माहिती आणि प्रसारण मंत्रालय
वेव्हज कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिप : युवा क्रिएटर्ससाठी अटीतटीची स्पर्धा,पाच सदस्यांचे परीक्षक मंडळ करणार अंतिम 10 स्पर्धकांची निवड करणार
अंतिम फेरीत निवडलेल्या 10 जणांमध्ये होणार स्पर्धा
Posted On:
20 FEB 2025 9:00PM by PIB Mumbai
मुंबई, 20 फेब्रुवारी 2025
मुंबईत 1 ते 4 मे 2025 या कालावधीत आयोजित वेव्हज अर्थात जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचा भाग म्हणून घेतल्या जात असलेल्या कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीतील विजेत्यांची निवड करण्यासाठी पाच सदस्यांच्या परीक्षक मंडळाची घोषणा करण्यात आली आहे. वेव्हज कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिप, इंडियन कॉमिक्स असोसिएशन (आयसीए) तसेच माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम असून जागतिक स्तरावर भारतीय सर्जनशीलता आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या "क्रिएट इन इंडिया चॅलेंज" कार्यक्रमाचा भाग आहे.
स्पर्धेत उपांत्य फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांची घोषणा आधीच करण्यात आली आहे. भारतीय कॉमिक्स क्षेत्राला आकार देणाऱ्या उद्योगधुरीणांचा समावेश असलेले परीक्षक मंडळ आता उपांत्य फेरी प्रवेशिकांचे मूल्यांकन करून विजेत्यांची निवड करणार आहे. निवडलेल्या 10 स्पर्धकांमध्ये मुंबईत वेव्हजच्या अंतिम फेरीत स्पर्धा होईल.
परीक्षक मंडळाबाबत आयसीएचे अध्यक्ष अजितेश शर्मा यांनी माहिती दिली.परीक्षक मंडळातले सदस्य या क्षेत्रातील अनुभवी, तज्ज्ञ व्यक्ती असून चॅम्पियनशिप भारतीय कॉमिक्समध्ये उत्कृष्टतेसाठी एक नवीन मानक स्थापित करेल, असे ते म्हणाले."असे प्रतिष्ठित ‘ज्युरी पॅनेल’असणे हा आम्हाला सन्मान आहे," असे ते म्हणाले.
परीक्षक मंडळ
1.दिलीप कदम - प्रसिद्ध कॉमिक आर्टिस्ट आणि इलुस्ट्रेटर प्रदीर्घ अनुभव आणि कौशल्य यासाठी जाणले जातात. अनेक दशकांच्या कारकिर्दीसह, दिलीप कदम यांनी विविध आघाडीच्या पब्लिशर्ससोबत काम केले आहे आणि भोकलसह भारतातील काही सर्वात प्रिय कॉमिक पात्रे तयार करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
2.निखिल प्राण - प्रसिद्ध कार्टूनिस्ट प्राण कुमार शर्मा यांचे पुत्र आणि स्वतः एक प्रसिद्ध कॉमिक क्रिएटर निखिल प्राण वैशिष्ट्यपूर्ण दृष्टीकोनासाठी प्रसिद्ध आहेत. प्राण यांचे काम त्यांच्या वडिलांच्या चाचा चौधरी आणि साबू सारख्या प्रतिष्ठित निर्मितींनी प्रभावित झाले आहे आणि त्यांनी स्वतःच्या अभिनव कथन तंत्राने हा वारसा पुढे नेला आहे.
3.जॅझिल होमावझीर - हे पुरस्कार विजेते ऍनिमेशन व्यावसायिक आणि द बीस्ट लीजन या सर्वाधिक काळ सुरू असलेली वेब मांगा ,जिने अलीकडेच ऍन पुरस्कार पटकावला होता तिचे निर्माते आहेत. या स्पर्धेमध्ये एक ताजेपणा आणि नवोन्मेष घेऊन आले आहेत.
4.राज कॉमिक्सचे संस्थापक आणि भारतातील नागराज, डोगा, भोकल, भेरिया आणि इतर अनेक लोकप्रिय सुपरहिरोंचे निर्माते संजय गुप्ता उद्योगातील कल आणि मागणी याबाबत बहुमूल्य मार्गदर्शन करतील.
5.अमर चित्र कथाच्या अध्यक्ष आणि सीईओ प्रीती व्यास यांनी त्यांचा आशय परिसंस्थेतील प्रदीर्घ अनुभव आणि ज्ञानाच्या मदतीने पॅनेलला आकार दिला आहे. व्यास यांनी पुराणकथांपासून ते अगदी लहान विद्यार्थ्याच्या अभ्यासाची पुस्तके आणि चित्र पुस्तकांपर्यंत विस्तृत काम केले आहे.

वेव्हज कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिप
भारतीय कॉमिक निर्मात्यांच्या पुढच्या पिढीचा शोध घेण्याच्या आणि त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ऑगस्ट 2024 मध्ये आयसीएकडून माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सहकार्याने वेव्हज कॉमिक्स क्रिएटर चॅम्पियनशिप सुरू करण्यात आली.
भारतीय कॉमिक्स क्षेत्रात नवोन्मेष, सृजनशीलता आणि कथाकथनाची आवड यांची जोपासना करून एक नवे युग सुरू करण्याच्या उद्देशाने ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.
वेव्हज 2025 विषयी -
प्रसारमाध्यम, मनोरंजन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नवोन्मेष, सृजनशीलता आणि सहकार्याला चालना देण्याचा उद्देश असलेली वेव्हज 2025 ही जागतिक शिखर परिषद असून 1 मे ते 4 मे दरम्यान मुंबईत जियो कन्वेन्शन सेंटर येथे तिचे आयोजन होणार आहे. ऍनिमेशन, गेमिंग, व्हिज्युअल इफेक्ट्स आणि एक्सआर(एक्स्टेंडेड रियालिटी) यामध्ये नव्या संधींचा शोध घेण्यासाठी या शिखर परिषदेत निर्माते, उद्योग धुरीण आणि गुंतवणूकदार एकत्र येणार आहेत. एव्हीजीसी-एक्सआर क्षेत्रातील जागतिक ऊर्जागृह म्हणून भारताचे स्थान निर्माण करण्यासाठी वेव्हज 2025 कौशल्य विकास, उद्यमशीलता आणि सीमापार सहकार्याला चालना देत आहे.
S.Bedekar/S.Kulkarni/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2105147)
Visitor Counter : 29