रेल्वे मंत्रालय
माघी पौर्णिमेनिमित्त पवित्र स्नान केल्यानंतर भाविकांना त्यांच्या घरी विनाविलंब जाता यावे यासाठी भारतीय रेल्वे अहोरात्र कार्यरत आहे- रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
केंद्रीय रेल्वेमंत्री आणि रेल्वे मंडळाच्या अध्यक्षांनी वॉर रूमला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना निर्देश दिले
Posted On:
12 FEB 2025 10:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2025
केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार यांनी आज रेल्वे भवन येथील वॉर रूममध्ये प्रयागराज रेल्वे स्थानकांच्या गर्दी व्यवस्थापन परिस्थितीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी सर्व बाजूला जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी गाड्या सोडल्या जात आहेत याची खातरजमा करावी असे निर्देश रेल्वेमंत्र्यांनी दिले. याशिवाय प्रवाशांची गर्दी होऊ नये यासाठी प्रयागराज विभागाला आवश्यकतेनुसार अतिरिक्त रेल्वे गाड्या चालवण्याचे निर्देश दिले असून गाडीची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना विश्रामगृहात सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचनाही दिल्या आहेत.
महाकुंभमेळ्यासंदर्भात माहिती देणाऱ्या रेल्वेच्या बुलेटिननुसार, आज (12 फेब्रुवारी 2025) संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत, प्रवाशांच्या सोयीसाठी 225 गाड्या चालवण्यात आल्या होत्या, ज्यामधून 12.46 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. मंगळवार,11 फेब्रुवारी 2025 रोजी, 14.69 लाखांहून अधिक प्रवासी घेऊन 343 गाड्या चालवण्यात आल्या. भारतीय रेल्वे विविध माध्यमांमधून रेल्वे गाड्यांविषयीची माहिती सातत्याने पुरवत आहे - यामध्ये विशेष बुलेटिन्स, महाकुंभ परिसरातील विश्राम गृह, रेल्वे स्थानके आणि इतर मीडिया आउटलेट्स यांचा समावेश आहे.

प्रवाशांच्या सोईसाठी प्रयागराज जंक्शन रेल्वे स्थानक परिसरात चार विश्रामगृह (प्रत्येक 5,000 क्षमतेसह) स्थापन करण्यात आले असून ते पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. याव्यतिरिक्त, आज माघी पौर्णिमेच्या मुहूर्तावर खुसरोबाग येथे 100,000 प्रवासी क्षमता असलेले नवीन विश्रामगृह कार्यान्वित करण्यात आले आहे ज्यात निवास, जेवण आणि इतर आवश्यक गोष्टींसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेले प्रवासी त्यांच्या गाडीमध्ये चढेपर्यंत तिथे राहू शकतील.
सर्व प्रवाशांनी केवळ अधिकृत स्त्रोतांकडून माहिती मिळवावी तसेच कोणतेही चुकीचे वृत्त आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन रेल्वेने केले आहे.
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2102542)
Visitor Counter : 53