पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (118 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

Posted On: 19 JAN 2025 11:46AM by PIB Mumbai

 

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज 2025 मधली पहिली 'मन की बात' होत आहे. तुमच्या एक गोष्ट नक्कीच लक्षात आली असेल, दरवेळी 'मन की बात' महिन्याच्या शेवटच्या रविवारी होते, पण यावेळी एक आठवडा आधीच म्हणजे, चौथ्या रविवार ऐवजी तिसऱ्या रविवारीच आपली भेट होत आहे; कारण पुढच्या आठवड्यातल्या रविवारी, 'प्रजासत्ताक दिन' आहे. मी माझ्या सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या आत्ताच शुभेच्छा देतो.

मित्रहो, यावेळीचा 'प्रजासत्ताक दिन' खूप खास आहे. भारतीय प्रजासत्ताकाचा हा 75वा वर्धापन दिन आहे. या वर्षी संविधानाच्या अंमलबजावणीला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आपल्याला आपले पवित्र संविधान देणाऱ्या संविधान सभेतील सर्व महान व्यक्तींना मी वंदन करतो. संविधान सभेदरम्यान, विविध विषयांवर बरेच विचारमंथन झाले. त्या चर्चा, संविधान सभेतील सदस्यांचे विचार, त्यांचे ते शब्द, हा आपला सर्वात मोठा वारसा आहे. आज 'मन की बात' मध्ये काही महान नेत्यांच्या मूळ आवाजातील संबोधन तुम्हाला ऐकवण्याचा माझा प्रयत्न आहे.

मित्रहो, जेव्हा संविधान सभेने आपले काम सुरू केले, तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी परस्पर सहकार्याबद्दल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली होती. त्यांचे हे कथन इंग्रजीत आहे. त्यातला काही भाग मी तुम्हाला ऐकवतो -

“So far as the ultimate goal is concerned, I think none of us need have any apprehensions. None of us need have any doubt, but my fear which I must express clearly is this, our difficulty as I said is not about the ultimate future. Our difficulty is how to make the heterogeneous mass that we have today, take a decision in common and march in a cooperative way on that road which is bound to lead us to unity. Our difficulty is not with regard to the ultimate; our difficulty is with regard to the beginning.”

अर्थात

("जेव्हा अंतिम उद्दिष्टाचा प्रश्न येतो तेव्हा मला वाटते की आपल्यापैकी कोणालाही कोणतीही धास्ती बाळगण्याची गरज नाही. आपल्यापैकी कोणालाही कोणतीही शंका असण्याची आवश्यकता नाही, परंतु माझी भीती जी मी स्पष्टपणे व्यक्त केली पाहिजे ती म्हणजे, मी म्हटल्याप्रमाणे आपली विवंचना अंतिम भवितव्याबाबत नाही. आपली अडचण ही आहे की आज आपल्याकडे असलेल्या विविध जनसमुदायाची मोट कशी बांधायची, सामाईक निर्णय कसे घ्यायचे आणि आपल्याला एकतेकडे नेणाऱ्या मार्गावर सहकार्याने कशी वाटचाल करायची. आपली अडचण अंतिमतेच्या बाबतीत नाही; तर प्रारंभाबाबत आहे.")

मित्रांनो, संविधान सभा एकसंध आणि एकमताची असावी आणि सदस्यांनी सामान्य हितासाठी एकत्र काम करावे असा बाबासाहेबांचा आग्रह होता. मी संविधान सभेची आणखी एक ऑडिओ क्लिप तुम्हाला ऐकवतो. हा ऑडिओ आपल्या संविधान सभेचे प्रमुख डॉ. राजेंद्र प्रसाद जी यांचा आहे. चला डॉ. राजेंद्र प्रसाद जी यांचे विचार त्यांच्याच आवाजात ऐकूया -

(_“हमारा इतिहास बताता है और हमारी संस्कृति सिखाती है कि हम

शांति प्रिय हैं और रहे हैं | हमारा साम्राज्य और हमारी फतह दूसरी तरह की रही है, हमने दूसरो को जंजीरो से, चाहे वो लोहे की हो या सोने की, कभी नहीं बांधने की कोशिश की है | हमने दूसरों को अपने साथ, लोहे की जंजीर से भी ज्यादा मजबूत मगर सुंदर और सुखद रेशम के धागे से बांध रखा है और वो बंधन धर्म का है, संस्कृति का है, ज्ञान का है | हम अब भी उसी रास्ते पर चलते रहेंगे और हमारी एक ही इच्छा और अभिलाषा है, वो अभिलाषा ये है कि हम संसार में सुख और शांति कायम करने में मदद पहुंचा सकें और संसार के हाथों में सत्य और अहिंसा वो अचूक हथियार दे सकें जिसने हमें आज आजादी तक पहुंचाया है | हमारी जिंदगी और संस्कृति में कुछ ऐसा है जिसने हमें समय के थपेड़ों के बावजूद जिंदा रहने की शक्ति दी है | अगर हम अपने आदर्शों को सामने रखे रहेंगे तो हम संसार की बड़ी सेवा कर पाएंगे |”)_

मित्रहो, डॉ. राजेंद्र प्रसाद जी यांनी मानवी मूल्यांप्रती देशाच्या बांधिलकीविषयी कथन केले होते. आता मी तुम्हाला डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे विचार ऐकवतो. त्यांनी संधींच्या समानतेचा मुद्दा उपस्थित केला होता. डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी म्हणाले होते -

“I hope sir that we shall go ahead with our work in spite of all difficulties and thereby help to create that great India which will be the motherland of not this community or that, not this class or that, but of every person, man, woman and child inhabiting in this great land irrespective of race, caste, creed or community. Everyone will have an equal opportunity, so that he or she can develop himself or herself according to best talent and serve the great common motherland of India.”

अर्थात

("महोदय मला आशा आहे की, कितीही अडचणी असल्या तरी आपण आपले कार्य सुरू ठेवून त्याद्वारे एक महान भारत निर्माण करण्यास मदत करू, जी कोणत्याही एका समुदायाची किंवा एका वर्गापुरती मातृभूमी नसेल तर वंश, जात, पंथ, समुदायापलीकडे या महान भूमीत राहणाऱ्या प्रत्येक व्यक्ती, पुरुष, स्त्री आणि मुलाची मातृभूमी असेल. प्रत्येकाला समान संधी असेल, जेणेकरून तो किंवा ती सर्वोत्तम प्रतिभेनुसार स्वतःचा विकास करू शकेल आणि भारताच्या महान सर्वसामान्यांच्या मातृभूमीची सेवा करू शकेल.")

मित्रहो, मला आशा आहे की तुम्हालाही संविधान सभेमधल्या विचारविनिमयातला हा मूळ ऑडिओ ऐकून आनंद झाला असेल. आपल्या देशातील नागरिकांनी, या विचारांपासून प्रेरणा घेऊन आपल्या संविधान निर्मात्यांनाही अभिमान वाटावा असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे.

मित्रहो, प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 25 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ आहे. हा दिवस महत्त्वाचा आहे कारण या दिवशी 'इलेक्शन कमिशन’ म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. आपल्या संविधान कर्त्यांनी संविधानामध्ये आपल्या निवडणूक आयोगाला आणि लोकशाहीमध्ये लोकांच्या सहभागाला खूप महत्त्वाचे स्थान दिले आहे. 1951-52 मध्ये जेव्हा देशात पहिल्यांदा निवडणुका झाल्या, तेव्हा देशातली लोकशाही टिकेल की नाही अशी काहींना शंका होती; पण, आपल्या लोकशाहीने सर्व किंतु परंतु फोल ठरवले - शेवटी, भारत ही लोकशाहीची जननी आहे. गेल्या दशकांमध्ये देखील, देशाची लोकशाही मजबूत आणि समृद्ध झाली आहे. वेळोवेळी आपल्या मतदान प्रक्रियेचे आधुनिकीकरण आणि बळकटीकरण करणाऱ्या निवडणूक आयोगाचे सुद्धा मी आभार मानतो. आयोगाने तंत्रज्ञानाच्या शक्तीचा वापर करून लोकांच्या शक्तीला आणखी बळकटी दिली. निष्पक्ष निवडणुकांसाठीच्या वचनबद्धतेबद्दल मी निवडणूक आयोगाचे अभिनंदन करतो.

मी माझ्या देशवासियांना आवाहन करतो की, त्यांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानाचा अधिकार बजावावा, नेहमी बजावावा, आणि देशाच्या लोकशाही प्रक्रियेचा भाग बनून ही प्रक्रिया बळकटही करावी.

माझ्या प्रिय देशवासियांनो, प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू झाला आहे.

एक अविस्मरणीय गर्दी, एक मनोहारी दृश्य आणि समानता आणि सौहार्दाचा एक अनन्यसाधारण संगम! यावेळी कुंभमेळ्यात अनेक दिव्य योगही निर्माण होत आहेत. कुंभाचा हा उत्सव विविधतेत एकतेचा उत्सव आहे. संगमाच्या वाळूवर भारतभरातून आणि जगभरातून लोक जमतात. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेत कुठेही भेदभाव किंवा जातीयवाद नाही. यामध्ये, भारताच्या दक्षिणेकडून, भारताच्या पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून लोक येतात. कुंभमेळ्यात, श्रीमंत आणि गरीब हा भेदभाव उरत नाही. सर्वजण संगमात डुबकी मारतात, भंडाऱ्यात एकत्र जेवतात, प्रसाद घेतात - म्हणूनच 'कुंभ' हा एकतेचा महाकुंभ आहे. आपल्या परंपरा संपूर्ण भारताला कशा एका सूत्रात बांधतात हे देखील कुंभमेळ्याचा उत्सव आपल्याला सांगतो. उत्तरेपासून दक्षिणेकडे श्रद्धांचे पालन करण्याचे मार्ग सारखेच आहेत. एकीकडे प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार येथे कुंभाचे आयोजन केले जाते, तर त्याचप्रमाणे दक्षिण भागात गोदावरी, कृष्णा, नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या काठावर पुष्करमचे आयोजन केले जाते. हे दोन्ही उत्सव आपल्या पवित्र नद्या आणि त्यांच्याप्रति असलेल्या श्रद्धेशी निगडित आहेत. त्याचप्रमाणे, कुंभकोणमपासून तिरुक्कड-युरपर्यंत, कुडा-वासलपासून तिरुचेरईपर्यंत, अशी अनेक मंदिरे आहेत ज्यांच्या परंपरा कुंभमेळ्याशी संबंधित आहेत.

मित्रहो, यावेळी तुम्ही सर्वांनी पाहिले असेल की कुंभमेळ्यात तरुणांचा सहभाग खूप व्यापक प्रमाणात दिसून येतोय आणि हे देखील खरे आहे की जेव्हा तरुण पिढी आपल्या संस्कृतीशी अभिमानाने जोडली जाते तेव्हा तिची मुळे आणखी मजबूत होतात आणि मग तिचे उज्ज्वल भविष्य देखील सुनिश्चित होते. यावेळी आपण कुंभमेळ्यातील डिजिटल पदरव (पाऊले) इतक्या मोठ्या प्रमाणात अनुभवत आहोत. कुंभमेळ्याची ही जागतिक लोकप्रियता प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

मित्रहो, काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमध्ये एक भव्य 'गंगा सागर' मेळा आयोजित करण्यात आला होता. संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर, जगभरातील लाखो भाविकांनी या मेळ्यात स्नान केले. ‘कुंभ’, ‘पुष्करम’ आणि ‘गंगा सागर मेळा’ - हे आपले उत्सव आपला सामाजिक एकोपा, सौहार्द आणि एकात्त्मतेला प्रोत्साहन देतात.

हे उत्सव भारतातील लोकांना भारताच्या परंपरांशी जोडतात, आणि ज्याप्रमाणे आपल्या शास्त्रांनी संसारात धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार गोष्टींवर भर दिला आहे. त्याचप्रमाणे, आपले सण आणि परंपरा आध्यात्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा प्रत्येक पैलूला सुद्धा बळकटी देतात.

मित्रहो, या महिन्यात आपण ‘पौष शुक्ल द्वादशीच्या’ दिवशी रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा उत्सवाचा पहिला वर्धापन दिन साजरा केला. या वर्षी 'पौष शुक्ल द्वादशी' 11 जानेवारी रोजी आली. या दिवशी, लाखो रामभक्तांनी अयोध्येत राम लल्लाचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. प्राण प्रतिष्ठाची ही द्वादशी ही भारताच्या सांस्कृतिक चैतन्याच्या पुनर्स्थापनेची द्वादशी आहे. त्यामुळे पौष शुक्ल द्वादशीचा हा दिवस एक प्रकारे प्रतिष्ठा द्वादशीचा दिवसही ठरला आहे. विकासाच्या मार्गावर वाटचाल करताना आपल्याला आपला वारसाही जपायचा आहे आणि त्यातून प्रेरणा घेऊन मार्गक्रमण करायचे आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, 2025 च्या सुरुवातीलाच भारताने अंतराळ क्षेत्रात मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आज, मला हे सांगताना अभिमान वाटतो की बेंगळुरूस्थित एक भारतीय अंतराळ तंत्रज्ञान स्टार्ट-अप कंपनी पिक्सेल ने भारतातील पहिला खाजगी उपग्रह 'फायरफ्लाय' यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे. हा उपग्रह जगातील सर्वात उच्च-रिझोल्यूशन हायपर स्पेक्ट्रल उपग्रह आहे. या यशामुळे भारत केवळ आधुनिक अंतराळ तंत्रज्ञानात आघाडीवर नाही तर आत्मनिर्भर भारताच्या दिशेने हे एक मोठे पाऊल आहे. हे यश आपल्या खाजगी अंतराळ क्षेत्राच्या वाढत्या ताकदीचे आणि नवोन्मेषाचे प्रतीक आहे. मला या कामगिरीचा अभिमान आहे. या कामगिरीसाठी पिक्सेल चा चमू, इस्रो आणि IN-SPACe (इन-स्पेस) चे मी संपूर्ण देशाच्या वतीने अभिनंदन करतो. 

मित्रहो, काही दिवसांपूर्वी आपल्या शास्त्रज्ञांनी अंतराळ क्षेत्रातच आणखी एक मोठे यश संपादन केले. आपल्या शास्त्रज्ञांनी उपग्रहांचे अंतराळ ‘डॉकिंग’ केले आहे. जेव्हा दोन अंतराळयान अंतराळात जोडले जातात, तेव्हा या प्रक्रियेला स्पेस डॉकिंग म्हणतात. अंतराळ स्थानकांना आणि अंतराळातील क्रू मोहिमांना पुरवठा करण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. हे यश मिळवणारा भारत हा चौथा देश बनला आहे.

मित्रहो, आपले शास्त्रज्ञही अंतराळात रोपे उगवून त्यांना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांनी चवळीच्या बियांची निवड केली. 30 डिसेंबर रोजी पाठवलेल्या या बियांना अंतराळात अंकुर फुटले. हा एक अतिशय प्रेरणादायी प्रयोग आहे जो भविष्यात अंतराळात भाज्या उगवण्याचा मार्ग प्रशस्त करेल. यावरून आपले शास्त्रज्ञ किती दूरगामी विचारसरणीने काम करत आहेत हे दिसून येते.

मित्रहो, मला तुम्हाला आणखी एका प्रेरणादायी उपक्रमाबद्दल सांगायचे आहे. आयआयटी मद्रास येथील एक्सटेम केंद्र अंतराळातील उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञानावर काम करत आहे. हे केंद्र अवकाशातील 3D-प्रिंटेड इमारती, धातूचे फोम आणि ऑप्टिकल फायबर यासारख्या तंत्रज्ञानावर संशोधन करत आहे. हे केंद्र पाण्याशिवाय काँक्रीट बनवण्यासारख्या क्रांतिकारी पद्धती देखील विकसित करत आहे. एक्सटेम च्या या संशोधनामुळे भारताचे गगनयान अभियान आणि भविष्यातील अंतराळ स्थानक बळकट होईल. यामुळे उत्पादन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचे नवे मार्गही खुले होतील.

मित्रहो, ही सर्व कामगिरी म्हणजे भविष्यातील आव्हानांवर उपाय प्रदान करण्यात भारतातील शास्त्रज्ञ आणि नवोन्मेषक किती दूरदर्शी आहेत याचा पुरावा आहे. आज आपला देश अंतराळ तंत्रज्ञानात नवे विक्रम प्रस्थापित करत आहे.

मित्रांनो, ही सर्व कामगिरी म्हणजे भविष्यातल्या आव्हानांवर उपाय शोधून काढण्यासाठी भारतातील शास्त्रज्ञ आणि नवोन्मेषक यांच्याकडे किती दूरदृष्टी आहे, याचा पुरावा आहे. आज आपला देश अवकाश तंत्रज्ञानात नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. भारतातले वैज्ञानिक, नवोन्मेषक आणि युवा उद्योजकांना मी संपूर्ण देशाच्या वतीनं शुभेच्छा देतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्ही अनेकदा मानव आणि प्राण्यांमधल्या अद्भुत मैत्रीचे फोटो पाहिले असतील; प्राण्यांच्या निष्ठेचे किस्से तुम्ही ऐकले असतील. पाळीव प्राणी असोत किंवा वन्य प्राणी, त्यांचं मानवाशी असलेलं नातं अनेकदा आपल्याला आश्चर्यचकित करतं. प्राणी बोलू शकत नसले तरी मानव त्यांच्या भावना आणि त्यांचे हावभाव चांगल्या प्रकारे समजू शकतो. प्राण्यांनाही प्रेमाची भाषा समजते आणि ते ती पाळतातही. मी तुमच्यासोबत आसाममधलं एक उदाहरण सामायिक करू इच्छितो. आसाममध्ये 'नौगाव' नावाचे एक ठिकाण आहे. 'नौगाव' हे आपल्या देशातलं महान व्यक्तिमत्व असलेल्या श्रीमंत शंकरदेवजी यांचं जन्मस्थानदेखील आहे. हे ठिकाण खूप सुंदर आहे. इथे हत्तींसाठी एक मोठा अधिवासदेखील आहे. या भागात अनेक अशा घटना घडत होत्या जिथे हत्तींचे कळप शेतातली पिकं नष्ट करत होते. शेतकरी त्रासले होते, आजूबाजूच्या जवळपास १०० गावातले लोक खूप अस्वस्थ होते, परंतु गावकऱ्यांनाही हत्तींची हतबलता समजली. त्यांना माहीत होतं की हत्ती त्यांची भूक भागवण्यासाठी शेतांकडे वळत आहेत, म्हणून गावकऱ्यांनी यावर उपाय शोधण्याचा विचार केला. गावकऱ्यांनी एक चमू तयार केला, ज्याचे नाव 'हत्ती बंधू' होतं. या हत्ती बंधूंनी समजूतदारपणा दाखवून सुमारे ८०० बिघे ओसाड जमिनीवर एक अनोखा प्रयत्न केला. इथे गावकऱ्यांनी एकत्र येऊन नेपियर गवताची लागवड केली. हत्तींना हे गवत खूप आवडतं. याचा परिणाम असा झाला की हत्तींनी शेतांमध्ये जाणं कमी केलं. हजारो ग्रामस्थांसाठी ही खूप दिलासा देणारी बाब आहे. त्यांचे हे प्रयत्न हत्तींनाही खूप आवडले.

मित्रांनो, आपली संस्कृती आणि वारसा आपल्याला आपल्या सभोवतालचे प्राणी आणि पक्षी यांच्यासोबत प्रेमानं‌ जगायला शिकवतो. गेल्या दोन महिन्यांत आपल्या देशात दोन नवीन व्याघ्र प्रकल्पांची भर पडली आहे, ही आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. यापैकी एक आहे छत्तीसगडमधला गुरु घासीदास- तमोर पिंगला व्याघ्र प्रकल्प आणि दुसरा आहे मध्यप्रदेशातला रातापानी व्याघ्र प्रकल्प.

माझ्या प्रिय देशवासियांनो, स्वामी विवेकानंद म्हणाले होते की जी व्यक्ती आपल्या कल्पनेबद्दल उत्साही असते तीच आपलं ध्येय साध्य करू शकते. कोणतीही कल्पना यशस्वी करण्यासाठी, ध्यास आणि समर्पण सर्वात महत्वाचं असतं. संपूर्ण समर्पण आणि उत्साहानेच नावीन्य, सर्जनशीलता आणि यशाचा मार्ग सापडू शकतो. काही दिवसांपूर्वीच, स्वामी विवेकानंदजींच्या जयंतीनिमित्त, मला 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग'मध्ये‌ सहभागी होण्याचं भाग्य लाभलं. इथे मी माझा संपूर्ण दिवस देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तरुण मित्रांसोबत घालवला. तरुणांनी स्टार्टअप्स, संस्कृती, महिला, युवा आणि पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रांबाबतचे त्यांचे विचार मांडले. हा कार्यक्रम माझ्यासाठी खूप संस्मरणीय ठरला.

मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच स्टार्टअप इंडियानं 9 वर्ष पूर्ण केली. गेल्या 9 वर्षात आपल्या देशात निर्माण झालेले अर्ध्याहून अधिक स्टार्टअप्स टियर 2 आणि टियर 3 शहरांमधले आहेत आणि हे ऐकलं की प्रत्येक भारतीयाचं मन आनंदित होतं, म्हणजेच आपली स्टार्टअप संस्कृती केवळ मोठ्या शहरांपुरती मर्यादित नाही; आणि तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की छोट्या शहरांमधले अर्ध्याहून अधिक स्टार्टअप्स आपल्या मुली चालवतात. जेव्हा आपण ऐकतो की अंबाला, हिस्सार, कांगडा, चेंगलपट्टू, बिलासपूर, ग्वाल्हेर आणि वाशीम सारखी शहरं स्टार्टअप्सची केंद्रं बनत आहेत, तेव्हा मन आनंदानं भरून येतं. नागालँडसारख्या राज्यात, गेल्या वर्षी स्टार्टअप्सची नोंदणी 200% पेक्षा जास्त वाढली आहे. कचरा व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जा, जैवतंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक्स ही अशी क्षेत्र आहेत ज्यात स्टार्ट-अप्सना सर्वाधिक महत्त्व दिलं जात आहे. ही पारंपरिक क्षेत्रं नाहीत, परंतु आपले तरुण मित्र पारंपरिकतेहून अधिक पुढचा विचार करत आहेत आणि म्हणूनच त्यांना यश देखील मिळत आहे.

मित्रांनो, 10 वर्षांपूर्वी जेव्हा कोणी स्टार्टअप क्षेत्रात जाण्याबद्दल बोलत असे तेव्हा त्याला अनेक प्रकारचे टोमणे ऐकावे लागत. कोणीतरी विचारायचे, स्टार्टअप म्हणजे नेमके काय? तर कोणीतरी म्हणे की यानं काहीही होणार नाही! पण आता पहा, एका दशकात किती मोठा बदल झाला आहे. तुम्हीही भारतात निर्माण होणाऱ्या नवीन संधींचा पुरेपूर फायदा घेतला पाहिजे. जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुमच्या स्वप्नांनाही नवीन झेप मिळेल.

माझ्या प्रिय देशबांधवांनो, चांगल्या हेतूनं आणि निस्वार्थ भावनेनं केलेलं काम दूरवर पोहोचतं. आणि आपलं 'मन की बात' हे यासाठीचं एक खूप मोठं व्यासपीठ आहे. आपल्या एवढ्या विशाल देशात जर कोणी दुर्गम भागातही चांगलं काम करत असेल आणि कर्तव्याच्या भावनेला अत्यंत महत्त्व देत असेल, तर त्याचे प्रयत्न प्रदर्शित करण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. दीपक नाबाम जी यांनी अरुणाचल प्रदेशात सेवेचं एक अनोखं उदाहरण समोर ठेवलं आहे. दीपकजी इथे एक घर चालवतात, जिथे मानसिकदृष्ट्या आजारी, शारीरिकदृष्ट्या दुर्बळ आणि वयोवृद्ध यांची सेवा केली जाते, तसंच इथे अंमली पदार्थांच्या व्यसनानं अधीन लोकांचीही काळजी घेतली जाते. दीपक नाबाम जी यांनी कोणत्याही मदतीशिवाय समाजातल्या वंचित लोकांना, हिंसाचारग्रस्त कुटुंबांना आणि बेघर लोकांना आधार देण्यासाठी एक मोहीम सुरू केली. आज त्यांच्या सेवेला एका संस्थेचं स्वरूप प्राप्त झालं आहे. त्यांच्या संस्थेला अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आलं आहे. लक्षद्वीपच्या कवरत्ती बेटावर परिचारिका म्हणून काम करणाऱ्या के. हिंडुम्बी जी यांचं कामदेखील खूप प्रेरणादायी आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की त्या 18 वर्षांपूर्वी सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्या होत्या, पण आजही त्या पूर्वीइतकीच करुणा आणि प्रेमानं लोकांची सेवा करत आहेत. लक्षद्वीपचे केजी मोहम्मद जी यांचे प्रयत्नदेखील अद्भुत आहेत. त्यांच्या कठोर परिश्रमामुळे मिनिकॉय बेटाची सागरी परिसंस्था अधिक मजबूत होत आहे. त्यांनी लोकांना पर्यावरणाबद्दल जागरूक करण्यासाठी अनेक गाणी लिहिली आहेत. त्यांना लक्षद्वीप साहित्य कला अकादमीचा सर्वोत्कृष्ट लोकगीत पुरस्कारही मिळाला आहे. सेवानिवृत्तीनंतर, केजी मोहम्मद तिथल्या वस्तुसंग्रहालयातही काम करत आहेत.

मित्रांनो, आणखी एक आनंदाची बातमी अंदमान आणि निकोबार बेटांवरची आहे. निकोबार जिल्ह्यातल्या व्हर्जिन खोबरेल तेलाला नुकताच जीआय टॅग म्हणजेच भौगोलिक मानांकन मिळालं आहे. व्हर्जिन खोबरेल तेलाला भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर, आणखी एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या तेलाच्या उत्पादनात सहभागी असलेल्या महिलांना संघटित करून बचत गट तयार केले जात आहेत, त्यांना मार्केटिंग आणि ब्रँडिंगचं विशेष प्रशिक्षणदेखील दिलं जात आहे. आपल्या आदिवासी समुदायांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे. मला विश्वास वाटतो की भविष्यामध्ये निकोबारचं व्हर्जिन खोबरेल तेल जगात खळबळ उडवून देणार आहे आणि यामध्ये सर्वात मोठं योगदान अंदमान आणि निकोबारच्या महिला बचत गटांचं असेल.

माझ्या प्रिय देशवासियांनो, क्षणभर एका दृश्याची कल्पना करा - कोलकात्यात- जानेवारी महिना आहे, दुसरं महायुद्ध शिगेला पोहोचलं आहे आणि भारतात ब्रिटिशांविरुद्धचा संताप उफाळून आला आहे. यामुळे, शहराच्या प्रत्येक कोपऱ्यावर पोलिस तैनात आहेत. कोलकात्याच्या मध्यभागी असलेल्या एका घराभोवतालची पोलिसांची उपस्थिती अधिक सावध आहे. दरम्यान, रात्रीच्या अंधारात एका बंगल्यातून एक लांब तपकिरी कोट, पँट आणि काळी टोपी घातलेला माणूस गाडीतून बाहेर पडतो. कडक सुरक्षा असलेल्या काही चौक्या ओलांडल्यानंतर, तो गोमो या रेल्वे स्थानकावर पोहोचतो. हे स्थानक आता झारखंडमध्ये आहे. इथे तो ट्रेन पकडतो आणि पुढे जातो. मग अफगाणिस्तानमार्गे तो युरोपला पोहोचतो - आणि हे सर्व- ब्रिटिश राजवटीची अभेद्य तटबंदी असूनही घडतं.

मित्रांनो, ही कथा तुम्हाला एखाद्या चित्रपटातल्या दृश्यासारखी वाटेल. तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की, एवढं धाडस दाखवणारा हा मनुष्य कोणत्या मातीनं बनला आहे? खरंतर ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या देशाचं महान व्यक्तित्व असणारे नेताजी सुभाषचंद्र बोस होते. आता आपण 23 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस 'पराक्रम दिवस' म्हणून साजरा करतो. त्यांच्या शौर्याशी संबंधित असलेली ही गाथा त्यांच्या पराक्रमाची झलकदेखील दाखवते. काही वर्षांपूर्वी, मी त्याच घरात गेलो होतो जिथून ते ब्रिटिशांना चकवून निघून गेले होते. त्यांची ती गाडी अजूनही तिथेच आहे. तो अनुभव माझ्यासाठी खूपच खास होता. सुभाषबाबू दूरदर्शी होते. धाडस त्याच्या स्वभावातच रुजलं होतं. एवढंच नाही तर ते एक अतिशय कार्यक्षम प्रशासकदेखील होते. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ते कोलकाता महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आणि त्यानंतर त्यांनी महापौरपदाची जबाबदारीही निभावली. प्रशासक म्हणूनही त्यांनी अनेक उत्कृष्ट कामं केली. मुलांसाठी शाळा, गरीब मुलांसाठी दूध आणि स्वच्छतेसाठी त्यांनी केलेले प्रयत्न अजूनही वाखाणले जातात.

नेताजी सुभाष यांचं रेडिओशीही खूप जवळचं नातं होतं. त्यांनी 'आझाद हिंद रेडिओ' ची स्थापना केली होती, त्यावरचे त्यांचे विचार ऐकण्यासाठी लोक मोठ्या आतुरतेनं वाट पाहत असत. त्यांच्या भाषणांनी परकीय राजवटीविरुद्धच्या लढ्याला एक नवीन बळ दिलं. 'आझाद हिंद रेडिओ' वर इंग्रजी, हिंदी, तमिळ, बंगाली, मराठी, पंजाबी, पश्तो आणि उर्दू भाषेतली बातमीपत्रं प्रसारित होत असत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मी वंदन करतो. मी देशभरातल्या तरुणांना त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त वाचन‌ करण्याचं आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्याचं आवाहन करतो.

मित्रांनो, 'मन की बात'चा हा कार्यक्रम दरवेळी मला देशाच्या सामूहिक प्रयत्नांशी, तुम्हा सर्वांच्या सामूहिक इच्छाशक्तीशी जोडतो. दर महिन्याला मला तुमच्या सूचना आणि विचार मोठ्या प्रमाणात मिळतात आणि जेव्हा जेव्हा मी हे विचार पाहतो तेव्हा भारताच्या विकासाच्या संकल्पावरचा माझा विश्वास आणखी वाढतो. आपल्या कामाद्वारे भारताला सर्वोत्तम बनवण्यासाठी तुम्ही सर्वांनी असंच काम करत राहावं. 'मन की बात' च्या या भागात एवढंच. पुढच्या महिन्यात आपण भारतीयांच्या यशाच्या, संकल्पांच्या आणि कामगिरीच्या नवीन कथांसह पुन्हा भेटू. खूप खूप धन्यवाद. नमस्कार!

***

S.Pophale/AIR/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 2094247) Visitor Counter : 30