माहिती आणि प्रसारण मंत्रालय
दावोसमध्ये भारताचे वर्चस्व : केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधोरेखित केली भारताची निर्यात आधारित प्रगती आणि सर्वसमावेशक विकासाची यशोगाथा
लवकरच भारताचा समावेश हा सेमीकंडक्टरसाठी पहिल्या तीन पसंतीच्या ठिकाणांमध्ये होईल असा सेमीकंडक्टर उद्योग क्षेत्रातील बहुतांश दिग्गजांना विश्वास : अश्विनी वैष्णव
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित कौशल्यांवर भारताचा भर, त्याअनुषंगानेच भारताने जगाच्या गरजेनुसार कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान विषयक आवश्यक उत्पादनांची निर्मिती करू शकतील यादृष्टीने किमान 1 दशलक्ष इतक्या मनुष्यबळाला प्रशिक्षणाद्वारे सक्षम करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे - अश्विनी वैष्णव
Posted On:
24 JAN 2025 5:28PM by PIB Mumbai
केंद्रीय माहिती आणि प्रसारण, तसेच रेल्वे, इलेक्ट्रॉनिक्स मंत्री आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दावोस इथल्या जागतिक आर्थिक मंचाच्या ( World Economic Forum) परिषदेत जागभरातले नेते आणि उद्योग क्षेत्रातल्या दिग्गजांसमोर निवेदन सादर केले. यावेळी अश्विनी वैष्णव यांनी भारताचा सर्वसमावेशक विकासाचा दृष्टीकोन आणि याअंतर्गत भारताने साधलेल्या उल्लेखनीय प्रगतीची विकासगाथा उपस्थितांसमोर मांडली.
आर्थिक विकासासंबंधीचा संतुलित दृष्टिकोन
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या निवेदनात भारताने आर्थिक विकासासाठी अवलंबलेला संतुलित दृष्टिकोनाविषयी उपस्थितांना सांगितले. यासोबतच उत्पादन आणि सेवा ही दोन्ही क्षेत्र भारताच्या विकासाला चालना देणारे कारक घटक असल्याचेही त्यांनी ठळकपणे नमूद केले. माहिती तंत्रज्ञानविषयक उत्पादन आणि सेवा ही दोन्ही क्षेत्र भारताच्या आर्थिक वाटचालीचा अविभाज्य भाग आहेत. त्यामुळेच उत्पादन आणि सेवा या क्षेत्रांना वेगळे करता येणार नाही, आणि म्हणूनच शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासाठी या दोन्ही क्षेत्रांमध्ये समन्वय आवश्यक असल्याची बाब अश्विनी वैष्णव यांनी यावेळी अधोरेखित केली.
निर्यात - आधारित विकास धोरण
भारताने आपल्या परिवर्तनीय वाटचालीत केवळ आयातीला पर्याय निर्माण करण्यावर भर दिलेला नाही, तर त्याऊलट भारताने 'मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड' असा दृष्टिकोन अवलंबण्यापर्यंत वाटचाल केली आहे ही बाबही त्यांनी नमूद केली. आता भारतात देशांतर्गत वापरल्या जाणाऱ्या मोबाईल फोन उपकरणांपैकी 99 टक्के मोबाइल फोन हे भारतातच तयार होत आहेत असे त्यांनी सांगितले. आता भारताचे विकासासंबंधीचे धोरण हे औषधविषयक, रसायने आणि वस्त्र परिधाने अशा क्षेत्रांअंतर्गतच्या निर्यातीवर आधारित वाढीच्या दिशेने वळले असल्याचे त्यांनी सांगितले.
आता सेवा क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची भूमिका वाढलेली आहे, आणि त्यातून भारताच्या भवितव्यालाही नवा आकार मिळतो आहे, यामुळे नवोन्मेषालाही चालना मिळत असून नव्या संधी देखील निर्माण होत असल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर आता कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कौशल्यधारीत मनुष्यबळाला प्रशिक्षण देण्यावर विशेषत्वाने भर देण्याची गरजही यानिमीत्ताने अश्विनी वैष्णव यांनी ठळकपणे अधोरेखित केली.
भारत : जागतिक भांडवल परिसंस्थेतील तंत्रज्ञान उपयोगितेचे मुख्य केंद्र
यावेळी अश्विनी वैष्णव यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगितेविषयी देखील निवेदन केले. या तंत्रज्ञानाचा वापर करत भारत जागतिक उद्योगक्षेत्राला कामी येणारी नवोन्मेषित उत्पादने निर्माण करू शकतो, आणि त्यामुळेच या तंत्रज्ञानाच्या उपयोगितेच्या बाबतीत भारत जगासाठी भांडवल ठरण्याची क्षमता बाळगून आहे असे ते म्हणाले. ज्याप्रमाणे भारताने माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे जागतिक स्तरावर नेतृत्व केले, त्याचप्रमाणे भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान सेवा क्षेत्राचे जागतिक स्तरावर नेतृत्व करण्याची क्षमता भारतात असल्याबद्दल तज्ञांमध्ये विश्वास आहे ही बाबही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी अधोरेखित केली. यानिमीत्ताने केलेल्या निवेदनातून त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान क्षेत्राच्या जागतिक स्तरावरील भवितव्याला आकार देण्याची भारताची क्षमताही ठळकपणे अधोरेखित केली.
कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानविषक कौशल्य आणि नवोन्मेषावर भर
उदयोन्मुख तंत्रज्ञानाशी संबंधित , विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाशी संबंधित देशांतर्गत मनुष्यबळ तयार करण्याकरता या क्षेत्रातील कौशल्यांवर भारत सरकारने भर असल्याची बाबही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी नमूद केली. या क्षेत्राशी संबंधित देशातले मनुष्यबळ जगाच्या गरजेनुसार आवश्यक उत्पादनांची निर्मिती करू शकतील यादृष्टीने त्यांना सक्षम करण्याकरता भारताने किमान 1 दशलक्ष लोकांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाशी संबंधित साधने आणि कौशल्यांनी सुसज्ज करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
अशाच प्रकारचे इतर क्षेत्रांसाठीचे उपक्रमही भारताने राबवले आहेत. त्याअंतर्गत दूरसंचार उद्योग क्षेत्राला उपयुक्त ठरावे यादृष्टीने विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यासाठी भारताने 100 विद्यापीठांमध्ये 5G प्रयोगशाळा स्थापन केल्या आहेत, तसेच विद्यार्थ्यांना सेमीकंडक्टर संरचनीय आरेखनांचे प्रशिक्षण देण्याकरता 240 विद्यापीठांना प्रगत अन्वेषणात्मक डेटा विश्लेषण साधने (EDA Tool - Exploratory Data Analysis Tool) प्रदान केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान क्षेत्राचे नेतृत्व
सेमीकंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान क्षेत्रात भारताने केलेल्या प्रगतीबद्दलही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. आता लवकरच भारताचा समावेश हा सेमीकंडक्टरसाठी पहिल्या तीन पसंतीच्या ठिकाणांमध्ये होईल असा विश्वास सेमीकंडक्टर उद्योग क्षेत्रातील बहुतांश दिग्गजांना वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत जागतिक उत्पादन आणि प्रतिभेचे केंद्र
सद्यस्थितीत जागतिक कंपन्या भारताला झुकते माप देत आहेत ही बाबही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी ठळकपणे अधोरेखित केली. भारताबद्दलची अढळ विश्वासर्हता, भारतातली विपुल प्रतिभा आणि भारताची अनन्यसाधारण डिझाइन क्षमता यामुळेच हे घडत असल्याचे ते म्हणाले.
***
JPS/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2095969)
Visitor Counter : 40