गृह मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू आणि काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत नवी दिल्लीत झाली आढावा बैठक
Posted On:
05 FEB 2025 8:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2025
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली जम्मू-काश्मीरमधल्या सुरक्षा परिस्थितीबाबत आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय आढावा बैठक झाली. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृहसचिव, गुप्तचर खात्याचे महासंचालक आणि जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक तसेच गृह खाते व जम्मू काश्मीर प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत काल सुद्धा एक महत्त्वाची आढावा बैठक घेतली होती, ज्यामध्ये लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी , गृहसचिव आणि गृहखात्याचे तसेच लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीला संबोधित करताना केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री शाह म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद संपूर्णपणे संपवून टाकण्यासाठी वचनबद्ध आहे. मोदी सरकारच्या सातत्यपूर्ण आणि सूत्रबद्ध प्रयत्नांमुळे जम्मू काश्मीरमधील दहशतवादाची परिस्थिती लक्षणीयरित्या निवळली आहे.
सर्व सुरक्षादलांनी दहशतवादाविरुद्धच्या युद्धातले पुढचे पाऊल टाकत शून्य घुसखोरीचे लक्ष्य साध्य करण्याचे उद्दिष्ट बाळगावे असे निर्देश केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व सुरक्षा संस्थांना दिले. सर्व सुरक्षा संस्थांनी घुसखोरी विरोधात अधिक कडक धोरण राबवावे तसेच दहशतवादासंदर्भातही कोणतीही दयामाया न दाखवणारे धोरण अवलंबावे असेही ते म्हणाले. दहशतवादाचे अस्तित्व मुळापासून उखडून टाकणे हे आपले उद्दिष्ट असायला हवे असे त्यांनी सांगितले. नार्को नेटवर्क म्हणजेच अंमली पदार्थांचे जाळे हे घुसखोर तसेच दहशतवाद्यांना त्यांची कृती पार पाडण्यासाठी सहाय्यक होते असे नमूद करत अमित शाह यांनी सांगितले की अंमली पदार्थांच्या व्यापाराकडून दहशतवाद्यांना होणाऱ्या निधी पुरवठ्या विरुद्ध करक कारवाई करण्याची गरज आहे. नवीन गुन्हेगारी कायद्यांच्या योग्य अंमलबजावणीच्या दृष्टीने न्यायवैद्यक शास्त्र प्रयोग शाळेतील जागांवर नवीन नेमणुका करण्याचे निर्देशही अमित शहा यांनी सुरक्षा संस्थांना दिले.
दहशतवादमुक्त जम्मू-काश्मीरचे उद्दिष्ट प्रत्यक्षात आणण्यासाठी मोदी सरकारने दहशतवादासंदर्भात अवलंबलेल्या शून्य सहनशीलता या धोरणावर शहा यांनी यावेळी भर दिला. जम्मू कश्मीरमधील दहशतवाद उखडून टाकण्यासाठी सर्व सुरक्षा दलांनी सतर्क राहून दहशतवादाविरोधात एकदिलाने लढणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीबाबत सर्वच स्तरावर लक्षणीय सुधारणा दिसून येत असल्याबद्दल त्यांनी सुरक्षा संस्थांनी घेतलेल्या परिश्रमाचे कौतुक केले.
* * *
S.Patil/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2100135)
Visitor Counter : 11