राष्ट्रपती कार्यालय
ग्लोबल साउथ देशांमधील महिला शांतीसैनिकांसाठी आयोजित परिषदेतील सहभागींनी राष्ट्रपतींची भेट घेतली
Posted On:
24 FEB 2025 5:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी 2025
ग्लोबल साउथ देशांमधील महिला शांतीसैनिकांच्या परिषदेमध्ये सहभागी झालेल्या प्रतिनिधींच्या एका गटाने आज (24 फेब्रुवारी 2025 रोजी) राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, शांतता अभियानात महिलांची उपस्थिती त्या अभियानाला अधिक वैविध्यपूर्ण आणि समावेशक रूप देते. महिला शांतीसैनिकांना बहुतेकदा स्थानिक समुदायांपर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचता येते आणि महिला तसेच बालकांसाठी त्या आदर्श म्हणून कार्य करू शकतात. लिंगभावाधारित हिंसेच्या समस्येचा सामना करण्यासाठी, विश्वास निर्माण करण्यासाठी आणि संवादाला प्रोत्साहन देण्यासाठी महिला शांतीसैनिक अधिक उत्तम प्रकारे सुसज्जित आहेत.
महिला कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असलेल्या शांतता मोहिमा हिंसाचाराला आळा घालण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकणारे शांतता करार होणे साध्य करण्यासाठी अधिक परिणामकारक ठरल्या आहेत असे निरीक्षण नोंदवत राष्ट्रपती म्हणाल्या की, म्हणूनच आपण संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये अधिकाधिक महिलांचा समावेश करणे अत्यावश्यक आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या 50 हून अधिक शांतता मोहिमांमध्ये 2,90,000 हून अधिक भारतीय शांतीसैनिकांनी कर्तव्य बजावले आहे असे नमूद करत राष्ट्रपतींनी संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमधील भारतीय योगदानाच्या अभिमानास्पद इतिहासाचे स्मरण केले. आज 5,000 पेक्षा जास्त भारतीय शांतीसैनिक 9 सक्रीय मोहिमांमध्ये कार्यरत असून आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी बहुतेकदा त्यांना प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावावे लागते असे त्या म्हणाल्या. भारतीय महिला शांतीसैनिक कर्तव्य बजावण्यात आघाडीवर राहिल्या आहेत याकडे उपस्थितांचे लक्ष वेधत त्यांनी आनंद व्यक्त केला. संयुक्त राष्ट्रांच्या विद्यमान मोहिमांमध्ये सध्या 154 हून अधिक भारतीय महिला शांतीसैनिक तैनात करण्यात आले आहेत. वर्ष 1960 मध्ये काँगो मधील मोहिमेपासून वर्ष 2007 मध्ये लायबेरियात सुव्यवस्था राखण्यापर्यंत आपल्या महिला शांतीसैनिकांनी व्यावसायिकता आणि योग्य वर्तणुकीच्या सर्वोच्च परंपरांचे दर्शन घडवले आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्रालय तसेच नवी दिल्ली येथील संयुक्त राष्ट्रांच्या शांतताविषयक कार्यालयाच्या संयुक्त सहकार्यासह केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने आयोजित केलेल्या, “शांतता मोहिमांमधील महिला: ग्लोबल साउथ दृष्टीकोन” या संकल्पनेवर आधारित परिषदेत भाग घेण्यासाठी या महिला शांतीसैनिक नवी दिल्ली येथे आल्या आहेत. शांतता प्रस्थापित करण्यातील समकालीन समर्पकतेच्या मुद्द्यांबाबत तसेच शांतता अभियानांसमोर उभ्या ठाकणाऱ्या विविध आव्हानांबाबत चर्चा करण्यासाठी जगाच्या दक्षिणेकडील देशांमधील महिला अधिकाऱ्यांना एकत्र आणणे हा या परिषदेच्या आयोजनामागील उद्देश आहे.
N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2105819)
Visitor Counter : 16