हते.
स्पर्धेचे विभाग
ही स्पर्धा विद्यार्थी शो रील्स आणि व्यावसायिक जाहिरात चित्रफिती अशा दोन वर्गवारींमध्ये आयोजित केली जात आहे.
स्पर्धेशी संबंधीत महत्त्वाच्या तारखा
या स्पर्धा प्रक्रियेचे तारखेनिहाय नियोजन आणि वेळापत्रक खाली नमूद केल्याप्रमाणे असेल :
● प्रवेशअर्ज सादर करण्याची अंतिम तारीख - 28.02.2025
● निवड प्रक्रिया - 01.03.2025 - 08.03.2025
● परीक्षकांद्वारा परीक्षण - 09.03.2025 - 29.03.2025
● अंतिम निकाल - 01.04.2025
● विजेत्यांशी संपर्क साधणे - 02.04.2025 - 05.04.2025
● पारितोषिक समारंभ - 01.05.2025 - 04.05.2025
मूल्यमापनाचे निकष आणि परीक्षकांविषयी
उत्कृष्टता पुरस्कार अर्थात Award of Excellence साठी प्राप्त झालेल्या प्रवेशिकांचे प्रतिष्ठित परीक्षकांच्या मंडळाद्वारा सर्जनशीलता, मूळ निर्मिती अर्थात निर्मितीची अस्सलता, आणि प्रभावी कथात्मक मांडणी या निकषांच्या आधारावर मूल्यमापन केले जाईल. हे प्रमुख निकष AVGC-XR क्षेत्रातील सर्वात अभिनव आणि परिणामकारक कलाकृती ठळकपणे अधोरेखीत करतील :
सर्जनशीलता आणि मूळ निर्मिती अर्थात निर्मितीची अस्सलता (25%)
नवोन्मेष : कथा, पात्रे आणि संकल्पना या पातळीवर सादर केलेला प्रकल्प / कलाकृती इतरांपासून किती वेगळी आणि सर्जनशील आहे.
मूळ संकल्पना: ॲनिमेशन तंत्राचा वापर अथवा कथात्मक मांडणीतून दिसून येणारा नवा किंवा ताजा दृष्टीकोन
तांत्रिक कौशल्य (25%)
ॲनिमेशन गुणवत्ता: ॲनिमेशनची तरलता, प्रवाहीपणा तसेच तांत्रिक पातळीवर अॅनिमेशन तंत्राचा योग्य अवलंब
साधनांचा वापर: 2D/3D ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स अथवा दृश्यांची जोडणी यांसारख्या सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर.
ध्वनी आणि संगीत: ध्वनी संचरनेची गुणवत्ता, संगीत आणि ॲनिमेशनसोबत घातलेली सांगड या सगळ्यातील गुणवत्ता
कथात्मक मांडणी आणि आशय सादरीकरण (20%)
कथानक आणि पात्रांची जडणघडण : कथात्मक मांडणीतील स्पष्टता आणि गहीरेपणा तसेच कथानकातील पात्रांचे व्यक्तिमत्व आणि प्रवास किती चांगल्या रितीने घडवून आणला आहे.
कथेचा वेग आणि प्रवाह: कथेतील आशय किती चांगल्या प्रकारे पुढे नेला आहे आणि त्यासोबत प्रेक्षक किती आणि कशाप्रकारे गुंतले गेले
कलात्मक मांडणी (15%)
दृश्य शैली: रंग, पार्श्वभूमी आणि पात्र रचना या सगळ्याच्या अंतर्भावासह, कलात्मक दिग्दर्शनातून व्यक्त होणारी सौंदर्यदृष्टी आणि साधलेली सुसंगती.
एकूण कलात्मकता: कथात्मक मांडणीसाठी वापरात आणलेली दृश्य रचना संबंधित ॲनिमेशन आणि आशयाशी किती चांगल्या रितीने पूरक ठरली आहे.
भावनिक प्रभाव (15%)
सहभाग: सादर केलेला प्रकल्प / कलाकृती प्रेक्षकांशी भावनिकदृष्ट्या किती प्रमाणात जोडली जाते.
प्रेक्षकांसोबत जोडले जाणे : प्रेक्षकांच्या भावना जागृत करण्याची आणि त्यांना पूर्णतः खिळवून ठेवण्याची सदर प्रकल्प / कलाकृतीची क्षमता
पारितोषिक
उत्कृष्टता पुरस्कार अर्थात Awards of Excellence अंतर्गत पहिल्या 20 क्रमांकांमधील विजेत्या प्रकल्प / कलाकृतींना चषक प्रदान केला जाईल, यासोबतच त्यांचा प्रकल्प जागतिक पातळीवर प्रदर्शीत होईल, तसेच त्यांना इतर आकर्षक बक्षिसेही प्रदान केली जातील! विजेत्यांना मे 2025 मध्ये मुंबईत होणार असलेल्या WAVES 2025 या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी मोफत वाहतूक, प्रवास आणि निवासाची सोय उपलब्ध करून दिली जाईल.
प्रवेशिकांचे पुनरावलोकन आणि सन्मान प्रक्रियेचे नियोजन आणि तारखेनिहाय वेळापत्रक खाली नमूद केल्यानुसार असणार आहे :
पुनरावलोकन: 01.03.25 ते 31.03.25
नामांकनांची घोषणा: 10.04.25
विजेत्यांचा सन्मान: 01-04 मे 2025, जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई
सारांश
वेव्ह्ज उत्कृष्टता पुरस्कार अर्थात Awards of Excellence म्हणजे AVGC-XR क्षेत्रातील सर्जनशीलता आणि नवोन्मेषाचा उत्सव सोहळा आहे. या माध्यमातून विद्यार्थी तसेच या क्षेत्रातील तज्ञ व्यावसायिक अशा दोघांसाठी जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. याअंतर्गत ॲनिमेशन, व्हीएफक्स, गेमिंग आणि संबंधित क्षेत्रातील उत्कृष्टतेवर भर दिला गेला असून, या स्पर्धेमुळे सर्वोत्तम प्रतिभा ठळकपणे जगासमोर येऊ शकणार आहे. याशिवाय विजेत्यांना आकर्षक पारितोषिके, त्यांच्या कलाकृतींची विविध पातळ्यांवर घेतली जाणारी दखल आणि मुंबईत वेव्ह्ज 2025 या परिषदेत उपस्थित राहण्याची संधीही दिली जाणार आहे.
Kindly find the pdf file
S.Kane/S.Chitnis/T.Pawar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2109876)
Visitor Counter : 33
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Nepali
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada