माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आयआयएमसीचा 56 वा दीक्षांत समारंभ ; आयआयएमसी जागतिक तोडीचे माध्यम विद्यापीठ बनवण्याची योजना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून जाहीर
तुम्ही कुठेही काम करताना नेहमी लक्षात ठेवा - राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव
Posted On:
04 MAR 2025 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 04 मार्च 2025
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी) ने आज नवी दिल्ली येथील महात्मा गांधी मंच येथे 56 वा दीक्षांत समारंभ यशस्वीरित्या आयोजित केला. आयआयएमसीचे कुलपती आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या समारंभात 2023-24 च्या तुकडीच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला. आयआयएमसी नवी दिल्ली आणि त्याच्या पाच प्रादेशिक संकुलातील 478 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. याव्यतिरिक्त, 36 उत्कृष्ट विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी पदके आणि रोख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, जो त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वपूर्ण क्षण आहे.

नवी दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी) च्या 56 व्या दीक्षांत समारंभाला संबोधित करताना अश्विनी वैष्णव म्हणाले की इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन (आयआयएमसी) हे जागतिक दर्जाचे माध्यम विद्यापीठ बनवले जाईल.
आयआयएमसीच्या पुढील वाटचालीत जागतिक दर्जाचे अभ्यासक्रम आणि वेगाने बदलणाऱ्या संचार परिदृश्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी माध्यम उद्योगाशी मजबूत सहकार्य देखील समाविष्ट असेल यावर वैष्णव यांनी भर दिला. पदवीधर विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना ते बोलत होते.
वैष्णव यांनी माध्यम उद्योगाचे गतिमान स्वरूप आणि अनुकूलतेचे महत्त्व देखील अधोरेखित केले. ते म्हणाले, "संपूर्ण माध्यम विश्वात परिवर्तन होत असून बदल सातत्यपूर्ण आहेत. अग्रेसर राहण्यासाठी आपण या बदलांना आत्मसात केले पाहिजे आणि त्यांच्याशी जुळवून घेतले पाहिजे."
पदवीधरांना भेडसावणाऱ्या समस्यांना संबोधित करताना, मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना समर्पण आणि चिकाटीने आपला प्रवास सुरू ठेवण्याचा आणि या महत्त्वपूर्ण टप्प्यावर आणणारी त्यांची उर्मी कायम राखण्याचा सल्ला दिला. केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले, "तुम्ही कुठेही काम करताना नेहमी लक्षात ठेवा - राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम. देशाला मदत करण्याचे तुमच्या कामाचे उद्दिष्ट असले पाहिजे आणि त्यानंतर अन्य गोष्टी असतील."
आयआयएमसीच्या कुलगुरू डॉ.अनुपमा भटनागर म्हणाल्या, भारतीय माहिती सेवेच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आयआयएमसी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. अलिकडच्या काळात, सुरक्षा क्षेत्राच्या गरजा ओळखून, सशस्त्र दल, राज्य पोलिस विभाग, तटरक्षक दल, आसाम रायफल्स आणि सीआयएसएफसाठी विशेष जनसंवाद अभ्यासक्रम आयोजित केले गेले आहेत. याव्यतिरिक्त, राज्य माहिती अधिकारी आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत.
N.Chitale/V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2108245)
Visitor Counter : 17