संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्री आणि शिक्षण मंत्री यांच्या हस्ते वीर गाथा 4.0 च्या सुपर-100 विजेत्यांचा सत्कार
सुपर-100 विजेत्यांमध्ये 66 मुलींनी स्थान मिळवत मारली बाजी
युवक हे भारताचे भावी नायक असून 2047 पर्यंत भारताला ‘विकसित भारत’ बनवण्यात प्रमुख भूमिका बजावतील : राजनाथ सिंह
वीर गाथा देशभक्ती, धैर्य आणि राष्ट्रीय अभिमानाची मूल्ये रुजवते आणि विद्यार्थ्यांना देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी प्रेरित करते : धर्मेंद्र प्रधान
प्रविष्टि तिथि:
25 JAN 2025 2:03PM by PIB Mumbai
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 25 जानेवारी 2025 रोजी नवी दिल्ली येथे वीर गाथा 4.0 च्या सुपर-100 विजेत्यांचा सत्कार केला. या 100 विजेत्यांमध्ये देशाच्या विविध भागांमधील 66 मुली आहेत.सत्कार समारंभात, प्रत्येक विजेत्याला 10,000 रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. हे सुपर-100 विजेते विशेष आमंत्रित 10,000 अतिथींपैकी आहेत जे 26 जानेवारी 2025 रोजी कर्तव्य पथ येथे प्रजासत्ताक दिन संचलनाला उपस्थित राहणार आहेत.
आपल्या भाषणात, संरक्षण मंत्र्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आणि देशाच्या शूरवीरांच्या गौरवशाली इतिहासाशी युवकांना जोडण्याचे वीर गाथेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संरक्षण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालय करत असलेल्या संयुक्त प्रयत्नांचे कौतुक केले. प्रकल्पाच्या या चौथ्या आवृत्तीत संपूर्ण भारतातील 1.76 कोटी विद्यार्थ्यांच्या sahbhagachi सहभागाची दखल घेत ते म्हणाले की शिक्षणाच्या माध्यमातून ते शूरवीरांना ओळख मिळवून देत आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचे, उत्साहाचे आणि देशभक्तीचे त्यांनी कौतुक केले.
वीर गाथा 4.0 च्या सुपर-100 विजेत्यांमध्ये 2/3 मुली आहेत याबद्दल आनंद व्यक्त करताना, राजनाथ सिंह यांनी मणिपूरमधील 'नेम्नेनेंग' नावाच्या इयत्ता 10 वी तील विद्यार्थिनीचा विशेष उल्लेख केला, जिने लहानपणीच आपल्या पालकांना गमावले होते. अनंत अडचणी असूनही तिने अभ्यास सोडला नाही आणि विजेत्यांमध्ये स्थान मिळवले याबद्दल संरक्षण मंत्र्यांनी तिच्या चिकाटीचे कौतुक केले.
ते पुढे म्हणाले की, युवक हे भारताचे भावी नायक आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कल्पनेनुसार 2047 पर्यंत भारताला ‘विकसित भारत’ बनवण्यात ते प्रमुख भूमिका बजावतील.
संरक्षण मंत्र्यांनी त्यांना स्वातंत्र्य सैनिक भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, अशफाकउल्ला खान यांसारख्या शूरवीरांकडून तसेच ज्यांचे शौर्य आणि बलिदान कधीही विसरता येणार नाही अशा शूर सैनिकांकडून प्रेरणा घेत राहण्याचे आवाहन केले. कोणत्याही देशाच्या विकासासाठी राष्ट्रीय अभिमानाची भावना ही सर्वात महत्त्वाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी बोलताना, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान प्रामुख्याने भर देत सांगितले की युवा मनांची सर्जनशीलता जोपासण्याबरोबरच वीर गाथा सारखे उपक्रम शालेय विद्यार्थ्यांना शौर्य पुरस्कार विजेत्यांच्या शौर्याबद्दल आणि बलिदानाबद्दल अवगत करतात .
शिक्षणमंत्र्यांनी नमूद केले की हा उपक्रम देशभक्ती, धैर्य आणि राष्ट्रीय अभिमानाची मूल्ये रुजवण्यात मदत करेल आणि विद्यार्थ्यांना देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी प्रेरित करेल.
कार्यक्रमादरम्यान, परमवीर चक्र पुरस्कारप्राप्त सुभेदार मेजर संजय कुमार यांनी 1999 च्या कारगिल युद्धातील त्यांचा प्रेरणादायी अनुभव सामायिक केला आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनात शौर्य, निःस्वार्थीपणा आणि प्रामाणिकपणा ही मूल्ये आत्मसात करण्याचे आवाहन केले."
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2096112)
आगंतुक पटल : 103