माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज 2025 शिखर परिषदेचे यजमानपद मुंबई भूषविणार : राज्याचे मुख्य सचिव आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव यांच्या सह-अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक
वेव्हज 2025 शिखर परिषदेच्या यशस्वितेसाठी महाराष्ट्र सरकारकडून संपूर्ण सहकार्यासाठी वचनबद्ध असल्याची मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी दिली ग्वाही
वेव्हज शिखर परिषदेमुळे प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी एक जागतिक व्यासपीठ मिळणार: माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू
प्रविष्टि तिथि:
07 MAR 2025 7:30PM
|
Location:
PIB Mumbai
मुंबई, 7 मार्च 2025
वेव्हज 2025 शिखर परिषदेचे आयोजन मुंबई येथे करण्यात येणार आहे. या परिषदेमुळे भारताला आशय निर्मिती क्षेत्रामध्ये जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्थेत आघाडीवर येण्यासाठी सज्ज होता येणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक आणि भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांच्या सहअध्यक्षतेखाली आज, 7 मार्च 2025 रोजी ‘वेव्हज 2025 च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विविध सरकारी विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र सरकारने हा कार्यक्रम एक संस्मरणीय बनविण्यासाठी, जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, आदरातिथ्य आणि वाहतूक व्यवस्थेची खात्री करून, पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.
महाराष्ट्र सरकारच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी या जागतिक शिखर परिषदेसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले. त्यांनी असेही सांगितले की, प्रशासनाचा प्रत्येक विभाग शिखर परिषदेच्या यशस्वितेसाठी समन्वयाने अखंडपणे काम करेल.

या प्रसंगी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव म्हणाले, "ही शिखर परिषद माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी एक जागतिक व्यासपीठ असणार आहे. या शिखर परिषदेचे मुख्य उद्दिष्ट भारतीय माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला जागतिक माध्यमांशी जोडून विकसित करणे आहे."
या बैठकीत संयुक्त समन्वय समिती स्थापन करणे आणि वाहतूक व्यवस्था आणि बाह्य प्रसिद्धीची व्यवस्था करणे, यासारख्या प्रमुख मुद्द्यांवर चर्चा झाली. शिखर परिषदेची पोहोच अधिक व्यापक व्हावी यासाठी योजना देखील यावेळी तयार करण्यात आली. या योजनेनुसार माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जागतिक नेते, प्रतिष्ठित व्यक्ती आणि उद्योग प्रतिनिधींना आमंत्रित करण्याच्या प्रयत्नांचे नेतृत्व केले. अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या सर्व प्रतिनिधींसाठी सुरक्षा, आपत्कालीन सेवा आणि अखंड संपर्क यंत्रणा- व्यवस्था (कनेक्टिव्हिटी) सुनिश्चित करण्यावर विशेष लक्ष दिले. कार्यक्रमांची सुरळीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी एक समर्पित वरिष्ठ ‘नोडल अधिकारी’ समन्वय राखून सर्व गोष्टींवर देखरेख करतील.
या बैठकीला भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अशा नियोजनामुळे वाहतूक व्यवस्था, आदरातिथ्य, सांस्कृतिक उपक्रम आणि प्रशासकीय सहाय्य यामध्ये सुरळीत समन्वय स्थापित करता येणार आहे. परिणामी, कार्यक्रम व्यवस्थापन सुयोग्य होऊ शकेल आणि परिषदेमध्ये जागतिक सहभागाचे सर्वोच्च मानक सुनिश्चित होतील.
या बैठकीला पसूकाचे प्रधान महासंचालक धीरेंद्र ओझा, केंद्रीय संचार ब्युरोचे महासंचालक योगेश बावेजा, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सह- सचिव संजीव शंकर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव सी. सेंथील राजन, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव अजय नागभूषण आणि पसूका, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, ऑल इंडिया रेडिओ- (एआयआर)- आकाशवाणी, दूरदर्शन आणि वेव्हज कौन्सिलचे नोडल अधिकारी बैठकीला उपस्थित होते. महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, सांस्कृतिक कार्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव आणि एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह विविध प्रमुख विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीनंतर, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेव्हज 2025 च्या तयारीचे मूल्यांकन करण्यासाठी, सर्व व्यवस्थेचा तपशीलवार आढावा घेतला.
वेव्हज 2025 मध्ये डिजिटल आणि सर्जनशील क्षेत्राच्या अर्थव्यवस्थेचे भविष्य घडवण्यासाठी या संबंधित उद्योगातील दिग्गज एकत्र येणार आहेत, त्यामुळे या अभूतपूर्व शिखर परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या शिखर परिषदेविषयी जाणून घेण्यासाठी संकेत स्थळ: https://wavesindia.org/
* * *
PIB Mumbai | S.Patil/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
रिलीज़ आईडी:
2109220
| Visitor Counter:
122
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
English
,
Malayalam
,
Malayalam
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Telugu