सहकार मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नाशिक येथे 'सहकार परिषदेला' संबोधित केले आणि सहकाराशी संबंधित विविध कामांचा केला प्रारंभ
पंतप्रधान मोदी यांचा 'सहकारातून समृद्धी' हा मंत्र सहकार मंत्रालय प्रत्यक्षात आणत असून सहकार क्षेत्राशी संबंधित बंधू-भगिनींना प्रगतीच्या नव्या संधी पुरवल्या जात आहेत
राष्ट्रीय सहकारी ऑरगॅनिक्स लिमिटेड (एनसीओएल) शेतकऱ्यांचे सेंद्रिय उत्पादन विकून त्यातून मिळणारा नफा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करत आहे
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांमध्ये 15 हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकर वाद होता, जो मोदी सरकारने संपुष्टात आणला
मोदी सरकारने साखर कारखान्यांचा प्राप्तिकर कमी केला आणि इथेनॉल मिश्रण योजना सुरू केली, ज्यामुळे उद्योग आणि शेतकऱ्यांना आर्थिक बळकटी मिळाली
व्यंकटेश्वरा कोऑपरेटिवने सहकारी ब्रँड अंतर्गत काजू लागवड करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांना समृद्धीची दिशा दर्शवली
नाशिकमध्ये स्थापन केलेली अत्याधुनिक मृदा परीक्षण प्रयोगशाळा स्थानिक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल
Posted On:
24 JAN 2025 6:49PM by PIB Mumbai
केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह, आज महाराष्ट्रातल्या नाशिक येथे आयोजित 'सहकार परिषदेत' प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले. या कार्यक्रमादरम्यान, शाह यांनी सहकार क्षेत्राला बळकटी देण्याऱ्या अनेक उपक्रमांचा प्रारंभ केला. या परिषदेला केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला, शेतकरी, शेतमजूर आणि सशस्त्र दलांच्या सक्षमीकरणावर भर देणारा, ''जय जवान, जय किसान'' हा नारा अधोरेखित केला. शास्त्री यांनी शेतकरी, शेतमजूर आणि सैन्यदल यांचे एकाच वेळी बळकटीकरण करण्यास सुरुवात केली होती, असे शाह म्हणाले. सहकाराच्या माध्यमातून ''जय जवान जय किसान'' आणि मृदा परीक्षण प्रयोगशाळा स्थापनेतून ''जय विज्ञान''ही एकाच ठिकाणी स्थापित करण्याचे काम केले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वी शेतीमध्ये काही फायदा नाही, अशी चर्चा होत असे. मात्र सहकार चळवळ आणि वैज्ञानिक प्रगती यांच्या मिलाफातून शेती हा एक फायदेशीर व्यवसाय बनू शकतो, असा ठाम विश्वास आजही आपल्याला आहे, असे त्यांनी सांगितले. पूर्वी शेतकरी पारंपरिक पद्धतीने शेती करायचे आणि त्यांच्या मातीच्या विशिष्ट पोषक रचनेबद्दल त्यांना माहिती नव्हती, असे ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी मृदा परीक्षणावर भर दिला तेव्हा त्यातून असे दिसून आले की शेतकरी अनावश्यकपणे खतांचा वापर करत होते किंवा आवश्यक पोषक तत्त्वांकडे दुर्लक्ष करत होते. नाशिकमध्ये नव्याने स्थापन झालेल्या अत्याधुनिक मृदा परीक्षण प्रयोगशाळेचे फायदे शाह यांनी अधोरेखित केले. स्थानिक शेती पद्धतींमध्ये परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता असल्याचे त्यांनी सांगितले. ही प्रयोगशाळा शेतकऱ्यांनी वापरलेल्या पाण्याची पीएच पातळी, सल्फर घालण्याची आवश्यकता आहे का, डीएपीचे अचूक प्रमाण आणि कोणती पिके अधिक नफा मिळवून देऊ शकतात, यासारखी तपशीलवार माहिती पुरवेल. माहितीपूर्ण आणि कार्यक्षम कृषी पद्धती सक्षम करून ही सुविधा शेतकऱ्यांना लक्षणीयरित्या लाभदायी ठरेल, यावर त्यांनी भर दिला.
केंद्रीय सहकारमंत्र्यांनी व्यंकटेश्वर संस्थेने सोसायटीने हाती घेतलेल्या अनेक उपक्रमांवर प्रकाश टाकला. त्यांनी बेळगाव येथील व्यंकटेश्वर काजू प्रक्रिया कारखान्याचे आभासी माध्यमातून उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. हा कारखाना काजू लागवडीत गुंतलेल्या 18,000 शेतकऱ्यांना रास्त भाव मिळण्याची खातरजमा करत दररोज 24 टन काजू प्रक्रिया करेल. शेण आणि गोमूत्र वापरून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देताना विविध उत्पादने तयार करण्यासाठी 1,500 हून अधिक गीर गायींचे संगोपन करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमांमुळे शेतकरी समृद्ध होण्याबरोबरच भूमातेच्या संरक्षणालाही हातभार लागेल यावर त्यांनी भर दिला.
अमित शहा यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहित केले आणि त्यांच्या उत्पादनांना चांगला भाव मिळवून देण्यासाठी सेंद्रिय प्रमाणपत्र मिळवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालयाच्या अंतर्गत स्थापन केलेली नॅशनल को ऑपरेटीव्ह ओर्गेनिक लिमिटेड (एनसीओएल) ही संस्था प्रमाणित सेंद्रिय उत्पादनांच्या विक्रीतून मिळणारा नफा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी आहे यावर त्यांनी भर दिला. ही बहुराष्ट्रीय संस्था शेतकऱ्यांकडून सर्व प्रमाणित सेंद्रिय उत्पादन खरेदी करून ते बाजारात विकते आणि नफा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असल्याची खात्री करते, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक कल्याणाला चालना मिळते असे त्यांनी स्पष्ट केले.
अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रातील लोक स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्याची मागणी करत होते, परंतु त्यांची विनंती ऐकली गेली नाही. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने सहकार मंत्रालयाची स्थापना केली याकडे केंद्रीय सहकार मंत्र्यांनी लक्ष वेधले. सहकार ही आत्मनिर्भरतेची सर्वात गहन अभिव्यक्ती असून त्याशिवाय शेतकरी आत्मनिर्भरता किंवा समृद्धी प्राप्त करू शकत नाहीत यावर त्यांनी भर दिला. पंतप्रधान मोदी यांनी "सहकार से समृद्धी" (सहकारातून समृद्धी) हा मंत्र दिला आणि हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची जबाबदारी सहकार मंत्रालयाची असल्याचे ते म्हणाले.
आता काजू व्यतिरिक्त डाळिंब, द्राक्षे, सॅपोडीला (चिकू), हळद, कांदा, सफरचंद, केशर आणि आंबा यांची लागवड सर्व शेतकऱ्यांना एकाच मंचावर आणण्याचे काम करेल जेणेकरून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळू शकेल असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला.
व्यंकटेश्वर सहकारी संस्थेने सौर ऊर्जा, जैवइंधन, सीएनजी, पाण्याची साठवण, मत्स्यव्यवसाय, पंचगव्य अगरबत्ती, सेंद्रिय शेती आणि सरकारी ब्रँडअंतर्गत शेतकऱ्यांसोबत जोडून घेण्याच्या बाबतीत कौतुकास्पद काम केले असल्याचे केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यावेळी म्हणाले. यासोबतच या संस्थेने देशातील जवानांसोबतही जोडून घेण्यासाठी मोठे काम केले आहे असे ते म्हणाले. जवान आणि शेतकरी हे दोन घटक पाऊस, ऊन, थंडी अशा कोणत्याही परिस्थितीची तमा न बाळगता धरणीमातेसोबत आयुष्य काढतात असे ते म्हणाले. आज सहकाराच्या निमित्ताने होत असलेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवान आणि शेतकरी दोघेही एकत्र आले असल्याची बाब त्यांनी आपल्या संबोधनात नमूद केली.
शेतकऱ्यांच्या उत्पादनांची निर्यात, शेतपिकांच्या अस्सल बियाणांचे जतन करणे, सर्वाधिक उत्पादन देणारी बियाणांची वाणे तयार करणे आणि सेंद्रिय उत्पादनांचे पॅकेजिंग, विपणन आणि ब्रँडिंग करण्यासाठी केंद्र सरकारने तीन नवीन बहुराज्यीय सहकारी संस्थांची निर्मिती केली असल्याची माहिती केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी यावेळी दिली. या तीन सहकारी संस्था अमूल, कृभको (KRIBHCO) आणि इफकोच्या (IFFCO) धर्तीवर चालवल्या जाणार आहेत. येत्या 10 वर्षांच्या काळात या संस्था देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाच्या संस्था म्हणून उपयुक्त ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्व प्राथमिक कृषी पतसंस्थेचे (PACS) संगणकीकरण केले जात आहे, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून देशात गोदामे बांधली जात आहेत, तसेच प्राथमिक कृषी पतसंस्थांना बहुउपयुक्ततेचे स्वरुप देण्याचे कामही प्रगतीपथावर आहे अशी माहिती त्यांनी दिली.
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांच्या बाबतीत 15 हजार कोटी रुपयांच्या प्राप्ती कराचा वाद होता, तो आम्ही सोडवला अशी माहिती केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने 46 हजार कोटी रुपयांचे नवे करही कमी केले अशी माहितीही त्यांनी दिली.राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या (NCDC) माध्यमातून देशभरातील अनेक सहकारी साखर कारखान्यांना 10 हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले गेले असल्याचेही त्यांनी सांगितले. इथेनॉल मिश्रणाच्या माध्यमातून फायदा मिळवून देणारी युनिट्स तयार केली असल्याचेही ते म्हणाले. जेव्हा विरोधक सत्तेत होते त्यावेळी त्यांच्या सरकारांनी सहकार क्षेत्र, प्राथमिक सहकारी पतसंस्था, साखर कारखाने आणि शेतकऱ्यांसाठी काय केले, असा सवालही शहा यांनी यावेळी उपस्थित केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे सहकार मंत्रालय निर्माण केले, साखर कारखान्यांसाठी इथेनॉल मिश्रणाची योजना आणली, प्राप्ती कराचा प्रश्न सोडवला, प्राथमिक कृषी पतसंस्थाचे संगणकीकरण केले, प्राथमिक कृषी पतसंस्थासाठी उपकायदे आणि उपनियांचे प्रारुप तयार केले, प्राथमिक कृषी पतसंस्थांना बहुउपयोगितेच्या उपक्रमांशी जोडले अशी माहितीही केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी यावेळी दिली.
***
JPS/N.Chitale/S.Kakade/V.Joshi/T.Pawar/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2095960)
Visitor Counter : 58