वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सरकारी ई बाजारपेठेने एसडब्ल्यूएवायएटीटी या क्रांतिकारी परिणाम घडवणाऱ्या उपक्रमाची सहा वर्षांची पूर्तता केली साजरी


जेमवरील नोंदणीकृत विक्रेत्यांमध्ये 8 टक्के महिला उद्योजक

Posted On: 25 FEB 2025 6:19PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2025

 

जेम अर्थात सरकारी  ई बाजारपेठेने, एसडब्ल्यूएवायएटीटी (स्वायत्त म्हणजेच 'स्टार्टअप्स, महिला आणि युवांसाठी ई व्यवहारांच्या माध्यमातून लाभ') पुढाकाराची सहा वर्षे आपल्या नवी दिल्ली मुख्यालयात 19 फेब्रुवारी  2025 रोजी साजरी केली. या पुढाकाराची सुरुवात 19 फेब्रुवारी 2019 रोजी, सरकारी खरेदीमध्ये महिलाप्रणीत उद्योग आणि तरुणांचा सहभाग वाढवणे, या स्पष्ट उद्दिष्टाने करण्यात आली होती.

सामाजिक समावेशनाच्या जेमच्या पायाभूत स्तंभावर निर्मित हे पोर्टल व्यवसाय सुलभता वाढविण्यासाठी आणि स्टार्टअप्स, महिला उद्योजक, सूक्ष्म आणि लघु उद्योग, बचत गट  आणि तरुणांसाठी, विशेषतः समाजातील मागासवर्गीयांसाठी वार्षिक सरकारी खरेदीकरिता थेट बाजारपेठ जोडणी स्थापित करण्यासाठी वचनबद्ध आहे. सुरुवातीपासूनच या उपक्रमाने शेवटी राहिलेल्या  विक्रेत्यांना प्रशिक्षण आणि ऑनबोर्डिंग सुलभ करण्यासाठी, महिला उद्योजकता विकसित करण्यासाठी आणि सरकारी खरेदीमध्ये सहभाग आणि लहान स्तरावरील व्यवसायांना प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित केले  आहे.

या कार्यक्रमात जेमने अर्थात सरकारी ई मार्केटप्लेसने भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्या (फिक्की) महिला संघटनेसोबत (फिक्की-एफएलओ) सामंजस्य करार केला. फिक्की-एफएलओ हा 9,500 हून अधिक महिला उद्योजकांचे प्रतिनिधीत्व करणारा अखिल भारतीय मंच आहे. या भागीदारीद्वारे, महिला उद्योजकांना मध्यस्थांशिवाय सरकारी खरेदीदारांशी थेट संपर्क प्राप्त करून देण्याचा जेमचा उद्देश आहे.   जेणेकरून उत्पादनांच्या चांगल्या किमती मिळाव्यात, स्थानिक रोजगार निर्मितीला अधिकाधिक चालना मिळावी आणि समावेशक विकास व्हावा.  प्रशिक्षण, ऑनबोर्डिंगसाठी पुरेशी साधने पुरवून, स्थानिक व्यवसायांना सक्षम बनवण्यासाठी, समावेशक आर्थिक विकासासाठी, स्पर्धात्मकतेसाठी आणि सार्वजनिक खर्चात मूल्यवर्धनाला चालना देण्यासाठी या सहयोगाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील.

“एसडब्ल्यूएवायएटीटी उपक्रमाची सुरुवात झाली तेव्हा  महिलाप्रणीत  फक्त 6300उद्योग आणि जवळजवळ 3400 स्टार्टअप्स जेमवर सहभागी झाले होते. आता हा मंच कितीतरी पटीने विस्तारला आहे,” असे जेमचे मुख्य कार्यकारी अधिकारी एल.सत्या श्रीनिवास यांनी यावेळी सांगितले. 

"सरकारी खरेदीमध्ये योग्य ई-मार्केट संपर्कांच्या माध्यमातून "बाजारपेठेपर्यंत पोहोच", "वित्तपुरवठा" आणि "मूल्यवर्धनाची सुविधा" या आव्हानांवर तोडगा पुरवत जेमने  स्टार्टअप्सना 35,950 कोटी रुपये  किमतीच्या ऑर्डर पूर्ण करण्यास सक्षम केले आहे. जेमवरील विक्रेत्यांमध्ये  महिला उद्योजकांची संख्या 8% आहे. जेम पोर्टलवर उद्यम सत्यापित 1,77,786 महिला सूक्ष्म आणि लघु उद्योग नोंदणीकृत असून त्यांनी एकूण  46,615 कोटी रुपयांच्या ऑर्डर पूर्ण केल्या आहेत," असे श्रीनिवास यांनी सांगितले. 

या प्रसंगी फिक्की एफएलओच्या अध्यक्ष जयश्री दास वर्मा यांनी मनोगत व्यक्त केले. जेमसारख्या डिजिटल मंचाने  महिला उद्योजकांसाठी संधीपर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेचे कसे लोकशाहीकरण केले आहे, यावर त्यांनी प्रकाश टाकला. 

एक पायाभूत उपक्रम म्हणून संकल्पना असलेल्या एसडब्ल्यूएवायएटीटी उपक्रमामध्ये  समर्पित सूचीसाठी "स्टार्टअप रनवे" आणि "वुमनिया" स्टोअरफ्रंट्सचा समावेश आहे.  यामुळे देशभरातील  लाखो सरकारी खरेदीदारांमध्ये स्टार्टअप्स, महिला उद्योजक आणि तरुणांच्या व्यवसायाविषयी व्यापक दृश्यमानता सुनिश्चित होते. प्रवेश अडथळे दूर करून, जेम  29,000 हून अधिक स्टार्टअप्सना जेम  प्लॅटफॉर्मवर व्यवसाय संधी देऊन सक्षम करत आहे.

उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाच्या नोंदणीकृत 1 लाख स्टार्टअप्सना पोर्टलवर समाविष्ट करण्याच्या महत्त्वाकांक्षी ध्येयासह,  सरकारी खरेदीमध्ये एक गतिमान स्टार्टअप परिसंस्था होण्याचा जेमचा निर्धार आहे.

 

* * *

N.Chitale/S.Kakade/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2106191) Visitor Counter : 14