माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्हीआयपीएस दिल्ली येथील वेव्हज समिट रोड शो मध्ये विद्यार्थ्यांना व्हिडिओ एडिटिंग, ट्रेलर क्रिएशन, डिजिटल कंटेंट निर्मिती मधील व्यावहारिक कौशल्यांचे प्रशिक्षण


फिल्ममेकिंग आणि डिजिटल क्रिएशनमध्ये करियर घडवण्यासाठी WAVES ट्रेलर मेकिंग स्पर्धेत 31 मार्च 2025 पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

पहिल्या 20 विजेत्यांना मिळणार ट्रॉफी आणि मुंबईत होणार्‍या WAVES समिट मध्ये सहभागी होण्याची विशेष संधी


Posted On: 18 FEB 2025 8:08PM by PIB Mumbai

मुंबई, 18 फेब्रुवारी 2025

 
फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की), अर्थात भारतीय उद्योग आणि व्यापार महासंघाने नेटफ्लिक्स च्या सहयोगाने आज नवी दिल्लीत विवेकानंद व्यावसायिक अभ्यास संस्था (व्हीआयपीएस), रोहिणी येथे, क्रिएट इन इंडिया चॅलेंज - सीझन 1 चा भाग असलेल्या वेव्हज (WAVES) समिट (परिषद) रोड शोचे यशस्वीपणे आयोजन केले होते.  

संस्थेच्या 'Oblivion', या वार्षिक महोत्सवामध्ये आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम चित्रपट निर्मिती आणि डिजिटल कंटेंट निर्मितीची आवड असलेल्या 100 हून अधिक विद्यार्थ्यांसाठी शिकण्याचा नवा अनुभव देणारा ठरला.

सृजनशीलता जोपासण्यावर आणि तांत्रिक कौशल्ये वाढवण्यावर भर देणारा ‘वेव्हज समिट रोड शो’ व्हीआयपीएसमधील विद्यार्थ्यांसाठी एक मोलाचे व्यासपीठ ठरला. या स्पर्धेसाठी जगभरातून प्रवेशिका दाखल होत असून, या रोड-शो ने, माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील पुढल्या पिढीतील नेतृत्व ओळखून, त्याला जोपासण्याच्या दिशेने एक पाऊल म्हणून महत्वाची भूमिका बजावली.

चित्रपट निर्मिती आणि संपादन प्रशिक्षण

या रोड शोमध्ये ॲडोब प्रीमिअर प्रो चा वापर करून व्हिडिओ एडिटिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. या सत्रात विद्यार्थ्यांना ट्रेलर निर्मिती, स्टोरीबोर्डिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचे तंत्र समजून घेण्याची आणि चित्रपट उद्योगातील व्यावसायिकांकडून शिकण्याची संधी मिळाली.

ट्रेलर निर्मिती मधील आव्हानांनी उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना एकत्र आणले

या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरली, ट्रेलर मेकिंग स्पर्धा, ज्याने विद्यार्थ्यांना काही लोकप्रिय वेब सीरिज आणि चित्रपटांचा वापर करून आकर्षक ट्रेलर तयार करण्याचे प्रोत्साहन दिले. ब्रिटन, संयुक्त अरब अमिराती, कॅनडा, श्रीलंका आणि इतर अनेक देशांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत, उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांना राष्ट्रीय आणि जागतिक व्यासपीठावर आपली प्रतिभा प्रदर्शित करण्याची सुवर्णसंधी मिळाली.

ट्रेलर निर्मितीसाठी निवडण्यात आलेल्या शीर्षकांमध्ये हीरामंडी, जाने जान, चोर निकल के भागा, मोनिका, ओ माय डार्लिंग आणि गन्स अँड गुलाब्स सारख्या लोकप्रिय भारतीय मालिकांचा समावेश होता. याशिवाय स्क्विड गेम आणि मनी हेस्ट सारख्या जागतिक ख्यातीच्या मालिकांचाही समावेश करण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थ्यांना भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कथांच्या मिश्रणाचा प्रयोग करता आला.

या उपक्रमाच्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना सहभागी सार्थक झा म्हणाला, “ॲडोब प्रीमिअर प्रो मधील वास्तवदर्शी प्रशिक्षण अविश्वसनीयरित्या समृद्ध करणारे होते. मला आता माझ्या संकलन कौशल्याबाबत अधिक आत्मविश्वास वाटू लागला असून मी प्रत्यक्ष प्रकल्पांमध्ये या तंत्रांचा वापर करण्यास उत्सुक आहे. ही अत्यंत अद्भुत संधी होती.”  

सर्जकतेला मुक्तद्वार: ट्रेलर तयार करण्याच्या कलेत प्राविण्य मिळवणे

वेव्हज परिषदेचा भाग म्हणून नेटफ्लिक्स फंड फॉर क्रिएटीव्ह इक्विटीने प्रायोजित केलेली ‘सर्जकतेला मुक्तद्वार’ ही स्पर्धा नवोदित चित्रपट निर्मात्यांना प्रेरित आणि सुसज्ज करण्याच्या दृष्टीने रचलेली आहे. हा अनोखा उपक्रम विद्यार्थ्यांना नेटफ्लिक्सच्या विस्तृत साहित्य संग्रहातून प्रेरणा घेऊन लक्षवेधक ट्रेलर्स निर्माण करण्याची संधी देतो.

तज्ञांच्या नेतृत्वाखालील प्रशिक्षण सत्रांच्या माध्यमातून सहभागी विद्यार्थी कथाकथन, व्हिडिओ संकलन आणि ध्वनी रचना अशा कलांतील महत्त्वाची कौशल्ये शिकतील ज्यामुळे विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे ट्रेलर्स तयार करण्यासाठी सज्ज होता येईल. ‘सर्जकतेला मुक्तद्वार’ ही केवळ एक स्पर्धा नसून यातून सहभागींना मार्गदर्शन तसेच या कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येऊन, त्यांना या क्षेत्रातील व्यावसायिकांच्या परीक्षणाला पात्र ठरणारे अंतिम स्पर्धात्मक कार्य उभारता येईल.

या स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या सहभागींना मौल्यवान अभिप्राय आणि सन्मान लाभेल तसेच त्यांना नेटफ्लिक्स सदस्यत्व आणि ब्रँडेड वस्तुंसह आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळेल.

या स्पर्धेत कोण भाग घेऊ शकते

ही स्पर्धा व्हिडिओ संकलन, चित्रपट निर्मिती किंवा सामग्री निर्मितीची तीव्र आवड असणारे विद्यार्थी आणि नवोदित चित्रपटनिर्मात्यांसाठी खुली आहे. अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे.

स्पर्धेसाठी अर्ज प्रक्रिया

https://reskilll.com/hack/wavesficci/signup या संकेतस्थळावर उपलब्ध अर्ज भरून आणि तुमची सर्जनशील पार्श्वभूमी आणि स्पर्धेतील सहभागाचे कारण यांसारखी आवश्यक माहिती देऊन तुम्ही अर्ज सादर करू शकता. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2025 आहे.

विजेत्यांची निवड कशी होईल

सर्जनशीलता, कथाकथन, तांत्रिक कसब आणि साधलेला एकंदर परिणाम यांच्या आधारावर या क्षेत्रातील तज्ञांचे पथक स्पर्धकांच्या ट्रेलर्सचे मूल्यमापन करेल. विविध फेऱ्यांच्या चाळणी प्रक्रियेसह सहभागींना त्यांच्या कामाचा अभिप्राय देण्यात येईल.
चौथ्या सत्रानंतर वैध ट्रेलर सादर करणाऱ्या सर्व सहभागींना सहभागाचे प्रमाणपत्र देण्यात येईल. पहिल्या 20 सहभागींना उत्कृष्टता प्रमाणपत्र, चषक अथवा स्मरणिका, नेटफ्लिक्स वस्तू आणि मुंबई येथील वेव्हज परिषदेत उपस्थित राहण्यासाठी होणारा प्रवासखर्च देण्यात येईल.


S.Patil/R.Agashe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2104486) Visitor Counter : 31