राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शतकमहोत्सवी समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती

Posted On: 25 FEB 2025 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2025

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (25 फेब्रुवारी 2025) बिहारमध्ये पाटणा येथील पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शतक महोत्सवानिमित्त आयोजित समारंभाला उपस्थित राहिल्या.

उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, पाटणा वैद्यकीय महाविद्यालय हे बिहारच्या अमूल्य वारशाचा एक भाग आहे. या संस्थेला, प्राचीनता जपत सातत्याने आधुनिकतेकडे वाटचाल करण्याचा गौरवशाली इतिहास आहे. पीएमसीएच हे आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट रुग्णालयांपैकी एक असून, या संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभा, सेवा आणि समर्पणाच्या बळावर देशात आणि परदेशात आपले आणि या रुग्णालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.  

राष्ट्रपती म्हणाल्या की, उपचारांसाठी अन्य शहरात अथवा राज्यात गेल्यावर उपचारांना विलंब, अन्न, निवास आणि रोजगार  असे अनेक प्रश्न निर्माण होतात. यामुळे मोठ्या शहरांमधील वैद्यकीय संस्थांवरही ताण पडतो. देशभरातील चांगल्या वैद्यकीय संस्थांचे विकेंद्रीकरण या सर्व समस्या सोडवण्यासाठी उपयोगी ठरेल. चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि इंदोर यासारखी शहरे विशेष उपचारांची केंद्रे म्हणून विकसित झाली आहेत. बिहारनेही अशी अनेक केंद्रे विकसित करायला हवीत. यामुळे बिहारच्या जनतेला चांगले वैद्यकीय उपचार तर मिळतीलच, पण त्याच बरोबर राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. पीएमसीएच आणि या संस्थेचे माजी विद्यार्थी आपल्या  अनुभवाच्या आधारे या प्रयत्नात मोठे योगदान देऊ शकतील.

राष्ट्रपती म्हणाल्या की, हे तंत्रज्ञानाचे युग आहे. वैद्यकीय क्षेत्रातही तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्ससारख्या तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय उपचारांची प्रक्रिया सोपी आणि अधिक अचूक बनत आहे. पीएमसीएचच्या सर्व भागधारकांनी अद्ययावत तंत्रज्ञानाचा  अवलंब करण्यासाठी नेहमीच तयार राहावे, असे आवाहन त्यांनी केले. यामुळे उपचार सोपे तर होतीलच, शिवाय डॉक्टरांचे ज्ञान आणि कार्यक्षमताही वाढेल, असे त्या म्हणाल्या.

राष्ट्रपती म्हणाल्या की, आपले डॉक्टर संशोधक, उपचार तज्ञ, शिक्षक आणि समुपदेशक देखील आहेत. या सर्व भूमिकांमधून ते लोकांची आणि समाजाची सेवा करतात आणि राष्ट्र उभारणीला हातभार लावतात. त्यांनी लोकांमध्ये रक्तदान आणि अवयवदानाबाबत जागरुकता निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी येथे क्लिक करावे

 

* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2106155) Visitor Counter : 25