संरक्षण मंत्रालय
बेंगळुरू येथील येलहंका हवाई दलाच्या तळावर आयोजित 'एअरो इंडिया 2025' चे 10 फेब्रुवारी 2025 रोजी संरक्षण मंत्री करणार उद्घाटन
Posted On:
09 FEB 2025 6:21PM by PIB Mumbai
आशियातील सर्वात मोठे एरोस्पेस आणि संरक्षण प्रदर्शन असलेल्या एअरो इंडियाच्या 15 व्या आवृत्तीचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते, 10 फेब्रुवारी 2025 रोजी कर्नाटकातील बेंगळुरू येथील येलहंका हवाई दलाच्या तळावर होणार आहे. ‘द रनवे टू अ बिलियन अपॉर्च्युनिटीज’ या व्यापक संकल्पनेवर आधारित, या पाच दिवसांच्या प्रदर्शनात जागतिक एरोस्पेस कंपन्यांच्या अत्याधुनिक उत्पादनांसह भारताचे हवाई सामर्थ्य आणि स्वदेशी अत्याधुनिक नवोन्मेष प्रदर्शित केले जातील. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’ या दृष्टिकोनानुसार आयोजित हा कार्यक्रम स्वदेशीकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करेल. या प्रदर्शनामुळे 2047 पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या संकल्पाला चालना मिळणार आहे.
एअरो इंडिया हे एक महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे संरक्षण मंत्र्यांनी कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला बेंगळुरू येथे पत्रकार परिषदेत सांगितले . हे व्यासपीठ सरकारच्या मजबूत, सक्षम भारत, सुरक्षित आणि स्वयंपूर्ण भारताच्या दृष्टिकोनाला चालना देईल असे ते म्हणाले. “एरो इंडिया हे एक व्यासपीठ आहे जे नवीन भारताची ताकद, जुळवून घेण्याची क्षमता आणि स्वावलंबनाचे दर्शवते घडवते. हे व्यासपीठ केवळ भारताच्या संरक्षण तयारीसाठी महत्त्वाचे नाही तर ते आपल्या राष्ट्राचे भविष्य घडवण्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावते, असे त्यांनी सांगितले. हे प्रदर्शन आपल्या संरक्षण क्षमता प्रदर्शित करेल तसेच जागतिक भागीदारीला चालना देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपल्या मित्र राष्ट्रांसोबत समान हिताच्या क्षेत्रात सहकार्य वाढवणे, दृढ सहकार्य आणि सामायिक प्रगतीला चालना देणे हे आपले ध्येय आहे, असे ते म्हणाले. हे केवळ तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाचे प्रदर्शन नाही तर आपल्या तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत म्हणून काम करेल, तसेच, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि नवोन्मेषाची भावना जोपासेल,” असेही ते म्हणाले.
एकूण 42,000 चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रावर आयोजित आणि 900 हून अधिक प्रदर्शकांच्या सहभागासह हे प्रदर्शन होत आहे. यामध्ये 150 परदेशी कंपन्यांचा समावेश असून हे आतापर्यंतचे सर्वात मोठे `एरो इंडिया` प्रदर्शन ठरणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यातील 90 हून अधिक देशांचा सहभाग हा भारताच्या `एरोस्पेस` आणि संरक्षण क्षेत्रातील वाढत्या जागतिक विश्वासाचा दाखला असल्याचे म्हटले आहे . "सुमारे 30 देशांचे संरक्षण मंत्री - प्रतिनिधी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. 43 देशांच्या वायू दल प्रमुख आणि सचिवांची उपस्थिती केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय संरक्षण समुदायासाठी या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करते," असे ते म्हणाले.
संरक्षणमंत्र्यांनी विश्वास व्यक्त केला की संरक्षण उत्पादनाने विक्रमी 1.27 लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला असून वर्ष 2025-26 अखेरीस हे उत्पादन 1.60 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक होईल. संरक्षण निर्यात 21,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचली असून, ती 30,000 कोटी रुपयांहून अधिक जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राजनाथ सिंह यांनी संरक्षण उद्योग क्षेत्र देशाला आर्थिक महासत्ता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट केले. संरक्षण क्षेत्रातील कोणतीही प्रगती राष्ट्रीय सुरक्षेसाठीच नव्हे, तर अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाची ठरते. संरक्षण क्षेत्रासाठी विकसित तंत्रज्ञान हे नागरिक क्षेत्रातही नाविन्यपूर्ण विकासाला चालना देते, परिणामी रोजगार निर्मिती आणि आर्थिक वाढ होते, असे ते म्हणाले. `एरो इंडिया` एकूणच अर्थव्यवस्थेच्या वाढीस हातभार लावत असल्याने भारताच्या आर्थिक शक्तीचा एक महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी सांगितले. `एरो इंडिया` हा भारताच्या `एरोस्पेस` आणि संरक्षण क्षेत्रातील जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करण्याच्या प्रवासातील एक ऐतिहासिक टप्पा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
***
S.Kane/S.Mukhedkar/N.Gaikwad/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2101180)
Visitor Counter : 63